Thursday, July 4, 2013

आयुष्याच्या गोष्टी





                                                आयुष्याच्या गोष्टी
                                               ( १०.०२.१९३४  -  २०.०६.२०१३  )

मनमिळावू,मितभाषी,पण सर्वाची काळजी घेणारे,बुजरे, खुपच भित्रे तसेच साधी राहणी स्विकारलेले कोणालाही दुखविणारे ...  




ईश्वराने मनुष्याला दोन कान व एक मुख दिले आहे,ते अशासाठी की जास्त ऐका आणि कमी बोला.त्याचे तंतोतंत पालन करणारे किंवा मितभाषी किती  "नसावे" याचे उत्तम उदाहरण म्हणजे माझे पप्पा.



लहानपणीच  पितृछत्र हरपल्याने त्यांचे लहानपण सुरुवतीचे शिक्षण गांवी गेले.नंतर  मुंबईत काका काकीच्या नजरेखाली गेल्याने त्यांच्या स्वभावात बुजरेपणा आला होता. अभ्यास करण्यासाठी पूरेशी साधनसामुग्री जागा नसताना देखील काकांच्या मार्गदर्शनाखाली  पप्पानी एसएसीसी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले.

या शिक्षणावर त्यांना  मुंबई.पोर्ट.ट्रस्ट मघ्ये नोकरी लागली.आमच्या समाजात प्रथम एसएससी पर्यतचे शिक्षण सरकारी नोकरी लागलेले पप्पाच होते. शांत अभ्यासू वृत्तीच्या पप्पाना काकांनी घडविले त्यांचे मोठे उपकार आहेत.

नोकरीनंतर समाजातील प्रतिष्ठीत 'सापळे' घराण्यातील सुशिल शिक्षित मुलीशी कु.जिजाबाई गोविंद सापळे हिच्याशी लग्न  झाले.माझगांव वडाळा येथील वास्तव्याने संसार फुलु लागला.तीन मुलगे एक मुलगी असे  कुटुंब.एकट्याच्या नोकरीत चार मुलांचे  संगोपन त्याच्या शिक्षणाच्या खर्चाने घराचा गाडा हाकताना त्यांची ओढाताण होत होती.परंतू आईच्या काटकसरीने कुटुंब सावरले जायचे.

नोकरीतील काही काळ त्यांच्यासाठी वाईट गेला. नोकरीत मोठी जबाबदारी असल्याने ते धाबरले होते.काही काळ मानसिक आजाराने  गांजले होते.त्यावेळी मुलेही लहान होती. त्यावेळेस आईने  मोठा आधार देऊन औषधोपचाराने त्यांना आजारातून बाहेर काढले.पण तरीही आजारपण त्यांच्या जीवनात मोठा आघात करुन गेला   ते त्यांचा आत्मविश्वास हरवून बसले. त्यांना कोणतेही व्यसन नसल्याने ते त्यातून सावरले.

मुलांची शिक्षण झाली. त्यांना नोक-या लागल्यानतंर त्यांची लग्ने झाली.प्रत्येकाने लग्नानतंर वेगळा संसार मांडल्याने कुंटुबाचे स्वास्थ्य विस्कटले नाही.

त्यांच्या लहान मुलास चि.विक्रम यास परदेशात जाण्याची परवानगी देण्यास ते  तयार नव्हते पण कुटुंबियांनी त्यांची काळजी दूर केल्यानंतर त्यांनी लवकरच परत येण्याच्या शपथेवर त्याला परवानगी दिली होती. पण विक्रमने त्यांचा विश्वास संपादन केल्यावर ते विक्रमचा सर्वत्र अभिमानाने उल्लेख करीत असायचे.

त्यांचे अक्षर सुंदर होते.जसे टाईप केल्यासारखे दिसायचे.चांगल्या अक्षराचे म्हणून ते प्रसिध्द होते. त्यांचे वाचन अफाट होते.वाचन हेच त्यांचे जीवन होते.दिवस दिवस पुस्तके वाचायचे.कोणतेही साहित्य वाचायचे.पुस्तक हातात आले की ते सर्व विसरून जायाचे.वाचनाने त्यांच बोलणे कमी झाले होते.व्यवहारापूरते ते संवाद साधायचे.तेच आम्हा सर्वाना खटकायचे.

त्यांना संगीताची आवड  होती.पूर्वी तरुणपणी बुलबुल   व्हाँयोलिन वाजवायचे.नतंर गाणी विशेषात: गझल ऐकण्याची आवड वाढली होती.चित्र उकृष्ट काढायचे.पण या छंदाला त्यांनी जोपासल्याने त्यांच्या चांगल्या कलाकृतीना आपण मुकलो.

टापटीपपणा असल्याने कायम आपल्या दिनचर्येची नोंद दैनदिनीत करीत असत.या नोंदीचा फायदा नेहमीच होत असायचा.स्मरणशक्ती कमी झाल्याने जून्या नोंदीवरुन संपर्कासाठी माहीती मिळायची.

प्रवासाचा नोकरीचा त्रास जाणवत असल्याने मुलांच्या सल्ल्याने त्यांनी ऐच्छिक सेवानिवृती स्विकारली.नोकरीतील दिड वर्षे शिल्लक होती.नोकरी सचोटीने केली. सेवानिवृती नंतरचा काळ त्यांचा मजेत गेला.
               
नातवंड झाली.आजी आजोबा नातवंडात रमली.त्यांचे लाड पुरवण्यात वेळ जात होता.परीस्थिती सुधारल्याने त्यांचे मन संसारात गुंतले होते.आनंदात असायचे.जूने आजार मघ्ये मघ्ये तोंड बाहेर काढायचे.

आमच्या समाजात त्यांना आदर्श मानणारे बरेचजण आहेत.समाजात त्यांना मान होता.कार्यक्रमातून त्यांचा सन्मान होत असे.मित्रपरिवार मोचकाच असल्याने त्यांना ऐकटेपणाचा त्रास जाणवायचा.

परदेशात जाण्यास विमान प्रवासाची भिती असल्याने प्रथम ते तयार नव्हते.पण नतंर त्यांनी भीत भीत ऐकट्याने प्रवास केला.लहान मुलाने त्यांना चार ते पांच वेळा परदेशात, दुबईला नेले होते.तो काळ त्यांच्या जीवनात सर्वात सुखद आंनददाई होता.तिकडे खूप मजेत असायचे.मुलानेही त्यांना खूप फिरवले.जीवनात ज्या गोष्टीना ते मुकले होते त्या सर्व गोष्टी त्यांनी तिकडे उपभोगल्या.आयुष्यात आपण कधी विमानाने परदेशात जाऊ असे त्यांना कधीच वाटले नव्हते. परदेशात केलेली मजा ते कधीच विसरले नाहीत.पण तिकडे गेल्यावर इकडची काळजी असायची इकडून तिकडची काळजी करीत असत. मुलगा कुटुंबासह मुंबईत राहण्यास आल्याने त्यांना आनंद झाला होता.

त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. पण त्यांच्यापुढे सर्वात यक्षप्रश्न होता,तो म्हणजे समारंभात त्यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याचा! एवढ्या लोकांपुढे कसे बोलायचे? परंतू त्यांनी थोडक्यात मुद्देसुदपणे लिहून त्याची तालीम करुन,सर्व हिंमत एकवटून ते क्षण साजरे केले. त्यानतंर त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवसही आम्ही सर्व कुटुंबीयानी रिसोर्टवर साजरा करताना, त्यांना मनोगत व्यक्त करावे लागणार नसल्याने, त्यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. परिणामी त्यांना झालेला आनंद/समाधानाने आम्ही सारेजण खुष झालो.

मुलांपेक्षा त्यांनी सुनांना प्रेम दिले.सास-याचे दडपण त्यांनी आणू दिले नाही.सर्व सुनांचे ते आवडते.मुलांशी कमी बोलायचे पण सुनांशी आदराने संभाषण साधायचे.ते आपूलकीने  सर्वाशी वागायचे.

आई पप्पांची आणखी एक सोबती म्हणजे 'आक्का'. कोठेही गेले तरी ते कायम तिला घेऊन जात.तिच्याशिवाय त्यांचे पानही हलायचे नाही.आक्काने आपल्या आईवडीलांची सेवा केली नसेल इतकी दादावहिनीची सेवा केली.पपांच्या आवडीनिवडी सवयींची पूर्णपणे माहीत असल्याने त्याप्रमाणे ती पूर्वनियोजन करीत असे.तिघांचे वेगळेच  नाते होते.पप्पांच्या अचानक जाण्याने या तिघांच्या नात्यामघ्ये भरुन येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 आजाराच्या कुरबुरीत त्यांचे जीवनक्रम स्रुरु होते. रक्तदाब मधुमेहाच्या कचाट्यात सापडल्याने त्यांच्या प्रत्येक अवयवांवर हल्ला सुरु झाल्याने त्रास जानवू लागला होता.ते शांतपणे त्याचा सामना करीत होते.डाँक्टरांच्या फे-या वाढल्या होत्या.फिरण्यावर त्यांनी बंधने आणली होती.त्रासाला कंटाळले होते.डाँक्टरानी एखादी गोळी द्दावी आणि मला आजार मुक्त करावे असा त्यांचा कायम हट्ट होता.

डाँक्टरांच्या सल्ल्याचा आदर करीत आमच्या आग्रहाखातर त्यांची निमुटपणे सर्व डाँक्टरी इलाज करण्यास तयारी असायची.आजारात नेहमीच ते पुढे घडु शकणा-या गोष्टीचा विचार करीत असल्याने त्याच्या मनात कायम भितीचे काहुर माजलेले असायचे.याच भितीने त्यांचे शरीर खंगत चालले होते.मुत्राशयाचा आजार बळावत गेला.हाँस्पिटलमघ्ये मनाविरुध्द राहावे लागले. खूप कंटाळायचे.पण मी बरा  होईन या आशेवर औषोधोचार करुन घेत होते. शारीरीक आजाराचे ओझे त्यांनी मनावर लादले.वयस्कराना आजाराने ग्रासलेले असते पण यानी आपले मन इतर गोष्टीत रमवले नसल्याने जीवनाचा अंतिम काळ त्रासाचा गेला.

या आजाराच्या त्रासात त्यांना खरा आधार आईचा वाटायचा.नजरेआड झालेली चालायची नाही.तिनेही त्यांना गेली पंच्चावन्न वर्षे सावलीसारखी साथ दिली.आमच्यापेक्षा आईची सोबत लागायची.लहान मुलासारखी तिने त्यांची सेवा केली.

त्यांचा शेवटचा प्रवास खडतर गेला.आजाराने आपण परावलंबी होत असल्याची खंत त्यांच्या कृतीतून दिसत होती. इतराना त्रास होऊ नये म्ह्णुन होणारा त्रास शांतपणे सहन करीत होते.त्यांच्या आजाराने आम्हा कुटुंबीयाना होणा-या त्रासामुळे त्यांना खुप वाईट वाटायचे.मला या आजारातून कायमचे मुक्त करण्याच्या गोष्टी आईकडे बोलून दाखावायचे.शेवटी आजारानेच त्यांचा शेवट केला.शांतपणे कोणालाही कसालाही त्रास देता कल्पना   देता ते अनंतात विलीन झाले. सर्व कुटुंबीय दु:खी झाले.

 कोणालाही  कसालाही त्रास देता शांतपणे त्यांचा जीवनकाळ संपला.आमचा आधार गेल्याने आम्ही मात्र पोरके  झालो.


माझ्या पप्पांचे दि.२०..२०१३ रोजी निधन झाले.त्यांच्या आयुष्याच्या गोष्टींचा हा आढावा.

No comments: