Monday, September 9, 2013

पुरुषांना बांगड्या


      भारतीय संस्कृतीत सौभाग्य लेण्याला फार महत्व आहे.सामान्यतः बांगड्यांना सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.महाराष्टीयांच्या पोशाखात-विशेषतः गेल्या पिढीतील पारंपारिक सौंदर्यदृष्टीलाच प्राधान्य देण्यात आलेले दिसते.

     सुमारे ५० वर्षांपूर्वी बांगड्यांची क्रेझ काही निराळीच होती. पण जसजसे २१वे शतक जवळ येऊ लागले तसतसे या क्रेझने बदलाचे रूप घेतले आणि बांगड्या घालण्याला संस्काराचे नव्हे तर , फॅशनचे स्वरूप प्राप्त झाले. पूर्वी ग्रामीण भागाबरोबरच शहरातही बांगड्यांमागे पवित्र भावना होती. लग्न-कार्यात , सणा-वाराला घरातील महिलावर्ग आवर्जून बांगड्या भरायचा. ज्यांचे घर मोठे , प्रतिष्ठेचे असायचे त्यांच्या घरी कासाराला बोलावले जायचे. एका विशिष्ट प्रकारच्या टोपलीत बांगड्यांची बंडले बांधून कासार घरी जायचे आणि महिलांच्या हातात बांगड्या भरायचे.बांगड्यांची टोपली डोक्यावर घेऊन गल्लो-गल्ली बांगड्या विकणारे कासारही होते. हात भरून बांगड्या भरणे ही महिलांसाठी अभिमानाची बाब होती.

   एखाद्या मुलीने किंवा महिलेने हातभरून बांगड्या घातलेल्या नाहीत , असे लक्षात आले तर , तिला घरातली करती-सवरती महिला लगेच हटकत होती. बांगडी हा महिलांचा अलंकार आहे , तो घालण्यात काहीही कमीपणा नाही , हे पटवून दिले जायचे.
 
      पण याच बांगड्या पुरुषाला भरण्याचे आवाहन करणे,म्हणजे त्याच्या नाकर्तेपणाची मोठी अवहेलना मानली जाते.  मुंबईत फोटो जर्नालिस्ट मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर जी सार्वत्रिक संतापाची लाट उमटली,साहजिकच त्याचे लक्ष्य पोलिस आणि गृह खाते होते. डॉ.दाभोलकरांची हत्या होऊन जेमतेम आठ दिवसही लोटले नसताना ही घटना घडल्यामुळे गृहमंत्र्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली.यावेळी शाब्दिक टीकेसोबत त्यांना बांगड्यांचा आहेर पाठवण्यात आला.

     त्याच्या पौरुषत्वाला दिलेले सगळ्यात मोठे आव्हान.‘आम्ही हातात बांगड्या नाही भरल्या,’ असं म्हणणं म्हणजे पुरुषाने स्वतःच्या कर्तृत्वाची दिलेली ग्वाही असते.


      मुंबईतील सामूहिक बलात्काराची झाल्यानंतर गृहमंत्र्यांसाठी बांगड्या भराव्या  व पाठव्यासाठी आव्हान करण्यात आले. बांगड्या फक्त बायकाच भरतात.आणि त्या कमजोर अबला असतात ना,म्हणून बांगड्या हे दुबळेपणाचे प्रतीक  असलेल्याशी समज समाजात करण्यात आली आहे.पण बायकांच्या प्रश्नांविषयी व्यक्त होताना जी संवेदनशीलता, सामाजिक भान दिसायला हवे, ते दुर्दैवाने कुठे दिसले नाही.


पूर्वी लढाई अर्धवट सोडून रणांगणावरून पळालेल्या सैनिकांना बांगड्यांचे अहेर देवून लज्जित करायची पद्धत होतीच.


     बाईभोवतीची बंधनं अधिकाधिक घट्ट होत गेली.आपलं जगणं याहून काही वेगळं असू शकतं,याबद्दल त्याना  आत्मविश्वासच राहिला नाही.मग त्यातून बायका ‘घाबरट’, बायका ‘बेअक्कल’, बायका ‘रडूबाई’ ठरल्या.त्यांची दागिने,त्यांचे कपडे नाकर्त्या पुरुषाला हिणवण्यासाठीचे प्रतीक ठरले.बांगड्याप्रमाणे साडी-चोळीचा अहेर पाठवणेही याच मानसिकतेचा भाग दिसून येतो.

      ज्यावेळेला महिलांना समानतेचा अधिकार आपण मागतोय. अशावेळेस २१ व्या शतकात जर महिलांसाठी बांगड्या या कमकवुतेचं लक्षण मानात असाल तर ते चुकीचं आहे. तुमची राजकीय समिकरणं काय असतील ती असोत. पण एक महिला म्हणून अशा प्रकारे महिलांचा आणखी अपमान होऊ नये.

      पुरुषांच्या नाकर्तेपणा दाखवण्यसाठी चपला पाठवा,बुट पाठवा,सडकी अंडी ,कुजके टॉमॅटो पाठवा.असे का नाही सांगत?

      कुणाही पुरुषाच्या नाकर्तेपणाचा,संबंध बायकांच्या बांगड्याशी लावणं आता थांबले पाहिजे.समाजाचं प्रतिनिधित्व करणा-या राजकीय पक्षांनी,संघटनांनी,नेत्यांनी हे भान दाखवणं गरजेचं आहे.


     नव्या पिढीसमोर जुनीच लिंगभेद करणारी आणि बाईला दुय्यम ठरवणारी प्रतीकं मांडताना संवेदनशीलता निर्माण करण्याची जबाबदारीही महिलांनाच उचलावी लागेल.


      पतीच्या निधनानतंर त्याच्या बायकोंचा बांगड्यांनी भरलेला हात रीता केला जातो.हि प्रथाही मोडून काढली पाहिजे.

No comments: