Saturday, October 10, 2020

टपाल दिन

 टपाल दिन 

दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. हा खरंतर टपाल विभागाचे अधिकारी आणि पोस्टमन यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. कुठलाही ऋतू असो त्याचा सामना करीत टपाल कर्मचाऱ्यांनी निष्ठापूर्वक सेवा दिली आहे व देत आहेत. इंटरनेटच्या काळात आजही लोक टपालसेवेचा वापर करताना दिसतात. हा टपालसेवेवरचा विश्वास आहे.टपाल पाठवण्याचं सर्वात सोपं व स्वस्त साधन आहे ते म्हणजे टपाल सेवा. आज पत्रांची जागा ई-मेल आणि सोशल मीडियाने घेतली आहे.मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल,सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येत असल्याने टपाल सेवेचे महत्व कमी झालेले आहे.तीही संवाद माध्यमे शोधलीत तरी पत्राची किंवा एकंदरितच लिखाण माध्यमाची गोडी इतर कशालाही नाही हे बाकी खरचं. 


आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही असे. एक काळ असो होता जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. लोक लांब असले तरीही पत्राद्वारे प्रेम व्यक्त करत असत. मात्र आज लोक आधुनिक तर होत असून मानसिकदृष्ट्या एकमेंकांपासून लांब जात आहेत. जेव्हा एखादे टेलीग्राम यायचे तेव्हा एक संकेत असायचा की, काहीतरी वाईट घडले आहे आणि जेव्हा एखादे पत्र यायचे तेव्हा लोक समजून जायचे की, काहीतरी आनंदाची बातमी आहे.


कधी आनंदवार्ता यायची तर, कधी मनाला रुखरुख लावणारी, व्यथित करणारी बातमीही. कधी परीक्षेचा रिझल्टही कळायचा. तर कधी कुणाच्या तरी घरी नव्याने आगमन झालेल्या पाहुण्याबद्दल समजायचं. अनेक भावभावना तुझ्या एकाच रुपातून आमच्यापर्यंत पोहोचायच्या. त्यात पोस्टमन काकांशीही तुझ्यामुळे निर्माण झालेलं एक नातं.अविरतपणे चालणारे, न थकता. त्यांचा तो टिपिकल खाकी ड्रेस, खांद्याला ती त्यांची नेहमीची खाकी रंग असलेलीच बॅग, त्यातून प्रत्येक पत्र अगदी अचूक पत्त्यावर पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मनापासून नमस्कार. मला यावेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आठवतं. डाकियाँ डाक लाया....खुशी का पयाम कही....

जुन्या काळातील पोस्ट ऑफिस आणि सध्याचे पोस्ट ऑफिस मधे अमुलाग्र बदल झाल्याचे अनुभवण्यास मिळते.इतर सेवां सोबत पोस्टाची बँकिंग सेवा सुद्धा चांगली आहे.आजही सुरक्षित ठेव ठेवायची असेल तर पोस्टासारखा उत्तम पर्याय नाही असे जाणकार आणि तज्ञ मंडळीचे मत आहे आणि ते खरेही आहे.कोरोना महामारीच्या काळातही ग्राहकांनी पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेतला. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमध्ये पोस्टाच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपये इतर बँकेच्या आपल्या खात्यातून उलाढाल केली. टपाल खात्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येथील प्रत्येक कर्मचारी कटिबद्ध आहे आणि तो तितक्याच  प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान देत आहे! त्यामुळे आधुनिकतेची कास धरत माहीती तंत्रज्ञानाच्या युगात टपाल खातेसुद्धा तितक्याच समर्थपणे वाटचाल करीत आहे.



जागतिक टपाल दिनाच्या पोस्टमन काकांच्या अथक सेवेला गाठोड्यासारख्या गाठोडभरुन शुभेच्छा.


No comments: