Sunday, June 5, 2016

आदरनीय व्यक्तिमत्व


 मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री  सुलभा  देशपांडे ह्या एक खंदे व्यक्तिमत्व हरपल्याची भावना  व्यक्त होत आहे.नाटक, मालिका तसेच     मराठी आणि   हिंदी चित्रपट यांना जोडणारा सुलभा देशपांडे     नावाचा महत्त्वाचा दुवा निखळला.आपल्या सहज अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आणि सर्वाची पडद्यावरची  प्रेमळ 'आई' अशी ओळख असलेल्या सुलभा देशपांडे.अशा या    अष्टपैलू मराठी  अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले  आहे.   


 १९६०पासून सुलभा देशपांडे नाट्यसृष्टीशी संबंधित होत्या. विजय तेंडुलकर, विजया मेहता यांच्यासोबत त्यांनी ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेची चळवळ सुरू केली. पण पुढे ‘रंगायन’ फुटल्यावर १९७१मध्ये त्यांनी त्यांचे रंगकर्मी पती अरविंद देशपांडे तसेच नाट्यकर्मी अरुण काकडे यांच्यासमवेत ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेचे सुकाणू हाती धरले. ‘आविष्कार’ने प्रायोगिक रंगभूमीवर ‘छबिलदास चळवळ’ रुजवली आणि समस्त नाट्यसृष्टीला तिची दखल घेणे भाग पाडले.

सुलभा देशपांडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या सुलभा कामेरकर! आधी त्या छबिलदास शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तिथेच त्यांच्यात नाट्यबीज रोवले गेले. याच काळात त्या ‘रंगायन’च्या संपर्कात आल्या. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. १९६७मध्ये त्यांनी ‘शांतता... कोर्ट चालू आहे’ या नाटकात ‘बेणारे बाई’ ही भूमिका रंगवली आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचल्या. या नाटकातले त्यांचे स्वगत आजही माइलस्टोन म्हणून ओळखले जाते. एकीकडे ‘आविष्कार’ची धुरा वाहत असतानाच त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांकडेही पावले वळवली.

‘आविष्कार’ने बालनाट्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने ‘चंद्रशाला’ संस्थेची स्थापना केली आणि त्यात सुलभा देशपांडे यांचे मोठे योगदान होते. या संस्थेने ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक रंगभूमीवर आणले. हे नाटक प्रचंड गाजले आणि ‘चंद्रशाला’ची ख्याती वाढत गेली. ‘बाबा हरवले आहेत’, ‘पंडित पंडित तुझी अक्कल शेंडीत’ अशी नाटके सादर करून त्यांनी ‘चंद्रशाला’चे नाव प्रकाशात आणले. अरुण काकडे यांच्या साथीने त्यांनी ‘आविष्कार’ अखंड कार्यरत ठेवली. मराठी चित्रपटांसह, दूरचित्रवाणी मालिका आणि अनेक हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.

पुरस्कार : संगीत नाटक अकादमी पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, गणपतराव जोशी पुरस्कार, वसंतराव कानेटकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, तन्वीर सन्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला. ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करून राज्य शासनाने त्यांच्या रंगभूमीवरील निष्ठेचा यथोचित गौरव केला.

मराठी चित्रपट : जैत रे जैत, भूमिका, हेच माझं माहेर, मला आई व्हायचंय, चौकट राजा, विहीर, हापूस, इन्व्हेस्टमेंट इ. ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व हरपले आहे. आविष्कार या नाट्यनिर्मितीच्या माध्यमातून त्यांनी बालरंगभूमीला व्यासपीठ मिळवून दिले. ‘शांतता... कोर्ट चालू आहे’मधील बेणारे बाई, ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा ते हल्लीच्या ‘मिसेस तेंडुलकर’ या विनोदी मालिकेतील राणे आजी या भूमिकांमधील त्यांचा बाज, आवाका, एकूण मांडणीतील त्या व्यक्तिरेखेची व्याप्ती हे सारेकाही भिन्न. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीला महाराष्ट्राने गमावले आहे.

No comments: