Wednesday, March 30, 2022

तारुण्यातील सोबती

                                   १५.०३.२०२२ रोजी महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झालेला लेख 




            तरुणाईतील सोबती   (गाडी माझी भारी)

मी कॉलेज पूर्ण करुन नोकरीला लागलो होतो. पैसे जमवायचे आणि आवडेल तशी बाइक घ्यायची,असे स्वप्न पाहू लागलो. १९८३ च्या काळात मोटर सायकल आता सारख्या दुकानात जाऊन खरेदी करता येत नव्हत्या. कंपनीमध्ये काही रक्कम भरून मोटर सायकल बुक करावी लागत असे. घरात कोणाला न सांगता मी ’सुझुकी’ या कंपनीच्या जाहिराती प्रमाणे पैसे भरून मोटर सायकल बुक केली. गाडीची वाट पाहता पाहता एक वर्ष गेले. एका दिवशी कंपनीचे पत्र आले.आपली गाडी उपलब्ध आहे पैसे भरुन दुचाकी घेऊन जाणे. घरात ही बातमी दिल्यानंतर घरातून गाडी घ्यायला विरोध झाला. मी सर्वाना विश्वासात घेतले पण काही उपयोग झाला नाही. दुचाकीचे खूपच अपघात होतात या भितीमुळे गाडीसाठी विरोध होत होता.शेवटी मी हट्टच केला. तेव्हा बाबांनी रागाने मला बॅकेचे पासबुक आणून दिले. तुला काय करायचे ते तु कर. आम्हाला काही विचारू नकोस.

मी पैसे भरले व घाबरत घाबरत गाडी घरी घेऊन आलो. आमच्या कुंटुबातील ही पहिलीच गाडी पाहिल्या नंतर सर्वांनी तिचे स्वागत केले.बाबांनी दुचाकी सावकाश चालव व सुरक्षित चालव असा मोलाचा सल्ला दिला.मी गाडी चालवण्यास शिकलेलो होतो.पण गाडी चालवण्याचा परवाना नसल्याने मोठ्या रस्त्यावर गाडी चालवण्यास जात नव्ह्तो.काही महिन्यानंतर मित्रासोबत जाऊन परीक्षा देऊन परवाना मिळवला आणि सुसाट निघालो.  

काही दिवसांनी रोज ऑफिसला दुचाकी घेऊन जाऊ लागल्याने सोयीचे वाटले. येताना जाताना सर्वांची कामे करू लागलो. मित्रांकडे अशी गाडी नसल्याने जरा भाव खाऊ लागलो.त्यांना घेऊन लांब लांब फिरण्यास जाऊ लागलो.घरात कोण आजारी असले तर त्याला गाडीवरून दवाखान्य़ात नेत होतो.बाजारहाट करायचो.गाडी असल्याने घरच्यांची व शेजा-यांची कामे करीत असे.


मी गाडीला खूप जपत होतो. रोज साफ करीत गाडी स्वच्छ ठेवत असे.तिच्या प्रेम जडले होते.एकादा चरा पडला तर वाईट वाटायचे. मित्रांसोबत मोटर सायकलहून लांबलांबच्या मोहिमा यशस्वी केल्या. भावाला घेऊन गावाला जात असे. जसे मी गाडीला जपले त्याच प्रमाणे गाडीनेही मला जपले कोठे अपघात झाला नाही व कधीच कसला त्रास दिला नाही.

लग्न ठरल्यानंतर होणा-या बायकोला गाडीवरून खूप फिरवले.तिला गाडीवरून फिरायला आवडायचे पण मी गाडीवरचे प्रेम दर्शवले की ती नाराज होत असे. लग्नाच्या गडबडीत तर गाडीला दम खायला वेळ मिळाला नाही. लग्नाच्या धामधुमीत आमंत्रणापासून खरेदीपर्यत सर्व कामे गाडीच्या मदतीने केली. तिची मला कायम सोबत मिळाली.

माझी लाडकी दुचाकी गाडी काही वर्षानंतर म्हातारी झाली. काय करायचे काही ठरत नव्हते. शेवटी एका सामाजिक संस्थेला त्यांना ग्रामीण भागातील त्यांच्या कार्यासाठी वापरण्यासाठी दिली. भंगारात टाकण्यापेक्षा कोणच्या तरी काही कालावधी तरी उपयोगात येईल, असा विचार करीत गाडीचा निरोप घेतला. रोजच्या सवयीमुळे काही दिवस मला गाडीची खूप आठवण येत होती. तिच्या सारखीच दुसरी दुचाकी घरी आणली.      





No comments: