Friday, March 6, 2015

समाजव्यवस्थेचे अपयश


निर्भया’वर तयार करण्यात आलेल्या ‘इंडियाज डॉटर’या डॉक्युमेंटरीमुळे जगभरात एकच खळबळ उडालीये. भारतात याचे तीव्र पडसाद उमटले आहे.बीबीसीच्या पत्रकार लेझ्ली उडवीन यांनीच निर्भयावर बलात्कार करणार्‍या मुकेशकुमारची मुलाखत तिहार तुरुंगाच्या परिसरात घेतली होती. या मुलाखतीमध्ये मुकेश सिंहने केलेल्या वक्तव्यांनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.त्यातील जो आक्षेपार्ह भाग इंटरनेटवर आधीच प्रक्षेपित झालेला आहे .त्यातून सडक्या, रोगट पुरूषी मानसिकतेचे उघडेवागडे दर्शन घडते.ज्या नीचपणे मुकेश सिंग हा आरोपी आपल्या गुन्ह्याबद्दल यत्किंचितही पश्‍चात्ताप व्यक्त करीत नाही, उलट त्या दुर्दैवी मुलीलाच सदर घटनेबद्दल जबाबदार धरतो, तिने प्रतिकार केला म्हणूनच तिच्यावर पुढचे अत्याचार झाले असा बचाव मांडतो, ‘रात्री मिठाई उघड्यावर ठेवाल तर कुत्री येऊन खाणारच’ अशी भाषा आरोपींचे उच्चविद्याविभूषित वकील वापरतात, ते पाहता आजही स्त्रीकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन काय आहे त्यावर झगझगीत प्रकाश पडतो.स्त्रीकडे पाहण्याचा आणि तिच्यावरील अत्याचारांसाठी तिलाच दोषी धरण्याचा भारतीयांचा हा दृष्टिकोन पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेला आहे आणि आज एकविसाव्या शतकामध्येही तो बदलू शकलेला नाही.  
न्यायालयात निर्भया प्रकरणी सुनावणी सुरू होती, तेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तेथे मनाई करण्यात आली होती. असे असताना आरोपीची मुलाखत घेण्याची परवानगी कशी दिली गेली हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे.निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना अद्याप त्यांच्या क्रौर्याची शिक्षा होऊ शकलेली नाही यामुळे अस्वस्थ असलेल्या भारतीय समाजमानसाच्या संतापाचा कडेलोट आरोपींच्या विकृत विधानांमुळे झालेला आहे. ‘निर्भया’ प्रकरण घडून गेल्यानंतरही परिस्थितीत आणि लोकांच्या मानसिकतेत कोणताही गुणात्मक फरक पडलेला नाही, हे स्पष्ट आहे. 

     दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला मुकेश सिंग या आरोपीची मुलाखत   घेऊन ती प्रसारीत करुन मुकेश सिंगला हिरो केला आहे. समाजात महिलांविषयी असाही  विचार करणारी कीड असल्याचे यानिमित्ताने समोर आलेले भीषण वास्तव अधिक दुर्दैवी आहे.आरोपी मुकेश सिंग हा काही समाजसुधारक नाही.तो एक आरोपी आहे.त्याची मुलाखत प्रसारण करुन विकृतीला प्राधान्य दिल्यासारखे होईल.समाजात महिलांकडे  पाहण्याचा  द्दष्टीकोन अजून बदलत नाही.हे समाजव्यवस्थेचे अपयश आहे. देशात बलात्कार थांबवणे कठीण जात आहे म्ह्णून  पिडितांचे  धिंडवडे  निघणार नाहीत यावर तरी लक्ष देण्याची गरज आहे.महिलांच्या बाबतीत लोकांची मानसिकता बदलावी अशी सगळ्यांची मागणी होती. 

निर्भयाच का, दाभोळकरांनीही लोकांची लूट शांतपणे होऊ दिली असती आणि श्रद्धेच्या व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय दिला नसता, तर त्यांची तरी कशाला हत्या झाली असती? तसेच पानसरे. उगीच अन्यायाला प्रतिकार करतात म्हणून तर या लोकांच्या हत्या करणे भाग पडते ना! तेव्हा सर्वांनी यातून शहाणपणा शिकावा आणि गुन्हा, अन्याय, जबरदस्ती या गोष्टींना प्रतिकार करू नये. म्हणजे मुकेशसिंगपासून दाऊद पर्यंत कुणालाही कधी हत्या कराव्याच लागणार नाहीत.असा हा ही एकवेगळा विचार. 


साऱ्या जगतातील महिला नव्हे तर केवळ भारतीय मुलींना समोर ठेऊन, त्या कशा बलात्कारी वृत्तीच्या शिकार बनत चालल्या आहेत, असे चित्र रंगविणे म्हणजे एकीकडे सांस्कृतिक आक्रमण करणे व दुसरीकडे भारताची बदनामी करणेच होय.

तीन वर्ष झाल्यानंतर सुद्धा निकाल लागत नाही. यावरूनच आपला कायदा किती निष्क्रिय आहे हे समजते.जर तुम्ही दररोज वर्तमान बघत असाल तर रोज बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात.लाज वाटायची तर आपल्या मानसिकतेची वाटायला हवी, आपल्या न्याय व्यवस्थेची वाटायला हवी, वकिलांची वाटायला हवी. आपली मान जगभर शरमेन झुकायला लावणाऱ्या घटना रोज आपण आपल्या संसदेत बघतो, प्रशासनात पाहतो. रोज कैक बलात्कार नुसते आपणच वाचतो अस नाही, त्याची जगभर बातमीही होते. अस्वच्छ, अप्रामाणिक, आळशी, अशिक्षित हि आपली ओळख जगभर होतीच, अलीकडे त्यात बलात्कारी या विशेषणाची भर पडलीय. या एका लघुपटाने आपल्यला कुणीतरी आरसा दाखवला इतकच. आरशाला दोष देण्यापेक्षा आपण सुधारुया. या निमित्तानी तरी आपण मानसिकता बदलण्याचा संकल्प करू या.

  मूळ रोगावर आपण काय उपाय करतोय? आज नागालॅँडमधील ४००० जणांच्या जमावाने जे केले ते लोकांना सरकारकडून अपेक्षित आहे!!नागा समुदायाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला संतप्त जनतेने जेलमधून बाहेर खेचून, त्याची नग्वावस्थेत धिंड काढून, त्याला मरेपर्यंत मारून भर चौकात फासावर लटकवल्याची खळबळजनक घटना दिमापूरमध्ये घडली आहे.

No comments: