Friday, April 3, 2015

उत्तम आदर्श

                   

मुंबईत कृष्ण विचारांचा प्रचार करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या (इसकॉन) वतीने यंदा 'गीता चॅम्पियन्स लीग' अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत ३०००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एका १२ वर्षाच्या  मरियम सिद्दिकी या  मुस्लिम मुलीने गीतेचा अभ्यास करून चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे. धर्माचे राजकारण करणाऱ्यांना ही चांगलीच चपराक आहे. मुस्लिम मुलीने हिंदूच्या गीतेचा अभ्यास  करून हिंदूपेक्षा आधाडी घेतल्याने या बातमीला विषेश महत्व प्राप्त झाल्याने  तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.जिने एकतेचा संदेश देत समाजापुढे एक उत्तम आदर्श घालून दिलाय.




आपल्या धर्माचे आचरण करीत असतानाच इतर धर्मीयांच्या भावना समजून घेणे त्यांच्या धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करणे यामुळे जर परस्पर धार्मिक तेढ कमी होण्यास मदतच होत असेल तर ती चांगलीच बाब आहे. किंबहुना सध्या या गोष्टीचीच गरज आहे आणि तो परिपाठ लहानग्या मारीयम ने घालून दिला आहे.दोन्ही धर्मातील कट्टरपंथीयांनी यातून धडा घ्यावा. देशात घरवापसी सारख्या मोहीम राबवत देशाच्या ऐक्यात बाधा आणण्याचे उद्योग काही मंडळीकडून सुरु असताना मरियमने दोन्ही समाजाला एकतेचा संदेश दिला आहे.






प्रत्येकाने सर्व धर्मांचा आदर आणि स्वीकार केला पाहिजे.कोणताही धर्म व्देषाची शिकवण देत नाही.पण काही लोक असे आहेत की ते आपल्याला चुकीची दिशा दाखवतात.मुलांवर चुकीचे संस्कार होण्या आधीच त्यांना धर्माचा खरा अर्थ आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे.

खरोखरच या मुलीचे खूप कौतुक आहे.मुलांमध्ये सर्व धर्मांबद्दल आदर निर्माण झाला तर त्यांच्यात राष्ट्रीय भावना जागृत करणे सोपे जाईल.या करीता सर्व धर्मांची ओळख मुलांना शालेय जीवनात होईल असे उपक्रम शाळेत राबवायला हवेत.सर्व धर्मांची शिकवण सारखीच आहे हे रुजविल्यास आपापसातील व्देष नाहीसा होऊ शकेल.

धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांची हत्याकरणाऱ्या समाजकंटकाना व त्याचा गैर फायदा घेणाऱ्या राजकारण्यांना जे इतके वर्षात समजले नाही ते या चिमुरडीला इतक्या कोवळ्या वयात समजले. कधी कधी हि लहान मुले कळत-नकळत मोठ्याना बरेच काही शिकवून जातात.

हिंदू व मुस्लिम समाजाने या मुलीकडून आणि तिच्या पालकांकडून बोध घेतला तरच देशातील जातीभेदभाव नष्ट होतील. देशात शांती प्रस्थापित होऊन आपली प्रगती होऊ शकते. 

No comments: