Thursday, November 19, 2015

धान्याचा तुटवडा निर्माण होत आहे.



    मानवजातीला पुरून उरेल एवढे धान्य पिकत होते.पावसाने यंदा दगा दिल्याने भातशेतीसोबत   अन्य कडधान्ये पिकवणा-या राज्यातून धान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.तसेच  अवाजवी पध्दतीत लोकसंख्या वाढल्याने धान्याचा तुटवडा भासू लागले आहे.देशातील धान्यांचा राखीव साठाही गेल्या काही वर्षापासून सातत्याने कमी होत आहे.याचा परिणाम बाजारेपेठेतील धान्य़ांचा उपलब्धतेवर होत असल्याने सहाजिकच धान्यांचे भाव वाढत आहेत.या परिस्थितीचा साठेबाज गैरफायदा उकळत आहेत.सध्या तूरडाळीवरुन सुरु असलेला सावळागोंधळ पाहता याबाबत वेळीच सावध झाले तरच हे संकट टळेल.

  स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या हरितक्रांतीनंतर भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्या वेळी शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकरी या तिन्ही घटकांनी जोरकस प्रयत्न केल्यामुळे खाद्यान्नाच्या बाबतीतली पराधीनता नष्ट करण्यात आपल्याला यश मिळाले.उत्पादकतावाढ आणि त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टींमुळे तेव्हा आपण हे यश मिळवू शकलो.गेली तीन-चार वर्षे सलग सुरू असलेला दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीट या हवामान बदलाशी निगडित त्रयीने शेतकऱ्याचे आणि शेती उत्पादनाचे गणित विस्कटून टाकले आहे. कृषिक्षेत्र सध्या प्रचंड अडचणीतून जाते आहे.

अन्नसुरक्षा हा भारताच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. त्याबाबत या क्षेत्रातील धुरीण, धोरणकर्ते चिंता व्यक्त करतात. त्यासाठी काही योजनाही घोषित केल्या गेल्या आहेत. सारे काही कागदावर तयार आहे. प्रत्यक्षात मात्र वास्तव लक्षात घेऊन धोरणे बदलायला, त्यासाठी योग्य आर्थिक तरतूद करायला ना केंद्राला सवड आहे ना राज्य सरकारला.    

 वर्षी वरुणराजाची अवकृपा झाल्यामुळे पावसाच्या पाण्यावर पूर्णपणे विसंबून असणाऱ्या कडधान्यांच्या उत्पादनात थोडी घट झाली आहे.मुळात धान्यांची मागणी व पुरवठा यातील असमतोलाचा हा फार जुना आजार आहे.धान्याचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.कडधान्यांच्या उत्पादनातील तूट ही ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे; परंतु गेल्या ५० वर्षांत कडधान्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणताही प्रयत्न झालेला नाही.तांदुळ, गहू,ज्वारी, बाजरी, कडधान्ये, तेलबिया इत्यादी पिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास उत्पादकता दुप्पट होईल. 

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत हक्कांपैकी अन्नाची गरज कशी भागवावी आणि पारदर्शी पद्धतीने, भ्रष्टाचार निर्मूलन करून वितरण व्यवस्था सामान्य जनांपर्यंत कशी पोहचवावी, हा कळीचा मुद्दा आजही आपल्यासमोर आहे. 

जगाचा पोशिंदा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्या शेतकऱ्याच्या जीवनमरणाविषयी कोणाला काहीच वाटत नसेल, तर भविष्यात अन्नधान्य टंचाईचे संकट आणखी गंभीर होऊ शकेल.

No comments: