गर्भात काही जेनेटिक विकृती वा जन्मजात शारीरिक दोष नाहीत ना, हे शोधणे आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुकर केले. मात्र या तत्रंज्ञानाचा वापर गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे जाणून घेण्यासाठी करण्यात आला आणि मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जाऊ लागला.' मुलगा हवा' या अट्टाहासाने मुलींची जन्मापूवीर्च हत्या करण्याची परंपरा कायम राहिली.फक्त मुलाला वंशाचा दिवा मानणारी मानसिकता आता बदलायला हवी.स्त्री आणि पुरुषांच्या संख्येत वाढत चाललेली दरी एक दिवस निसर्गाच्या कोपाला निमंत्रण दिल्याशिवाय राहणार नाही.सृष्टीच्या पसा-यांचे सातत्य हे तिचा तोल राखण्यावरच अवलंबून आहे आणि निसर्गत: असलेले स्त्री-पुरुषांचे प्रमाण राखणे,हा सृष्टीचा तोल बिघडू न देण्यातील एक घटक आहे.
ज्यावेळी गर्भावस्थेतच अपत्याचे लिंग जाणून घेण्याइतकी माणसाची 'प्रगती' झाली नव्हती, तेव्हा जन्माला आल्यावर मुलींची हत्या करण्याचा मार्ग अनेक पालक अवलंबीत असत. जन्माला आल्यानंतर ज्यांना जगण्याचे भाग्य लाभत असे, त्यांच्यापैकी अनेकींच्या आयुष्याची दोरी संगोपनातील आबाळ व भेदभाव यामुळे वयाची सहा वर्षे पूर्ण होण्याआधीच तुटत असे.
गर्भातच मुलींची हत्या करण्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम लक्षात यावेत अशी अपेक्षा असते. परंतु भाडोत्री मारेकरी जसे काही हजारांसाठी एखाद्या अपरिचित, कोणतेही वैमनस्य नसणा-या व्यक्तीचा जीव घ्यायला तयार होतात, तसेच गर्भलिंग निदान करून स्त्रीगर्भाच्या हत्येचा मार्ग डॉक्टरमंडळी मोकळा करीत असतात. माफिया आणि त्यांचे भाडोत्री मारेकरी यांना निदान समाजात प्रतिष्ठा तरी नसते, पण हे समाजद्रोही डॉक्टर आणि आपल्याच मुलीचा गर्भातच जीव घेणारे शिक्षित व समृद्ध पालक समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवायला मोकळे असतात.
स्त्रीगर्भाची हत्या हा अत्यंत हीन आणि अमानुष गुन्हा आहे, ही भावना समाजात रुजवण्यात सरकार आणि नागरी समाजाला अपयश आले आहे.कायदा राबवणारी यंत्रणा ही याच समाजातून आलेली असल्यामुळे, गुन्हे नोंदवण्याचे आणि गुन्हेगारांना झटपट व कठोर शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
माणूस जन्माला आल्यावर त्याला अधिकार प्राप्त होतात , पण मुलींना जन्माला यायचाही हक्क नाकारला जातो आहे. जन्म घेतल्याक्षणीच त्यांच्यावरील अन्यायाला सुरुवात होते. मोठेपणीही मुलींची सुटका होत नाही. कधी मूल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढायचं तर कधी विधवा झाली म्हणून तिची हकालपट्टी करायची. समाजाच्या अशा वागणुकीमुळेच कदाचित ही स्त्री दुस-या स्त्रीचा जन्म होऊ देत नसेल.
मुलींचे घटते प्रमाण व फोफावलेली सोनोग्राफी सेंटर्स यांचा थेट संबंध जगजाहीर असून या सेंटर्सचे चालक व स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्यातील अभद युतीतून गर्भातच मुलीची हत्या करण्याच्या धंद्याने वार्षिक राज्यात १५० कोटींची उलाढाल गाठली आहे! कठोर कायदा असूनही अंमलबजावणीतील त्रुटींमुळेच मुलींची संख्या घसरत असल्याचा आरोप सरकारवर होत आहे.
या मुलींच्या हत्तेला हे व्यवसायिक जबाबदार आहेतच पण त्यापेक्षा मुलीच्या जन्मालाच विरोध करणारे कुटुंब जबाबदार व गुन्हेगार ठरत आहेत.समाजात मुलींचे महत्व वाढले आहे तरीही मुलींच्या हत्या होत मुलीचे प्रमाण घटत आहे.न जन्मलेल्या मुलींची लढाई लढण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे.सरकारकडुन कायद्दाची अमलबजावनी होत नसली तरी समाजानेच व सामाजिक संस्थेने सरकारला दोषी न ठरवता मुलींच्या हत्या थांबवण्यास सातत्याने प्रयत्न केले पाहीजेत. निसर्गाची जपणुक करण्यासाठी मुलींच्या हत्या थांबवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
No comments:
Post a Comment