
पाटी पेन्सिल हातात धरण्याच्या वयात, सवंगड्यांसमवेत बागेत रेंगाळण्याच्या काळात या चिमुकल्यांचे हात कमाई मिळण्यासाठी धडपडतात.लहान वयात अंगावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याने त्यांचे बाल्य कुस्करले गेले आहे.त्यांच्या शिक्षण, भविष्य आणि बदलाचा मार्गच खुंटत असल्याचे वास्तव स्वीकारायला हवे. त्यांची या दुष्टचक्रातून सुटका होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोवळ्या वयात केलेल्या अवजड कामांमुळे न भरून येणारी शारीरिक, मानसिक हानी होत असताना यावरचे उपाय मात्र त्रोटकच आहेत.त्यामुळेच बालवयातील या ओझ्यामुळे त्यांचे बाल्यच हरवते आहे.बालकामगार हा प्रश्न अधिकाधिकच गंभीर होत असताना राजकीय इच्छाशक्ती मात्र अपुरीच पडत आहे.बालकामगारांच्या शोषणाविषयी ज्या देशांतील नागरिकांत सजगता आहे, तेथे बालकामगारांचा वापर करणाऱ्या उद्योजकांच्या उत्पादनांवर स्वेच्छेने बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असतो. भारतात मात्र अजूनही नागरिकांत एवढी संवेदनशीलता दिसत नाही. अनेक अवैध व्यवसाय आणि धंदे सुरू असताना येथे सर्रास आणि राजरोसपणे बालकामगारांचा वापर होत आहे. कमी पैशात अधिकाधिक काम करून देणारे यंत्र म्हणून या चिमुकल्या हातांकडे बघितले जाते आणि या बालकांचे आयुष्यच या दाहक विनाशाकडे वळते. काही अपघातातून बालकामगार बळी पडत आहेत. जुन्या काचेच्या बाटल्या धुऊन स्वच्छ करणे, तयार कपडे, पाणीपुरीच्या पुऱ्या, फरसाण तयार करणे, जरीकाम, लेदर वर्क, हॉटेल आणि खानावळींचा समावेश आहे. जरीकाम,गॅस भरण्याचे काम,फटाक्यांच्या कारखान्यात, कापेर्ट इण्डस्ट्रीत बालकामगारांची संख्या वाढत आहे. उद्योगात मोठ्या प्रमाणावर छोटे हात राबत आहेत. बालमजुरीचे मूळ हे कमालीच्या दारिद्यात आहे आणि असंख्य बालकांना जगण्यासाठी मजुरीशिवाय पर्याय नाही या वास्तवाची त्यांना जाणीव आहे, हे यामागील मुख्य कारण आहे . बालमजुरी रोखण्यासाठी सरकारने केलेले कायदे करुन समाजात माफक जागरूकता निर्माण केल्याने बालमजुरीविरोधी चळवळ उभी केली तरच राज्यात बालकामगार मुक्त होतील.
No comments:
Post a Comment