Thursday, February 13, 2020

महाराजांचे दर्शन झाले.

                                            महाराजांचे दर्शन झाले.

रामेशेज किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो. नाशिक शहरापासून जवळ असल्याने नाशिकमधूनही या किल्ल्याचे दर्शन करता येते.छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे.रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे.किल्ल्याची रचना ही साधीच आहे.परंतु तरीही मावळ्यांनी बरीच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते.
पायथ्याच्या ’आशेवाडी’ गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. गावातून किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते.पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्‍या लागतात.पायर्‍या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. रामशेज इतर किल्ल्यांप्रमाणे दऱ्याखोऱ्यांत, जंगलात अथवा खूप उंचीवर नाही.किल्ल्याने एका सपाट माळरानावर त्याने आपले बलदंड शरीर झोकून दिले आहे.
’स्वराजरक्षक संभाजी’ या मराठी मालिकेत ’रामेशेज’ किल्ल्याचा इतिहास दाखवण्यात आल्याने हल्ली या गडावर गर्दी होत आहे.शिवाजी महाराजांच्या लढाईबद्दल आम्ही चर्चा करीत चाललो होतो.मावळ्याचा पराक्रम व इतिहासाबद्दल बोलत किल्ला चढत होतो.

शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत चढाई सुरु होती. इतक्यात समोर शिवाजी महाराजांच्या पेहरावात गड उरताना एक बालमुर्ती आमच्या समोर आली. आम्ही ब-याच गडावर भंटकती केलेली आहे.पण असे महाराजांचे दर्शन झाले नव्हते.एका कुंटुब शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत लहान मुलाला गड उतरवत होते.आम्हाला हा वेगळेपणा भावला.आम्ही त्या बालमूर्तीला मुजरा केला.गोंडस व हसरा चेहरा असलेला लहान मुलगा मस्तकी जिरेटोप, भाळी शोभून दिसणारी चंद्रकोर, गळ्यात माणिक मोत्यांची माळ, कमरेवर कसलेली तलवार आणि पायात मोजडी अशा पेहरावात कोणाच्याही मदतीशिवाय गडउतार होत होता.फक्त घोडा नव्हता.तो मुलगा आंनदी खुष वाटला. शिवाजी महाराज की जय म्हणताच तोही जय म्हणत होता.आम्ही त्याचे फोटो काढले.इतर पर्यटक त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याची संधी सोडत नव्हते. लहान मुलांनी चित्रातले गडावऱचे शिवाजी महाराज पाहिलेले आहेत.तेव्हा गड व गडावरचे महाराज अनुभवण्यासाठी या मुलाला आम्ही महाराजांच्या वेशभूषेत गडावर आणले आहे.त्याच्या आईबाबाशी संवाद साधत असताना ही त्यांची एक वेगळीच कल्पना कळली.







त्या मुलाला पाहून भारावून गेल्याने गडावर कधी चढलो ते कळलेच नाही. गडावर जाताना वाटेत लागणा-या गुहेत रामाचे मंदिर आहे.तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. हा किल्ला अनुभवताना ह्या किल्ल्याचा इतिहास मनात साठवणे हा जसा थरार वाटते.








                      मात्र आम्हाला बालमुर्तीच्या रुपात शूर योध्दा शिवाजी महाराज कायमचे स्मरणात राहिले.

No comments: