Sunday, June 4, 2017

चाफा फुलला



चाफा म्हटला, की आपल्याला आठवते ते चाफ्यावरच जुनं व गाणं... ""चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या खुलेना...'' या गाण्यामुळे उभे राहते ते निष्पर्ण हजारो फुलांनी भरलेले चाफ्याचे झाड! फाल्गुन जसजसा जवळ यायला लागेल, तसे त्याला फुलण्याचा जणू वेडच लागते. कितीतरी दिवसापर्यंत घट्ट मिटून राहिलेल्या कळ्या फुलायला लागतात. त्याचे निष्पर्ण दांडे निळ्या पांढऱ्या रंगाचे, जे काही दिवसांपूर्वी पाहावेसे वाटत नव्हते त्यातून कधी मोड वाढीस जाऊन, दांडोऱ्याच्या टोकावर कळ्या आलेल्या कळतच नाहीत. महिनाभर मुक्‍या असलेल्या कळ्या एकेक करून फुलता फुलता झाड कधी फुलून गेले, हे त्याच्या मंद गंधावरुन व खाली पडलेल्या सड्यावरुन कळते. 







 देवळाच्या प्रांगणात पावसाळ्यात व उन्हाळ्यात बहरलेले झाड आपण प्रत्येकजण पाहत असतो. आता तर ते लाखो फुले होऊन बहरायला लागले आहे. त्याचा एकप्रकारचा मंद सुगंध आसमंतात पसरायला सुरवात झालेली आहे. त्याचा परिमळ खूपच लाघवी व मनमोही असतो. त्याच्याखाली पडलेला पांढरी पिवळसर फुलांचा खच पाहून मन प्रसन्न होत असते. तसाच त्यांचा माथ्यावरचा पुष्पभार पण डौलदार व दाट असल्यामुळे ते आणखी सुंदर वाटते. 






पांढ-या खूरचाफ्यावरचं हे शुभ्र हास्य आनंदाची शुभ्रपताका असते. चैत्र वैशाखात हे झाड मनापासून फुलते. फांदीफांदीवर आळीमिळी गुपचिळी करून बसलेल्या चाफेकळया हळूहळू फुलतात आणि गंधाचं गुपित उघड करतात. जेव्हा या झाडाला पाने नसतात तेव्हा ती झाडे कुरूप वाटतात.

चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. सोनचाफा, पिवळाचाफा, केशरीचाफा, भुईचाफा, नागचाफा इत्यादी... प्रत्येकाचे रंग ढंग व छटा न्यारीच. नाना रंगात तो फुलून भोवतालच्या परिसरात गंधाची शिंपण करून जातो. गावात आता चाफ्याची झाडे कमीच दृष्टीस पडतात. घराच्या बागेत हायब्रीड चाफ्याने जागा घेतलीय, पण दोन्हींच्या गंधात फरक नक्कीच जाणवतोय. अशा या चाफ्याची तुलना मात्र अनेक कवितेत, गाण्यात खूपदा केली गेली आहे. एका निरागस अल्लड सुंदरीला "तू तर चाफे कळी' असे म्हटले जाते. अशा या चाफ्याच्या फुलांच्या दर्शनाने आणि सुगंधाने कुणाचेही मन प्रसन्न होते. 





उन्हाच्या काहिलीत डौलाने फुललेला चाफा आणि खांद्यावर फुटलेली पालवी सुखद दिलासा देत आहे. हे दृश्य पाहून चाफा फुलला हेच शब्द ओठी येतात.

No comments: