Monday, June 22, 2015

जगाने योगसाधनेला स्विकारले.



भारतात उगम पावलेल्या योगविज्ञानाची गाथा 'आंतरराष्ट्रीय योगदिना'निमित्ताने रविवारी जगभरामध्ये उलगडली आणि सर्वच खंडांमधील नागरिक आसनमग्न झाले.राज्यभरात विविध भागांत योगादिनानिमित्त कार्यक्रम साजरे करण्यात आले. केवळ मुंबई, महाराष्ट्र किंवा भारतातच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांत योगसिद्धी जाहली.भारतीयांप्रमाणेच आज संपूर्ण जगाने योगधारणा केली.आंतरराष्ट्रीय योग दिवसाला राजपथापासून देशाच्या गल्लीबोळापर्यंत आणि जगभरात प्रशंसा मिळाली.योगामुळे जगभरात भारतीय संस्कृतीचा सन्मान वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभरात मान्यता दिल्याबद्दल ... शुभेच्छा 

21 जून या दिवशी सौर कालगणनेनुसार वर्षाऋतूची सुरुवात होते आणि सूर्याच्या दक्षिणायनाला प्रारंभ होतो. त्या निमित्ताने हा दिवस आंतरराष्टीय योग दिवस म्हणून साजरा करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांना विनंती केली आणि त्याला 191 देशांनी समर्थन दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनी समुद्रातील युद्धनौका, सीमेवरील बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश येथे तैनात जवानांसह हवाई दलाच्या विमानातील सैनिकांनी देखील योगा केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील यावेळी राजपथावरील कार्यक्रमात सहभागी झाले. अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम्स क्वेयर येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या संयुक्त राष्ट्रांच्या योग दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी होत्या. बॉलीवूडमधील तारे-तारकांसह खेळाडूंनीही योग दिनांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.



रविवारी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने १९१ देशांमधील २५१ शहरांमध्ये त्या त्या ठिकाणच्या भारतीय दूतावासांतर्फे योगसोहळ्याचे आयोजन करण्यात आला होता.


योग दिवस प्रेम, शांतता आणि ऐक्याचे प्रतिक आहे. योगाने शांती मिळते आणि देशाच्या सीमा पार करून योग जगभरात पोचला आहे. माणसाचा मेंदू जर मंदिर असेल तर हे सुंदर मंदिर योगानेच निर्माण होऊ शकते. मानसिक ताणतणाव आणि व्याधी यापासून योग माणसाला दूर ठेवून निरोगी बनवते.

भारतीय योगशास्त्रात शरीर स्वास्थ्यासह मनःस्वास्थ्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य असून ते शास्त्र धर्मसंप्रदाय अलिप्त आहे. त्यामुळे अखिल विचारी मानवजगताला त्याचे विलक्षण आकर्षक वाढत चालले आहे. जगात सर्वत्र योगमार्गाची केंद्रे स्थापन होऊन त्याचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती वाढत आहेत.

आज आपली जीवनशैली पाहिली तर ती प्रचंड धकाधकीची आहे. त्यात पर्यावरणामुळे निर्माण झालेले म्हणून प्रश्न आहेत, औषधोपचापेक्षाही दिनचर्या बदलण्याची गरज आपल्याप्रमाणे परदेशातही जाणवू लागली आहे. योग यमन नियमामध्ये योगसाधना ही परदेशात होत नसली तरीही पाश्चात्य विचारांमध्ये आता योगसाधना रुजली आहे.आपल्या देशाचे सामर्थ्यस्थळ असलेला योग हा अन्य देशांपर्यत शास्त्रीय पद्धतीने पोहचवणे ही जबाबदारी भारतीयांची आहे.


 परदेशातील योग हा शारीरिक कवायतींच्या पलीकडे गेलेला नाही. शरीराला वळवणे सोपे आहे, मात्र मनाला वळवणे कठीण आहे. 


शरीराच्या स्थितीचा मनावर व मानसिक अवस्थेचा शरीरावर परिणाम घडतच असतो. म्हणजेच शरीर व मन यांचा एकरूपाने विचार करणे आवश्यक ठरते. म्हणूनच सुख-दु:खाच्या चक्रातून पलीकडे नेणारे एखादे असे तत्त्व किंवा पद्धती अंगीकारली पाहिजे की, जी म्हटले तर द्वंद्वाच्या पलीकडे नेणारी असावी. त्यादृष्टीने अनुभवसिद्ध प्राचीन योगशास्त्राचा आधार घेणे अधिक रास्त ठरेल.


कोणत्याही समाजात शहरीकरण-औद्योगिकीकरण वाढलं, सुखसोयीची साधनं उपलब्ध झाली की खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, शारीरिक कष्ट कमी होतात, व्यसनाधीनता वाढते, स्पर्धा वाढते, अनेक प्रकारच्या मानसिक ताणतणावांना झेलावं लागतं आणि या सगळ्यांमुळं काही आजार उद्भवतात.आजारांमध्ये अगदी अग्रक्रमानं येतात ते म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार. या आजारांना आटोक्यात ठेवायचं असेल तर आपल्या जीवनशैलीतल्या चुका दुरुस्त करायला हव्या.आहार-विहार, आचार-विचार, व्यसनमुक्ती, शारीरिक आणि मानसिक स्थैर्यता-शांतता, तणावमुक्ती, जीवनाकडं पहायचा सकारात्मक दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव योगात आहे. देशोदेशीच्या वैज्ञानिकांनी आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर पारखून योग ही आरोग्याला अतिशय उपयुक्त अशी जीवनशैली असल्याचं सिद्ध केलेलं आहे.

स्वतःसाठी वेळ मिळत नाही, स्वतःशीच संवाद तुटल्यासारखे वाटत आहे, चिडचिड होते, वजन वाढत आहे, लक्ष केंद्रीत करता येत नाही, खाण्याची इच्छा नसते... ही लक्षणे आजच्या पिढीमध्ये सर्रास दिसत आहेत. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस, वीकेण्डला आऊटिंग, पार्टी, ड्रिंक्स यामध्ये आयुष्य वाहत आहे. मात्र केवळ एवढ्याच गोष्टी म्हणजे जगणे नाही असेही आता कुठेतरी जाणवायला लागले आहे. स्वतःला समजून घेण्याची गरज निर्माण होत आहे. म्हणूनच पुन्हा एकदा हजारो वर्षांपूर्वीचा योगाभ्यास तरुणाईला गरजेचा वाटू लागला आहे. 

मनोबल उंचावण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी, कठीण परिस्थितीतही स्वतःचं संतुलन गमावलं जाऊ नये यासाठी योगासारखा उत्तम मित्र नाही.योग हे जीवन आहे असं म्हटलं जातं आणि खेळांसाठी व खेळाडूंसाठीही ती मोठी देणगी ठरू शकते.योगाच्या माध्यमातून उत्तम एकाग्रता आत्मसात करणं शक्य होऊ शकतं किंवा एकाग्रता भंग पावू नये यासाठीही योग उपयुक्त साधन ठरू शकते.


 योग म्हणजे काही फक्त आजारांवरची उपचारपद्धती नाही. प्रत्येक व्यक्तीसाठीच ती आदर्श जीवनपद्धती आहे.

No comments: