अण्णांच्या देशव्यापी अंहिसक आंदोलनाच्या माध्यमातून जनतेने आग्रह धरलेल्या तिन्ही मुद्यांचा समावेश असलेला सशक्त लोकपाल कायदा करण्याचे आश्वासन देणारे ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले.
लोकपाल विधेयकात तीन मागण्यांचा समावेश करण्याच्या मुद्यावर संसदेला ‘झुकविल्याचे’ समाधान पदरी पाडून घेत अण्णांनी रामलीला मैदानावरील आमरण उपोषण संपविण्याची आज रात्री घोषणा केल्यानतंर अण्णांच्या समर्थकांनी रामलीला मैदानात जल्लोषाला सुरूवात केली.केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरात जल्लोष सुरू झाला. तिरंगी झेंडे हातात फडकवत, लोक आनंदाने नाचू लागले. भ्रष्टाचाराच्या विरोधातील ही अर्धीच लढाई जिंकली आहे, अजून पूर्ण लढाई जिंकणे बाकी आहे... अशा शब्दांत १२ दिवसांपासून उपोषण करणारे अण्णा हजारे यांनी कार्यकर्त्यांना सावध केले.
सरकारी यंत्रणेविषयीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी निश्चित कालबद्ध यंत्रणा (सिटिझन्स चार्टर), स्थापन करणे, केंद्र सरकारच्या सर्व स्तरावरील कर्मचा:यांना लोकपालाच्या कक्षेत आणणे आणि लोकपालाच्या धर्तीवर प्रत्येक राज्यात लोकायुक्ताची समकक्ष यंत्रणा स्थापन करणे या अण्णांच्या तीन प्रमुख मागण्या आज देशातील सर्व राजकीय पक्षांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून मान्य केल्या.
लोकपाल विधेयक ३० ऑगस्टपूर्वीच संसदेत संमत करून घेण्यासंबंधी अण्णांनी केलेल्या मागणीला सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचेही आज स्पष्ट झाले.
लोकपालाच्या कार्यकक्षेत पंतप्रधानांचे पद, उच्च न्यायपालिका आणि संसदेतील खासदारांचे आचरणाचा समावेश करण्याच्या मागण्यांवरून अण्णांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले होते. पण उपोषण मागे घेत असताना अण्णांच्या या तिन्ही प्रमुख मागण्या जिथल्या तिथेच राहिल्या आहेत. लोकपालाच्या कार्यकक्षेत पंतप्रधानांचे पद आणायचे की नाही, याचा निर्णय संसदेच्या स्थायी समितीला घ्यायचा आहे.आज संसदेच्या माध्यमातून व सहमतीने त्यांच्या तीन मागण्या पुन्हा स्थायी समितीपुढे जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण देश आणि जगभर चर्चेचा विषय ठरलेल्या उपोषणाअंती अण्णांनी नेमके काय साधले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. खुद्द अण्णांनीही हा निम्मा विजय असल्याचे मान्य केले आहे.
लोकपाल कायदा करण्याचे आश्वासन देणारे ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर करायचे होते तर सरकारने बारा दिवस राजकारण का केले? लोकपाल कायदा करण्याची सुरुवात तरी झाली.
भ्रष्टाचारविरोधातील उपोषण आंदोलनाने दिल्लीचे तख्त हलवून टाकणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दलित मुलींच्या हातून ज्यूसप्राशन करून उपोषणाची सांगता केली आहे.
No comments:
Post a Comment