Thursday, November 26, 2015

धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडू नये.
      दहशतवाद्यांचा धोका एखाद्या देशापुरता, प्रांतापुरता मर्यादित राहिलेला नाही. संपूर्ण जगासमोरच दहशतवाद्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.विविध देशांमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त करतानाच दहशतवादाचा भस्मासूर आता एका देशापुरता मर्यादित नसून त्याचे सावट संपूर्ण जगावर आहे. धर्माशी संबंध जोडून दहशतवाद्यांना आश्रयस्थान देऊ नये.दहशतवादाला आज सीमा राहिलेली नाही. धर्माचा दहशतवादाशी संबंध जोडून तरुणांना या दहशतवादी संघटनांनी आपल्या जाळ्यात ओढून शेकडो निरापराध लोकांचा प्राण घेत आहेत. धर्माचा आणि दहशतवादाचा संबंध न जोडता दहशतवादी संघटनांच्या उच्चाटनासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे.‘आसियान’ संघटनेतील देशांनी आणि संपूर्ण जगाने दहशतवादाच्या आव्हानाचा संघटितपणे मुकाबला करायला हवा.

कालानुरूप सर्वच क्षेत्रांत मानवी जीवनात बदल होत असताना दहशतवादात आणि क्रौर्य या क्षेत्रांत ते होऊ नयेत अशी अपेक्षा धरता येणार नाही. तेव्हा काळाप्रमाणे दहशतवादाचे रूपही बदलले आणि तो अधिकाधिक तीक्ष्ण, तीव्र होत गेला. सांप्रत काळात या दहशतवादामागील धर्म म्हणून इस्लामच समोर येत असल्याने इस्लाम म्हणजे दहशतवाद असे मानले जाऊ लागले. दहशतवादामुळे मुस्लिम समाजसुद्धा प्रचंड त्रस्त असून दहशतवादाचा इस्लाम धर्माशी काहीही संबंध नाही. काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी दहशतवादाशी इस्लामचा संबंध जोडला आहे.


सध्याच्या दहशतवादामागे आर्थिक कारणेही तितकीच प्रबळ आहेत.सध्या इस्लामी दहशतवाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रौर्याच्या मुळाशी प्रगत पाश्चात्त्य जगाने पश्चिम आशिया आणि अन्य प्रदेशांतील तिसऱ्या जगाचे केलेले आर्थिक शोषण आहे.इस्लामी दहशतवाद. आज दहशतवाद म्हटले की याच धर्माचे नाव जोडले जाते. त्यास त्या धर्मातील अतिरेकी, मूलतत्त्ववादी घटक जितके कारणीभूत आहेत तितकेच अन्य धर्मातील सोईस्कर भाष्यकार देखील कारणीभूत आहे.


इस्लाम, जुडाइझम, बौद्ध आणि ख्रिस्ती या सर्व धर्माचा इतिहास हा रक्तलांच्छितच आहे. हिंदू धर्माचा समावेश नाही याचे कारण अन्य धर्मीयांप्रमाणे हिंदू धर्मीयांत आपल्या धर्माचा प्रसार करणे हे जीवितकर्तव्य नाही. सारे जग इस्लामी व्हावे वा ख्रिस्ती व्हावे ही जशी त्या त्या धर्मातील ढुढ्ढाचार्याची मनीषा असते तसे हिंदू धर्मगुरूंचे नाही.कोणता एक धर्म हिंसक नाही ,वा शांतता आणि सलोख्याची मक्तेदारी ही कोणा एका धर्माकडे नाही. धर्म, त्यानिमित्ताने तयार होणारे त्या धर्मीयांचे आर्थिक हितसंबंध, त्यास प्रस्थापित राजकारणाचा आधार आणि त्या राजकारणाने सोयीसाठी केलेला या हितसंबंधांचा वापर ही धर्माधिष्ठित दहशतवादाची कारणे आहेत.ज्या राजकारणाने, इस्लामच्या नावावर या प्रकारच्या हिंसक प्रवृत्तींना जन्म दिलाय, ते राजकारण आपण ओळखायला हवे आणि त्याला उघडे पाडायला हवे.दहशतवादाची पाळेमुळे पश्चिम आशियातील तेल भांडारांवर कब्जा करण्याच्या राजकारणात आहेत.विनाकारण हिंसा आणि लोकांचे जीव घेण्यात लिप्त असलेल्या तत्त्वांचा जाणूनबुजून इस्लामच्या या संस्करणात उपयोग केला गेला, कारण त्याने त्यांचे राजकीय उद्देश साध्य करीत आहेत.धर्माचा उपयोग नेहमीच सत्ता मिळविण्यासाठी केला जातो, याला इतिहास साक्ष आहे.  


कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कृत्याच्या विरोधात लढा देताना आंतरराष्ट्रीय भागीदारीची समीकरणे जुळवत असताना जागतिक समुदायाकडून धर्म आणि दहशतवादाचा परस्पर संबंध नाकारला जावा.
Post a Comment