स्वातंत्र्य ही या देशातील शेकडो स्वातंत्र्यविरांची आणि हुतात्म्यांची कठोर तपश्चर्या आहे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी गेल्या शंभर वर्षांत अनेक वीरांनी अन शूरांनी आपल्या रक्ताचे अन प्राणांचे अर्ध्य दिले आहेत. अनेकांनी आपल्या छातीवर बंदुकीच्या गोळ्या मोठ्या आनंदाने झेलल्या आहेत, हे स्वातंत्र्य मिळविण्याकरता काळ्या पाण्याच्या भयंकर नरकात अनेक झुंजार वीर मेलेले आहेत. अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादारांची आणि प्राणांची राखरांगोळी केली आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या राष्ट्राने आजपर्यंत किती रक्त आणि अश्रु गाळले असतील, त्याला खरोखरच सीमा नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले खरे. देशातल्या लक्षावधी लोकांना स्वातंत्र्य कसे असते,ते गोरे असते की काळे असते, ते तीन रंगाचे असते का बिनरंगाचे असते हे अजूनही पाहावयाला मिळालेले नाही. स्वातंत्र्यांच्या अमृताचे ओहळ देशाच्या या कोप-यापासून त्या कोप-यापर्यंत, मोठमोठ्या शहरांपासून लहानसहान खेडेगावांपर्यंत, गरीब जनतेच्या अगदी घराघरापर्यंत, मजूरांच्या अगदी चाळीचाळींपर्यंत, शेतक-यांच्या अगदी झोपडीझोपडीपर्यंत जेव्हा जाऊन पोहोचतील, तेव्हाच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले, असे आपणाला म्हणता येईल.
यावर्षी भारतीय स्वातंत्र्य दिनी देशबांधवांमध्ये आनंद व उत्साहाऐवजी भीती व अस्वस्थता आहे. स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण. त्या दिवशी सर्व दु:खे आणि अपेष्टा विसरून राष्ट्रपेमाचे वारे सर्वत्र वाहावेत,अशी अपेक्षा असली,तरी वास्तव त्यापेक्षा वेगळे आहे, हे मान्य करायला हवे.
झेडांवदन केल्यानतंर सर्व मंत्री, आमदार-खासदार, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे छोटे-मोठे नेते देशप्रेमाची महती विशद करतील.पण पदावर येताना शपथ घेणारे हि मडंळी नतंर कारभार कसे करीत आहेत हे जनतेला माहित झाल्याने देशाची स्थिती बिधडत चालली आहे.हे सर्व सोहळे पोकळ, तकलादू आणि फसवे वाटतात याची जाणीव सर्वांस असूनही स्वातंत्र्य दिनाचे नेहेमीच्या रिवाजाप्रमाणे पण उसन्या उत्साहात पार पाडतात.
गो-यांच्या राजकीय जोखडातून भारत मुक्त झाला, म्हणून स्वातंत्र दिन. पण आज राजकीय नियंत्रणापेक्षा अनेक मोठ्या व जाचक बंधनांच्या बेड्यांमध्ये हा देश आणि समाज जखडला गेला आहे.
भ्रष्टाचाराचे पाट बंधारे फुटून वाहतच आहेत,भारतीय समाज अतिरेक्यांच्या तावडीतून सुटलेला नाही, कर्जबाजारी शेतक-यांची कुटुंबे आहेत,कागदावरील दरडोई उत्पन्न वाढले;पण सामान्य भारतीय आथिर्कदृष्ट्या खरेच संपन्नतेकडे नाही, हि देशाची स्थिती आहे.
स्वराज्य राबवायचे , तर स्वाभिमान टिकवावा लागतो. त्यासाठी ' स्व ' हिताचा बळी देऊन राजशकट हाकावा लागतो. स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्याना स्वहितापलीकडे जाऊन राष्ट्राचा स्वाभिमान टिकवायला सांगणे अवघड आहे. स्वराज्य हवे , पण परकी बनावटीच्या गाड्या आणि उंची वस्तूही हव्यात. त्यामुळे स्वकीय बेकार झाले , तरी चालतील , हा स्वार्थ चालणारा नाही. पण उदारीकरण , ग्लोबलायझेशन अशा गोंडस नावाखाली स्वदेशीचा त्याग करण्यास सिद्ध झालेल्या भारतीयांना खरेच ' स्वराज्य ' हवे आहे काय ?
देशाला स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा देताना पुढील स्वातंत्र दिनापर्यंत देशाची जनता सुखात व आनंदात राहो अशी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment