Saturday, August 6, 2016

सुंदर, साजिरा श्रावण आला!

                          सुंदर, साजिरा श्रावण आला !




हासरा नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला
तांबुस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला
मेघांत लावीत सोनेरी निशाणे आकाशवाटेने श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात, केशर शिंपीत श्रावण आला
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे, धावे माळावर, असा खेळकर  श्रावण आला
                                                                              सृष्टीत सुखाची करीत पेरणी आनंदाचा धनी श्रावण आला




 श्रावण म्हणजे निसर्गाची रंगपंचमी. ओल्या मातीतून, गंधातून पुलकित करणाऱ्या या काळात नव्या पानाफुलांच्या आगमनाने श्रावणाच्या बहराला पूर्तता येते.सृष्टीने रानफुलांची कोवळ्या किरणांनी विणलेली सुंदर भरजरी किनार असलेला हिरवा शालू नेसताच श्रावणाच्या आगमनाची चाहूल लागते.  

 श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन. हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. ज्येष्ठात सुरू झालेला पावसाळा श्रावणात चांगलाच स्थिरावलेला असतो. या दिवसांत ऊन-पावसाचा लपंडाव चाललेला आढळतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पीछेहाट होऊन सूर्याची किरणे धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग, सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात. जलधारांची बरसात करू लागतात. जलबिंदूंच्या माध्यमातून सूर्याच्या सप्त रंगांचे मनोहारी दर्शन घडविणारा श्रावण.कधी ऊन तर कधी पावसाच्या खेळात हिरवाईने नटलेली सृष्टी ही श्रावण मासाची खासियत.





मृग संपले आणि त्या जोरदार पावसाच्या आगमनाने सारे काही मनासारखे घडून आले. नदी-नाले, ओढे तुडुंब झाले. धरणे भरू लागली.  चांगला पाऊस कोसळू लागला. विहिरींना पाणी आले परिसर हिरवागार होऊन एका नव्या नवलाईने चिंब भिजून गेला. काय विलक्षण सामर्थ्य आहे या निसर्गशक्तीत.. 




 व्रतवैकल्याचा आणि सृष्टीला हिरवागार शालू नेसवलेला सुंदर-साजिरा श्रावण हा आज धरतीवर पाऊल ठेवेल. वसंतऋतूपेक्षा वेगळ्या तऱ्हेच्या पावसाळी फुलांनी हिरव्यागार वृक्षलतांनी नटलेली विलक्षण चिरसुगंधी विविधरंगी फुले हसऱ्या-नाचऱ्या श्रावणाला लाजरा बनवतात.. 


    श्रावणाच्या आगमाने अवघी सृष्टी हिरवीगार झाली आहे. वेगवेगळी फुलेही उमललेही आहे. त्यांवर भिरभिरणारी फुलपाखरे बघतांना मन सुखावते. त्याचे मनमोहक रंग जणू सर्वांवर मोहिनीच करतात. सगळ्या सृष्टीसकट मनामनांची मरगळ धुऊन काढणारा श्रावण सगळ्यांचाच सखा बनतो, तो आपल्या विविध रंगांच्या नर्तनाने सगळ्यांची मनं जिंकतो. 


             चोहीकडे दाटलेली हिरवळ आणि ’क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे’ अशा आल्हाददायी वातावरणामुळे खरोखरंच ’श्रावण मासी हर्ष मानसी’ झालेला असतो. श्रावण म्हणजे पावसाच्या सरी, हिरवी दुलई पांघरलेली वसुंधरा, प्रत्येक थेंबानिशी स्वच्छ झालेले सृष्टी, 





निसर्गातील स्थित्यंतरांचे मनमोहक रुप दाखविणारा महिना सारी सृष्टी आनंदोत्सव साजरा करते.




No comments: