Friday, April 7, 2017

साहित्य संमेलनात युवा पिढी                       साहित्य संमेलनात युवा पिढी 
साहित्य संमेलन म्हणजे मराठी साहित्यप्रेमींचा दोन-तीन दिवस चालणारा आनंद महोत्सव असतो.मराठी साहित्य संमेलन दरवर्षी कोणत्या ना कोणत्या वादाच्या भोवऱ्यात सापडते. सहित्य संमेलनात वारंवार होणार्‍या या मानापमानाच्या नाट्यांमुळे आपले मराठी साहित्यावरचे प्रेम आणि आदर कमी होत आहे.पण तरीही त्या संमेलनाचे आकर्षण व प्रतिष्ठा मात्र कायम टिकून राहिलेली आहे.

साहित्यातून देशाची संस्कृती, मानवी मनाचे व स्वभावाचे चित्रण दिसून येते.त्यामुळेच युवा पिढी संस्कारक्षम, सोज्वळ व ज्ञानपूर्ण घडविण्यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजित करणे, हे अत्यंत गरजेचे आहे. पण युवा पिढीचे शिक्षण मराठी भाषेतून होत नसल्याने त्यांना मराठी 
साहित्याकडे ओढ नाही.याचा परिणाम साहित्य संमेलनांवर होत आहे.युवा पिढीने साहित्य संमेलनांकडे पाठ फिरवली आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तरुणांचा सहभाग आणि वाचकांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी प्रामुख्याने पुढे आली आहे.  

 युवापिढी सुधारण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. युवापिढी ज्यावेळी संस्कारक्षम घडेल, त्याचवेळी आपल्या साहित्याचा ख-याअर्थाने उपयोग झाला असे म्हणता येईल. साहित्याचा प्रवास अनंत काळापर्यंत चालण्यासाठी साहित्य मनात रूचविणे व रूजविणे, यासाठी साहित्य संमेलनाचे आयोजन हे समाज घडविण्याचे चांगले माध्यम आहे. 

सध्याचे सर्व स्तरांतील युवक इंटरनेट, मोबाइल, टीव्ही व अन्य माध्यमांद्वारे इतके काही पाहत व ऐकत असतात की, युवा साहित्य संमेलनातून त्यांना वेगळे असे काय आणि किती मिळणार, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असल्याने संमेलनापासून  युवावर्ग निश्चित दूर झालेला आहे.

केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या मराठी वाचक-लेखकांना एकाच व्यासपीठावर कसे आणता येईल, या विचारातून ई-साहित्य संमेलनाची संकल्पना आकाराला आली व 
ई-साहित्य संमेलने नेटवर भरली.पंचवीसहून अधिक देशांतील मराठी रसिक वाचक या संमेलनातून  सहभागी होतात.संमेलनाचा आस्वाद घरबसल्या घेता येणार असून त्यात सहभागीही होता येते. त्यामुळे जगभरातील मराठी वाचकांना संवादाची मोठी संधीही मिळते.अशा ई-साहित्य संमेलनातून  युवा पिढीला आणाले तर त्यांना साहित्यात नक्की गोडी निर्माण होईल. 

 मुळात मराठी वाचकांचा टक्का कमी होत आहे. तो वाढवण्यासाठी तरुण पिढीचा सहभाग संमेलनात होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावे. जेणेकरून तरुण पिढी पुन्हा वाचनाकडे वळेल. त्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील किमान विद्यार्थ्यांचा सहभाग संमेलनात असावा. असे झाले तर त्यांच्यापर्यंत आपली मराठी संस्कृती पोहोचेल आणि मराठी वाचक वाढण्यास मदत होईल.वाचनसंस्कृती नव्या पिढीमध्ये रुजविण्यासाठी काय करता येईल याचा विचारच साहित्य संमेलनातून झाला पाहिजे.


   युवा साहित्य संमेलनांची गरज गेली अनेक वर्षं केली जात आहे.अन्य माध्यमे देऊ शकत नाहीत ते साहित्य संमेलनातून मिळणार असेल तर त्याकडे युवावर्ग निश्चित वळेल, किंबहुना इतर माध्यमे देत नाहीत ते युवा संमेलनातून दिले जावे. 
Post a Comment