Thursday, September 18, 2014

'दगडावर दगडी सात' म्हणजेच 'लगोरी'.



लहानपणी अंगणामध्ये विविध खेळात रंगलेले सवंगडी... कंचे, टिक्कर बिल्ला, गिल्ली दांडू , लपाछपी,लगोरी,डबा ऐसपैस,लंगडी,कबड्डी, डुक्कर मुसुंडी, मधला कावळा, विषामृत, सोनसाखळी, दगड का माती, अबाधुबी, पकडा-पकडी आणि असे  बरेच काही खेळ खेळत असू.मित्र-मैत्रिणींबरोबर थकेपर्यंत खेळावे, लुटुपुटुची भांडणे व मारामारी करावीत आणि सरतेशेवटी ज्याच्याशी भांडलो त्याच्याच ताटात जेवावे.ते दिवस खरंच रम्य होते.धमाल होती

या खेळामुळे मुलांची तत्परता, चपळाई, नेतृत्व, एकाग्रता, निकोपवृत्ती, संघभावना वाढायची. विषेश म्हणजे तो अजिबात खर्चिक नाही.पण काळाच्या ओघात घरादारातली अंगणं गेली, घराघरात टीव्ही विराजमान झाला व हातात मोबाईल आला  आणि असे किती तरी खेळ अस्तगंत झाले


लगोरी फरशीच्या वा विटांच्या तुकड्याची असते.फरश्यांचे तुकडे किंवा खापराचे तुकडे एकावर एक ठेवून, रबरी चेंडू फेकून एकावर एक मांडलेल्या खापरा फोडायचे दोन गटात खेळला जाणारा हा खेळ. नंतर फरश्यांच्या तुकड्यांची जागा बाजारात मिळणार्‍या लाकडी ठोकळ्यांनी घेतली. आम्ही एकावर एक ठेवलेल्या फरशीच्या तुकडयांना लगोरी म्हणायचो. एका गटाने मांडलेल्या लगोरी दुसर्‍या गटाने रबरी चेंडूच्या साह्याने फोडायच्या आणि दुसर्‍या गटाने त्या परत एकावर एक ठेवायच्या. हे ठेवत असतांना ज्या गटाकडे चेंडू आहे त्या गटाने लगोरी रचनार्‍याला फेकून मारल्यास परत दुसरा डाव सुरू होत असे. लगोरी नीट रचली गेली की गटातल्या सगळ्यांनी "लिंगोरच्या" असे म्हणून ओरडायचे.

रायगड जिल्हातील नागोठणेसारख्या गावातील रहिवासी संतोष गुरव आणि त्यांचे कुटुंबीय लगोरी खेळ वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. संतोष यांचे भाऊ भरत हेदेखील आंतरराष्ट्रीय लगोरी खेळाचे पंच आहेत. स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर वुडबॉल खेळणारे संतोष यांनी हा खेळ वाढवण्यासाठी नागोठण्यातूनच या खेळाचा प्रसार करायला सुरुवात केली.महाभारतात श्रीकृष्णाने बालपणी संवगडय़ांसोबत हा खेळ खेळल्याचे म्हटले जाते. संत एकनाथांच्या गाथेतही २७१-३०० या पानांवर या खेळाचा उल्लेख दिसतो. पेशवेकाळात जे मान्यताप्राप्त खेळ होते त्यातही लगोरी खेळाचा समावेश होता,’’ असे संतोष आवर्जून सांगतात.  


आत्ता हे सगळं आठवण्याचं कारण असं की , आपल्या अंगणातली लगोरी आता मैदानात पोहोचली आहे. एवढंच नव्हे तर सध्या जवळपास १५ देशांमध्ये आणि भारतातील २६ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक राज्यात आणि हा खेळ खेळणा-या देशांत लगोरी खेळाचे नाव वेगळे आहे. 


आपण भारतीय क्रिकेट , फुटबॉल , हॉकीपासून तर स्कीईंग आणि स्केटिंगसारखे कित्येक परदेशी खेळ खेळण्यासाठी धडपडत असतो. ते खेळण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर पैसे आणि वेळही खर्च करतो. त्याचवेळी आपले अस्सल भारतीय खेळ मात्र विस्मृतीत जात आहेत. हे खेळ तगविण्यासाठी ' अॅमॅच्युअर लगोरी फेडरेशन ऑफ इंड‌िया ' ची स्थापना झाली,असे लगोरीचे प्रसारक आणि या संघटनेचे संस्थापक सचिव संतोष गुरव यांनी सांगितले. हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ' इंटरनॅशनल लगोरी फेडरेशन ' चीही स्थापना झाली आहे.


अंगणातली लगोरी मैदानात येऊन चार वर्षे झाली. संकेतांचे नियम झालेत. सवंगड्यांचे संघ झाले आणि निखळ मनोरंजनाची जागा शैक्षणिक गुणांनी घेतली! राज्य सरकारने लगोरीला नुकतीच 'क्रीडाप्रकार' म्हणून मान्यता दिली. छोट्या मुलांचा 'मोठा' झालेला हा खेळ आता चक्क प्रीमिअर लीगमध्ये खेळला जाणार आहे.बालपणातील हा लगोरी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. देशातील पहिली 'लगोरी प्रीमिअर लीग' म्हणजेच एलपीएल येत्या डिसेंबरमध्ये रंगणार आहे.लगोरी खेळातील कौशल्याचा सर्वांना आनंद देण्यासाठीच डिसेंबर, २०१५मध्ये पहिल्या लगोरी वर्ल्ड कपचे आयोजन करण्याचा विचार भारतीय लगोरी संघटना करीत आहे.


 ’ लगोरी ’ हा  शब्द ऐकल्यावर लहानपणीचे दिवस आठवतात.......  रम्य ते बालपण.

No comments: