Sunday, January 25, 2015

अलिबाग किल्ला,खांदेरी आणि उंदेरीची सफर

अलिबागच्या जवळ खांदेरी उंदेरी ही दोन बेटे खोल समुद्रातले सागरी दुर्ग आहेत. अलिबागच्या समुद्रात एक किलोमीटर अंतरावर असणारा कुलाबा किल्लाही त्यांच्याच दूरदृष्टीची साक्ष देतो.बेत आखला जात होता पण मोहीमेला मुहर्त मिळत नव्हता.अलिबागच्या कोळी मित्राने सोय करतो असे सांगितल्यावर आम्ही तयारी केली.अलिबागच्या धक्क्यावरून मच्छिमार बोटीने कुलाबा किल्ल्याकडे निधालो. 






अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दूर्गव्दयी उभी आहे.अलिबाग च्या समुद्र किनाऱ्या वरून दृष्टीस पडणारा किल्ला. समुद्रकिनाऱ्यापासून साधारण १ - २ किमी अंतरावर समुद्रात आहे.भरतीच्या वेळी किल्ल्यावर जायचे असल्यास बोट शिवाय पर्याय नाही. ओहोटी असल्यास चालत किंवा घोडागाडीने दुर्गावर जाता येते. 






भव्य प्रवेशव्दाराजवळ बोट थांबल्याबरोबर उड्या मारत उतरलो व किल्ल्यात ’शिवाजी महाराज की जय’ धोषणा देत शिरलो.  गडाच्या मुख्य द्वाराच्या कमानीवर मध्यभागी गणेश मूर्ती कोरलेली असून, त्याच्या वरच्या भागात दोन हत्तींची झुंज असे चित्रशिल्प कोरल्याचे  दिसते.. दरवाजाच्या वरच्या भागात.. चौकटीच्या वरच्या आडव्या पट्ट्यात साधारण ८-१० रकाने असून त्यात कमलपुष्प, मोर, हरीण यांची आकर्षक शिल्पचित्रे कोरल्याचे पाहायला मिळते.. कमानीच्या दोन्ही बाजूस वर मुक्तहस्त व्याघ्रशिल्प आहे..










 सह्याद्रीच्या अनेक गडकोटांच्या प्रवेशव्दारी कोरलेली शिल्पे हा एक संशोधनाचा विषय होवू शकेल.. गडाचा मुख्य द्वार जितके मजबूत तितका गड अजिंक्य आणि सुरक्षित..  कुठलाही गड पहावा तो तटबंदीवरून फेरफटका मारूनच पहावा.. म्हणजे गडाच्या अंतरंगात डोकावता येतं.. 















तटबंदी वरून चक्कर मारली कि आपसूक लक्षात येतं.. गडावर नेमकं काय पाहायला मिळणार ते .. !! गड कोटाचे गतवैभव अनुभवावे तटबंदिवरून अगदी डोळेभरून.. तीन मंदिरे पहायला मिळातात.. मंदिराच्या कळसावर नजर टाकता कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते.. पंचायतनात मध्यभागी गणेश व बाजूने शिव, विष्णू, सूर्य आणि देवीच्या मूर्ती ठाण मांडून बसल्याचे दिसले.. मंदिराचे बांधकाम पेशवाईच्या भरभराटीच्या काळात झाले असावे असे दिसते.. पंचायतनासमोर एक तुळशी वृंदावन असून त्यावरील शिल्पकला फार सुरेख आहे.. उजवीकडे अंजनेयाचे म्हणजेच मारुती बाप्पा चे सुंदर मंदिर असून ते शिवकालीन असण्याची शक्यता आहे..








































अलिबागचा किल्ला पाहून उंदेरीकडे आलो. थळच्या सागरात दोन बलदंड सागरी दुर्ग उभे आहेत. खांदेरी आणि उंदेरी अशी त्यांची नावे.भरती फार जोरात होती, लाटा उंदेरीच्या तटाला जोरदार धडका देत होत्या. तिथे वस्ती नाही आणि बोट लावायला जागाही नाही. खडकांमुळे बोटवाला  बोट जवळ न्यायलाही राजी नव्हता.
बोट किना-याला लावायला धक्का नसल्याने  बाजूने किल्ला पाहिला.बांधकामाचे अवशेष आहेत.त्यातील काही बांधकाम कोसळलेले आहेत.













समोरच्या उंदेरीला मागे टाकून खोल समुद्रात शिरलो आणि खांदेरी दिसू लागला. जवळूनही नजरेत मावेल एवढे आटोपशीर बेट, दक्षिणेला एक टेकाड आणि त्यावर एक दीपगृह. उंचसखल जमिनीवर बांधलेली मजबूत तटबंदी, आणि बाहेरच्या बाजूला तटबंदीचे समुद्रापासून रक्षण करण्यासाठी टाकलेले मोठमोठे दगडधोंडे. आत प्रवेश करण्यासाठी एक पुर्वाभिमुख छोटा धक्का. त्या छोट्या धक्क्याला बोट लावली.













उजव्या बाजुला असलेल्या वेताळाचे दर्शन घेतले. वेताळाचे कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेले देऊळ आहे. या देवळात मोठ्या माशांची हाडे जतन केलेली आहेत.नतंर दीपगृहाच्या छोट्या टेकाडावर चढून गेलो. मित्राने आणलेले मच्छीचे जेवण करुन दीपगृह पाहिले. या बेटावरचे हे दीपगृह १८६७ मध्ये पोर्तुगीजांनी बांधलेले  आहे. खांदेरीचे एक अद्भुत वैशिष्ट्य अशा धातूचा आवाज येणाऱ्या खडकाच्या शोध घेतला.बराच वेळ दगड बडवल्यावर सर्वांचे समाधान झाले आणि दुर्गप्रदक्षिणा सुरू केली. 






खांदेरीच्या तटबंदीवर गाडय़ावर ठेवलेल्या तोफा आहेत. तटबंदीला जागोजाग बुरुज आहेत. तटबंदीचे काम रचीव पद्धतीने केलेले असल्याने दोन चिर्‍याच्या मधे दर्जा भरलेला नाही. तसेच तटबंदीच्या बाहेरील अंगाला मोकळे चिरे टाकून दिले आहेत.खांदेरीच्या गडफेरीमधे वेताळ मंदिर, हनुमान मंदिर बुद्ध मंदिर, क्रॉस, पीर अशी अनेक श्रद्धास्थाने पहायला मिळतात.








दुर्गाची तटबंदी अगदी मजबूत अशी पाच सहा फूट रुंद आहे, मध्ये तेवढेच मजबूत असे साधारण बारा बुरूज आहेत, काही बुरुजाखालून समुद्रात उतरण्यास दरवाजे बांधून काढले आहेत. 











वर्दळीपासून तसा बराच सुरक्षित असल्याने बुरुजांवर तोफा अजूनही आहेत. गडावर एक मोठा गोड्या पाण्याचा तलाव आहे, एक छोटा तलावही आहेत.चार पाच विहिरी दिसल्या पण त्या मात्र कोरड्या आहेत.












खांदेरी उंदेरीची बेटे ही मुंबई आणि मुरुडचा जंजिरा यांच्या मधे असल्यामुळे अतिशय महत्त्वाची होती. ही बेटे ताब्यात घेवून त्यावर जलदुर्ग बांधल्यास मुंबईकर इंग्रज आणि जंजिरेकर सिद्यी यांच्यामधे चांगलीच पाचर मारता येईल हे हेरुन शिवाजीराजांनी खांदेरीचा किल्ला बांधायला घेतला महाराजांच्या या बेताचा सुगावा लागताच इंग्रजांनी खांदेरी बेटावर आमचा हक्क असल्याचे कारण पुढे करुन येथे किल्ला बांधण्याला विरोध केला. इंग्रजांना पोर्तृगिजांकडून मुंबई मिळाली होती.








या बेटांचा इतिहास..... खांदेरी बेटावर १६७२ मध्ये शिवाजीराजांनी किल्ला बांधायला घेतला. तोपर्यंत इंग्रजांनी मुंबई बेटावर आपले बस्तान बऱ्यापैकी बसवलं होतं. त्यांनी या किल्ल्याचा उपयोग त्यांच्यावर वचक बसवण्याकरिता होईल हा धोका ओळखून, या किल्ला बांधणीस जोरदार विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मराठय़ांनी तात्पुरती माघार घेतली. १६७९ मध्ये महाराजांनी पुन्हा खांदेरीचा ताबा घेऊन किल्ला बांधणीस सुरुवात केली. परत इंग्रजांनी विरोध करण्यास सुरुवात केली. पण मराठय़ांनी दाद तर दिली नाहीच. उलट मराठय़ांच्या आरमारांनी इंग्रजांच्या आरमारावर हल्ला केला. या आरमार युद्धात इंग्रजांचं एक जहाज मराठय़ांना मिळालं. शेवटी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. जंजिऱ्याच्या सिद्धी कासम या हबशी नवाबालाही शिवाजीराजांचं वर्चस्व मान्य होणार नव्हतं. त्यानं १६७९-८० दरम्यान खांदेरीवर हल्ला करता करता उंदेरी बेटच बळकावलं. लगोलग त्यानं उंदेरीवर किल्लाही बांधला. हा उंदेरी किल्ला घेण्याचा प्रयत्न मराठय़ांनी बऱ्याच वेळा केला, पण त्यांना त्यात यश आलं नाही. पुढे १७६० मध्ये पेशव्यांनी उंदेरी मिळवला.  खांदेरी किल्ल्यावर १८९१ सालातील मोठी घंटा पाहावयास मिळते.





‘खांदेरी-उंदेरी दोघी जावामध्ये कुलाबा किल्ला खातो हवा’ अशी ओळ आपण लोकगीतांमधून ऐकत असतो. खांदेरी-उंदेरी हे जलदुर्ग अलिबागजवळच्या समुद्रात आहेत. त्याला वाचविण्याची गरज आहे.
शिवरायांच्या या अद्वितीय स्थापत्यकलेच्या साक्षी आहे जलदुर्ग खांदेरी! 
उंदेरी किल्ला सध्या ओसाड आहे.तर खांदेरीवर दिपगृह व वेताळाचे देऊळ असल्याने वहिवाट आहे.पण खांदेरी जलदुर्ग आजही विपन्नावस्थेत आहे. 






खांदेरी व उंदेरीला जाण्यासाठी यांना संपर्क केल्यास बोटीची सोय होईल.

  अश्विन बुंदके      ९७६७ ००८४७२      थळमार्गे
  अजिंक्य बांद्री      ९२७१ ७५९७९५     अलिबागमार्गे 

No comments: