Monday, June 19, 2023

गावपण अनुभवण्यासाठी

 

०६.०६.२०२३  रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स  या वॄतपत्रास ’पहिल्या घराची गोष्ट’ या सदरात  प्रसिध्द झाला आहे 





पहिल्या घराची गोष्ट 


कौलारू घराची स्वप्नपूर्ती  



शहरात राहिल्याने गडबड गोंधळाचा कंटाळा आलेला असतो. मोकळी शुद्ध हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटते. कारण काहीही असू दे, गावामधले घर कौलारू प्रत्येक संवेदनक्षम माणसाला साद घालत राहते.  हे कौलारू घर म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. कोकणातल्या पाऊलवाटा नष्ट झाल्या. दिव्याचे कंदील इतिहासात जमा झाले, विहीरीला पंप बसले, लालमातीची धूळ खाली बसून त्यावर डांबरीकरण झाले, पण कौलारू घराची सय जात नाही.  शहरात सर्व असताना व ग्रामीण जनता मुंबईकडे मोठय़ा संख्येने आकर्षित होत असताना गावाचे आकर्षण मनाला का वाटत असावे? कदाचित गावाकडची माती साद देत असते. गावाच्या आठवणीने स्वप्ने होती सुरू खेडय़ामधले घर कौलारू


ठाणे शहरात माझे स्वत:चे घर आहे. गावाला आमचे घर नव्हते. एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. कोकणाची ओढ असल्याने सेवानिवृत्त होण्यापूर्वी गावाला स्वत:चे कौलारू घर बांधायचे स्वप्न होते. ठाण्याहून दापोलीला जाऊन घर  उभारण्यास खूप मेहनत घ्यावी लागली. कर्ज घ्यावे लागले. पुणे, दापोली व ठाणे असा सारखा प्रवास सुरु होता. त्यावेळी ’घर पाहावे बांधून’ याची प्रचिती आली होती. माझे घराचे स्वप्न सेवानिवृत झाल्यावर पूर्ण झाले. दापोलीजवळ एक गृहसंकुल म्हणजेच छोटेसे गाव उभे राहत आहे. त्या गृहसंकुलात छोट्याश्या जागेवर छोटेसे घर बांधले आहे. माझे नवे घर पारंपारिक पध्दतीने म्हणजेच जांभ्या दगडांच्या भिंतीचं आणि कौलारू छपराचं आहे. कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात जांभा दगड मिळत असल्याने इथली घरे जांभ्या दगडाची म्हणजेच चिर्‍याची आणि पावसामुळे उतरत्या कौलारू छपराची असतात. प्रत्येकाची आपल्या घराची कल्पना वेगळी असते, आपलं घर इतरांहून वेगळं असावं, वेगळं दिसावं या अनुषंगाने मी पण माझ्या घरात माझ्या भावना जपल्या आहेत. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा,असेच माझं घर आहे. गृहसंकुलात शहरातील सगळ्या सुविधा असल्यातरी जांभ्या दगडांच्या व कौलारू घरानं गावपण अनुभवायास मिळत आहे. घरात गेल्यावर सुख व समाधान मिळते.घरात राहिल्याने आनंद मिळतो. 


घर हा शब्द जरी दोन अक्षरांचा छोटा शब्द वाटत असला तरी देखील त्या शब्दाच्या मागे भावनिक आधार फार मोठा आहे. माझे घर आकाराने खूप मोठे ही नाही आणि छोटे की नाही पण अगदी टुमदार आहे. घराच्या अवतीभोवती सुंदर बाग केलेली आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे कोवळे ऊन घरात शेवटपर्यंत पडते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोवळ्या उन्हाचा आनंद फारच मजेशीर वाटतो. संध्याकाळी सुर्यास्त होत असताना देखील घरातून पाहता येते.


माझे नातेवाईक व मित्रमंडळी माझ्या नव्या घरी येऊन राहिल्यावर खुष होऊन परत येण्याची इच्छा व्यक्त करून शहराकडे परततात. 



No comments: