Sunday, April 29, 2012

चहाला मिळणार मान

        चहा हे उत्साहवर्धक पेय.बहुतेक सर्वाची सकाळ चहानेच होते.दिवसाची सुरुवातही चहानीच होते.मरगळलेल्या मनाला हे पेय तरतरी आणते खरे; पण पुढे पुढे आवश्यकता असो की नसो माणसे केवळ सवयीनुसार चहा पीत राहतात.सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी हातात हवा तो चहाचा कप. नसला तर जीव अगदी  कासावीस होऊन जातो. मनाची सुस्ती घालवून दिवसाची सुरुवात ताजेतवाने करणारा ' चहा ' लवकरच आपल्या देशाचे राष्ट्रीय पेय म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. कोट्यावधी भारतीयांची सकाळ गोड करणारा चहा आता देशाचं राष्ट्रीय पेय होणार आहे.


पुढच्या वर्षी १७ एप्रिलला चहाला राष्ट्रीय पेय घोषित करण्यात येणार आहे. देशातली ८३ टक्के कुटुंब दररोज सकाळी चहा घेतात. त्यामुळेचं सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 देशातले पहिले असामी चहा उत्पादनक मणिराम दिवाण यांच्या दोनशे बाराव्या जयंतीच्या निमित्ताने ही अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षीपासून देशाचे 'राष्ट्रीय पेय' कुठले असा प्रश्न विचारला तर तुम्हाल चहा हे उत्तर बिधानस्तपणे देता येणार आहे.

          करोडो भारतीयांना रोज सकाळी उठल्यावर अत्यावश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर किंवा गावोगावी जर एक गोष्ट सहज आढळत असेल, तर ती म्हणजे चहाची टपरी.सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चहाशिवाय दिवस घालवणारा माणूस किमान आपल्या देशात तरी विरळा आहे. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना चहा लागतो. तो मिळाला नाही तर उत्साह येतच नाही. ऑफीसमध्ये कामाचा कंटाळा आला की चहाची ऑर्डर सुटते. बाहेर पाय मोकळे करायला जाणार्या बाबूंच्या सेवेला गाडीवरचा कटींग चहा हजर असतो. घरी कुणी पाहुणा आला तर `किमान चहा तरी घ्या’ असा आग्रह होतोच. पूर्वीच्या काळी घरात येणा-या माणसाचे स्वागत गूळ पाणी देऊन होत असे, आता त्याची जागा चहाने घेतली आहे. आपल्या आहारात चहापान एक अत्यावश्यक बाब बनली आहे.  
     
       चहाला राष्ट्रीय पेयाचा दर्जा देण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे संघटित क्षेत्रामधील सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा हा उद्योग आहे आणि निम्म्याहून अधिक चहा उद्योगांत महिलांचा समावेश आहे.

        महाराष्ट्रात सर्वाधिक प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा होय. आपल्याकडे चहा साखर व दूध घालून घेतला जातो. चीन व  जपानमध्ये मात्र साधा; कोरा चहा पिण्याचीच पद्धत आहे. कोरा  चहा शरीराला अधिक फायदेशीर आहे.पाण्यानंतर सर्वांत स्वस्त पेय चहा हेच आहे.घरापासून ते काँलेजचा कट्टा, आँफिस ते मिंटिग किंवा पाहण्याचा कार्यक्रम असो या सगळ्यांचीच गोड सुरुवात होते ती चहामुळेच.राजकारणातही ह्या चहापानाच्या कार्यक्रमाला मोठे महत्व आले आहे.

     रोज दोन कप चहा महिलांच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गर्भधारणेलादेखील मदत होत असल्याचा दावा वैद्यकीय संशोधकांनी सर्वेक्षणाअंती केला. रोज नित्य दोन कप चहा पिणार्‍या महिलांमधील गर्भधारणेची शक्यता 27 टक्क्यांनी बळावते.


         जगभरातील पेयप्रेमींना आपल्या नैसर्गिक स्वादाने भुरळ घालणा-या आणि त्यांची तलफ भागविणा-या चहाला राष्ट्रीय पेय म्हणून जाहीर करण्याची औपचारिकताच उरल्याच्या पार्श्वभूमीवर 'पेल्यातील वादळ' उसळले आहे. चहा नव्हे दुधालाच राष्ट्रीय पेयाचा दर्जा देण्याची मागणी 'अमूल' या देशातील सर्वात बड्या दूध उत्पादक महासंघाने केली आहे. 'चहा पिण्याने येणारी ताजेपणाची अनुभूती दुधामुळेच येते,' अशी जाणीवही 'अमूल'ने करून दिली आहे.

         जगभरात सर्वाधिक चहाचे उत्पादन जरी भारतात घेण्यात येत असले,तरी दुधाचे उत्पादन चहाच्या तोडीसतोड असल्याचेही स्पष्ट होतघे.सर्वांत अधिक दुधाचे उत्पादन घेणा-या देशांमध्ये भारताने अमेरिकेला केव्हाच पिछाडीवर टाकले आहे.जगभरात सर्व वयोगटासाठी दूध हे नैसर्गिक एनर्जी ड्रिंक आणि पूर्णान्न आहे. सर्वच देशांमध्ये दुधाचा वापर करण्यात येतो.अमूल म्हणते...दूधच 'ड्रिंक ऑफ इंडिया'  

            आता चहा पिताना, राष्ट्रीय पेयाचा आस्वाद घेतो आहे, अशी भावनाही मनात निर्माण व्हायला हरकत नाही.

             

No comments: