Thursday, June 18, 2015

रस्त्यावरचे पदार्थ खाण्याचा मोह आवरा.



नेस्ले कंपनीच्या मॅगी या पाकीटबंद नूडल्समध्ये अजिनोमोटो आणि शिसे याचे प्रमाण अतिरिक्त आढळल्याने प्रशासनाने त्यावर बंदी घातली. मात्र रस्त्या-रस्त्यावर मिळणा-या चायनिज भेळच्या गाड्या आणि चायनिज पदार्थांचे स्टॉल येथील पदार्थांचे काय? हे पदार्थही शरीरासाठी धोकादायक आहेत, मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. या गाड्यांवर माशा घोंगावत असतानाही अनेक लोक हे पदार्थ खाण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.


अन्न सुरक्षा व दर्जा प्राधिकरणाने मॅगीवर बंदी आणल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनानेही मॅगीवर कारवाईचा बडगा उगारून स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र गेली अनेक वर्षे रस्त्यावर वडापाव व अन्य फास्ट फूड विकणारे अद्याप प्रशासनाला दिसले नसावेत. काही वर्षांपूर्वी अन्न सुरक्षा कायद्यात दुरुस्ती करून अन्न निरीक्षकांचे कारवाईचे अधिकारही वाढवण्यात आले. तरीही रस्त्यांवरील गाड्यांवर अद्याप निर्बंध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा गाड्यांवर मिळणारे पदार्थ किती हानिकारक आहेत व कायदा सक्षम असूनही कारवाई होत नाही. 


मुंबई शहरांत ठिकठिकाणी खाऊगल्ल्यांची संख्या वाढत आहे.रस्त्यावरचे अन्नपदार्थ हानीकारकच असून देखील केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी रस्त्यावरचे पदार्थ खाल्ले जातत. प्रामुख्याने ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यामुळे अधिक धोकादायक बनतात आणि आजारांना आमंत्रण देतात. शिजवलेल्या अन्नात जंतू राहण्याची शक्‍यता कमी असते, परंतु न शिजवलेली ओली भेळ, पाणीपुरी, "पौष्टिक‘ समजले जाणारे सॅंडविच आणि सरबत जास्त धोकादायक ठरतात. 

ऐरव्ही आपण ब्रॅडेड वस्तू वापरतो.पण खाण्य़ासाठी ब्रॅडेडपण का बाजूला ठेवतो.मुंबईकर खाण्याच्याबाबतीत तडजोड का करतो?जिभेवर नियंत्रण का नाही ठेवत? बाहेरचे पदार्थ  शरीरास अपायकारक आहेत तरीही त्याला तेच का आवडतात?न सुटलेले कोडे आहे.



मुंबईच्या रस्त्यावरील चायनीज, पावभाजी, बुर्जीपाव, वडापावच्या गाड्यांसह फूटपाथवरच्या बेकायदा धंदा करीत आहेत.पण सुशिक्षितवर्ग देखील हेच रस्त्यावर खाणे चवीने खातो याचे विशेष वाटते.उघडयावरच्या खाद्यपदार्थामुळे कावीळ, टायफॉईड, कॉलरा, अतिसार अशा विविध आजारांना आमंत्रण मिळते. 

रस्त्यावरचे खाण्याचे पदार्थ शिजवलेले, न शिजवलेले आणि द्रवरूप असे तीन प्रकारचे असतात. यापैकी न शिजवलेले आणि द्रवरूप पदार्थ अशुद्ध पाण्यामुळे आजारांना आमंत्रण देण्याची शक्‍यता अधिक असते. भाज्या, फळे अनेक तास कापून ठेवलेल्या अवस्थेत असली तर बॅक्‍टेरिया तयार होतात. चायनीज पदार्थातला अजिनोमोटो आणि मशरूममुळे अनेकांना ऍलर्जी होते. चायनीज, वडापाव, समोसे, बर्गर, पिझ्झा या सर्व फास्ट फुडच्या अतिसेवनाने शरीरात चरबी वाढते. 

रस्त्यावर अर्धे कच्चे खाद्यपदार्थ खासकरून मासांहारी पदार्थ ठेवले जातात.गिऱ्हाईक आल्यावर गरम करून दिले जातात.अशा खाद्यपदार्थामध्ये विषाणूंची वाढ झपाटयाने होते. असे अर्धवट शिजलेले खाद्यपदार्थ पोटात गेल्यास अनेक तक्रारी सुरू होतात. 

पाणीपुरी व भेळपुरी विक्रेत्यांकडील पाण्याच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा पाणीपुरीसाठी दूषित पाण्याचा वापर होतो.या गाड्यांवर वापरले जाणारे पाणी, तेल व इतर पदार्थ असुरक्षित आणि कमी दर्जाचे असतात.गाड्यांवर काम करणाऱ्यांचे कपडे बघितले तर तेही घाणेरडेच असतात. त्यामुळे त्यांची शारीरिक स्वच्छता तर लांबच राहिली आणि जेथे या गाड्या गटाराजवळ नाहीत तेथे तर रस्त्यावर भांडी धुण्याचे काम सुरू असते व तेथेच अन्न पदार्थ शिजवले जातात.  

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला असला तरी, मुंबईसारख्या मोठया शहरातील घाईगर्दीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना दुपारच्या जेवणासाठी रस्त्यावरच्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांवर अवलंबून राहावे लागते.


रस्त्यावरच्या टपर्‍यांवरही चायनीज, पिझ्झा, बर्गर, पास्ता, खाणे युवा पिढीला आवडते. या सार्‍या चंगळवादी संस्कृतीच्या विळख्यात सापडलेल्या युवकात लठ्ठपणाचे प्रमाण अधिक वाढले.लठ्ठपणामुळे वयाच्या विशीतल्या लाखो जणांना अतिरक्तदाब, मधुमेह यासह अनेक विकारांनी पछाडल्याचे निष्पन्न झाले आहे.


मुंबईतील रस्त्यांवर खाद्यपदार्थाची विक्री करणा-यांकडील पाणी दूषित असल्याचे आढळून आले असून पाण्याचे नमुने दूषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.वडापाव, इडली, डोसा, सँडविच आदी ठिकाणी पिण्यासाठी टाकीमध्ये ठेवलेले पाणी, तसेच अनेक ठिकाणी पाणीपुरीसाठी वापरण्यात येणा-या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. हे पाण्याचे नमुने जीवाणुयुक्त असल्याचे दिसून आले. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील पाणी पिणे तसेच खाद्यपदार्थ खाणे याबाबत नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी,



पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे गरमागरम, चटकदार पदार्थ खाण्याचा मोह आपल्याला आवरता येणार नाही. त्यामुळे खाद्यपदार्थाच्या स्टॉलकडे आपले पाय वळले जाणार आहेत. परंतु रस्त्यावर उभे राहून आपण ज्या स्टॉलवरील खाद्यपदार्थ खात आहोत, ते पदार्थ आरोग्य बिघडवणारे तर नाही ना याची काळजी घ्या.


उघड्यावरचे पदार्थ कोणत्याही ऋतूत खाणे हे आरोग्यास हानिकारकच आहे. पण, पावसाळ््यात उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्यास आजारी पडण्याचा धोका वाढतो. उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसतात. पाणी उकळून, गाळून घेतलेले नसते. गाड्यांवर वापरण्यात येणाऱ्या भांड्याचे, कपड्यांचे निर्जंतुकीकरण केलेले नसते. गाड्यांच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छ असतो. एकूणच परिस्थितीचा विचार केल्यास जंतूसंसर्ग होऊन आजारी पडण्याचा धोका अधिक आहे.


अन्न निरीक्षकांचे व पालिकेचे दुर्लक्ष यामुळे गेली अनेक वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर सर्रासपणे दूषित अन्न विकले जात आहे. मॅगीच्या कारवाईनंतर तरी अन्न प्रशासन व पालिका या गाड्यांवर निर्बंध आणणार का, असा प्रश्न आहे.

No comments: