Wednesday, June 16, 2021

शाळा भरल्याच नाही.


यावर्षीही करोनामुळे शाळा भरल्याच नाही. यंदाही शाळेची घंटा वाजलीच नाही.कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. तिस-या लाटेमुळे राज्यातील शाळा सुरु करण्याची धाई करु नये.


उन्‍हाळी सुटी संपली की शाळेचे वेध लागायचे. शाळेसाठी विद्यार्थ्यांची तयारी झालेली असायची. नवे दप्तर, गणवेश, पुस्तक व वह्या, डबा व रेनकोट काय मजा असायची. नवा वर्ग व नवे मित्र मैत्रीणी भेट व्हायची. नवे शिक्षक व त्यांची भिती असायची. पहिला दिवस तर खासच असायचा.पहिल्यांदा शाळेत जाणा-या लहान मुलांचे रडणे व बालगोपाळांचा किलबिलाट मजेशीर असायचा.यावर्षी लहान मुलांच्या शाळेची लगबग दिसली नाही. 


"अरे उठ लवकर शाळेला उशीर होतोय्‌’’ इथपासून ते शाळेतील प्रार्थनेने सुरुवात व्हायची ती आपल्या शालेय दिवसांची! त्यानंतर वेगवेगळे तास आणि वेगवेगळे शिक्षक त्यात काही आवडीचे, तर काही नावडीचे. लहानपणी ते शाळेचे सहा तास कधी संपतात, असं वाटायचं आणि त्यात असणारी ती मधली सुट्टी तिची वाट पाहण्याची मजाच काही और होती. शाळेत जितके विषय तितकेच शिक्षक, त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धती आणि स्वभाव यामुळे नकळतच काही विषय आवडीचे झाले, तर काही नावडीचे.. पण, प्रत्येक विषयाच्या तासाची मजा ही वेगवेगळी होती. शाळेत दंगामस्ती करायची व शिक्षाही भोगायची असा दिनक्रम असायचा.शाळेतील दिवस व मजा हवीहवीशी वाटायची.आपल्या जिगरी मित्रासोबत आवडीचा बेंच पकडण्याची लढाई लढायला ही फार मजा यायची.शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची.  



परीक्षा न होताच यंदा उन्‍हाळी सुट्टी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या वर्षीही शाळा ऑनलाईन सुरु झाल्याने बच्चे कंपनी बरीच नाराज झाली आहेत. लॅपटॉपच्या सोबतीने सुरु झालेली शाळा, विद्यार्थ्यी नाकारत आहेत.हजारोंचा स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपच्या समोर बसून शाळा शिकायचे दिवस आले आहेत.शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारी लहान मुलं दिसायची. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेली दिसतात. शालेय शिक्षणाबरोबर लहान मुलांना मोबाईल, टॅब व लॅपटॉप चांगल्या प्रकारे हाताळायाला येऊ लागले आहेत. शाळेतल्या शिक्षणातील मजा डिजिटल शिक्षणपद्धतीत नाही. ही एक तात्पुरती सोय आहे. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल. हे संकट दूर होऊ शाळा लवकरच सुरु होतील अशी आशा करूया. 


प्रत्येकाच्या जीवनात शाळा खूप महत्वाची असते.


No comments: