Tuesday, December 23, 2014

बदलती मानसिकता

आजच्या वृतपत्रातील बातमी

 पुण्यात दहा वर्षांच्या मुलाची आत्महत्या
----------------------------------------------
  धनकवडी परिसरातील तानाजीनगरमध्ये राहणाऱया सुनिल पिसाळ यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने रविवारी रात्री राहत्या घरी पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.आदित्य असे त्याचे नाव आहे.सुनिल पिसाळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या बहिणीचा काल वाढदिवस होता. 

त्यामुळे पिसाळ यांच्या घरातील सर्वजण जेवणासाठी हॉटेलमध्ये जात होते. त्यावेळी आदित्य याने नवीन जर्किन घेण्याचा हट्ट केला. जर्किन घेतले तरच मी बाहेर येर्इन, असेही तो म्हणाला. त्याच्या आर्इने स्वेटर घेऊ असे त्याला सांगितले. मात्र, त्याने जर्किनच घेण्याचा हट्ट लावून धरला. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर घरातील सर्वजण हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. आदित्य घरी एकटाच होता. त्याने रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आदित्य हा एकुलता एक मुलगा होता. तो इयत्ता पाचवीमध्ये शिकत होता.

    अतिशय धक्कादायक घटना..सगळ्या पालकांना अंतर्मुख करायला लावणारी हि घटना आहे. लहान असताना कितीतरी गोष्टी इच्छा असूनही  मिळत नाहीत.त्याकाळी तेवढी मध्यमवर्गीय घरातील परिस्थितीही बेताची असून देखील अशी घटना ऐकिवात नाही.हल्लीची लहान मुले खूप तापट असतात.त्यांना एखादी गोष्ट नाही मिळाली कि चिडतात.आपले ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

       बापरे ! आजकालची मुले कित्ती संवेदनशील आहेत? फक्त जर्किन मिळाला नाही म्हणून आत्महत्या.मला वाटते कि मुलांचे लाड बेताने करायला हवेत.प्रेम आणि शिस्तीचा समतोल साधलेला हवा.

       लहान मुलांना लहान सहान गोष्टींमधून नकार स्वीकारण्याची सवय लावायला हवी. विशेषतः जिथे एकाच पाल्य आहे तिथे हे जास्त गरजेच आहे.आजकाल आठ-दहा वर्षांची मुले सुद्धा किती असंयमी, भावनाप्रधान झाली आहेत, त्यांच्या रागाचे प्रमाण कुठवर गेले आहे हे बघितले म्हणजे खरोखर चिंता वाटायला लागते.

     आई वडील आपल्या चांगल्यासाठी सांगत आहेत हे जरी मुलांना समजून घेतले तर मुलांवर हे कृत्य करण्याची वेळ येणार नाही.आपले आई वडील आपल्यासाठी काय काय करताहेत याची जाणीव असणे गरजेचे आहे.आजच्या मुला मुलींना कळल पाहिजे.असा हट्ट करून आपले जीवन संपवायचे याला अर्थ नाही.लहान मुलांनी हट्ट कमी करावेत.मला मिळाले नाही म्ह्णुन दु:ख न करता दुस-या संघीची वाट पाहयल्या शिकले पाहिजे. 
           
        सध्या मालिका आणि चित्रपट मुलांबरोबर बघताना शंभर वेळा विचार करा.बालमन खूप नाजूक असते.हे सगळे विचारात घेतले तरी या कोवळ्या जीवाने आत्महत्या करणे हि गोष्ट काळजाला भिडते.

       पूर्वीच्या तुलनेत आजची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. पैसा, वेळ यात ती करकचून बांधली गेली आहे. मूल जर अँबनॉर्मल वर्तन करत असेल तर त्याला शिक्षेची गरज नसते हे आधी आई-बाबांनी समजून घेतले पाहिजे. त्या मुलाला चुचकारून, जवळ घेऊन, वेळ देऊन समजावण्याची गरज असते. पण मुलांच्या वर्तनाने आई-बाबा बिथरतात. टाइम फ्रेम, आर्थिक ताण यांची ओझी आधीच खांद्या-डोक्यावर घेतलेली असल्याने मुलांच्या चुकीच्या वर्तनाला वागवण्यासाठी जागा कुठे असते आई-बाबांजवळ? मग सरळ शिक्षा दिली जाते. मारले जाते , अद्वातद्वा बोलले जाते. यामुळे मुलांना किती समजते हा प्रश्नच आहे. पण मुले आणखी बिथरतात. पुढच्या चुका करण्यासाठी तयार होतात.  


     मुलांना सांभाळण्यासाठीचा हवा असलेला फॅमिली बॅकअप आज अनेक घरांत नाही आहे. मुलांना चुचकारणं, त्यांना समजून घेणे हे पूर्वी खूप मोठय़ा प्रमाणात व्हायचे. आणि त्यासाठी आई-बाबांची गरज नसायची. मुलांचे आजी आजोबा, काका-काकू, आत्या मावशी, मामा मामी असे कोणीही ते करू शकायचे. पण आज एकल कुटुंबामुळे तसा बॅकअप राहिलेला नाही.त्याचा परीणाम दिसत आहे. 


     आजचे अनेक आई-बाबा मुलांना दोनच गोष्टी देतात एकतर बक्षीस नाही तर शिक्षा.  पप्पू पास हो गया तो उसे कॅडबरी दो नाही तर चार लोकांच्या देखत मुस्कटात. आजचे सिनेमे, जाहिराती हेच तर शिकवता आहेत. मुलांना पटकन खूश करण्याचा एकच मार्ग. त्यांना हवं ते घेऊन द्या. आणि मुलं जर चुकीचं वागली तर त्यांना ताळ्यावर आणण्याचाही एकच मार्ग त्यांना शिक्षा करा. मारा, झोडा, बोला..कॉम्प्युटर, मोबाइल, टीव्हीवरचे चॅनल्स बटणासरशी बदलतात. मुलं तशी बदलत नाहीत. कारण सोप्पं आहे ती कॉम्प्युटर, टी.व्ही किंवा मोबाइल नाहीयेत. मन, बुद्धी असलेली माणसं आहेत. मुलांना बदलायला आवश्यक असलेला पुरेसा वेळ देतात का आई-बाबा? आजच्या आई-बाबांच्या खिशात/पर्समध्ये शिक्षा नाही तर बक्षीस या दोनंच गोष्टी असतात. आई-बाबांच्या या टोकाच्या प्रतिक्रियेमुळे मुलांचा गोंधळ होणारच.


       लहानपणी मुलांना कोणतीही वस्तू, खाऊ यापेक्षा आई-बाबा हवे असतात. पण नोकरी-व्यवसायामुळे मुलांना आई-बाबांच्या खांद्यावरून जग पाहण्यापेक्षा पाळणाघरातल्या पालकांच्या खांद्यावरून पाहावं लागतं. या वयात मुलांना जी भावनिक सुरक्षा हवी असते ती त्यांना मिळतच नाही.   अशा वातावरणामुळे मुलं आई-बाबांच्या मनाविरुद्ध वागतात. त्यांना उलटून बोलतात. अभ्यासात मागे राहतात.मनात कुडतात.आणि मग टोकाचे निर्णय घेण्यास तयार होतात.

      मुलाचे आईवडील मुलापेक्षा वयाने व अनुभवाने मोठे असल्याने त्यांनी मुलांच्या बाजुने थोडा  विचार करून त्यांना सुधारले तर मुलांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.

पुढची पिढी आपले निर्णय घेण्यास समर्थ असल्याने निर्दशनात आणुन देत आहे.



No comments: