Wednesday, May 6, 2020

अफवा

                                                              अफवा 


लॉकडाऊनच्या काळात एक फार  वाईट गोष्ट घडत आहे.ती म्हणजे विविध सोशल मीडियावर अफवा पसरवणे.समाजमाध्यमांचा वापर करून दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करण्याचं प्रमाण वाढलं आहे.यातून कोणाला काय आंनद मिळतो की कोणाला पैसा मिळतो  काही समजत नाही. अफवांचे मेसेजेस इतके खरे व सत्य वाटतात की ते लगेच मित्रांना पाठवले जातात.का होते असे? सत्यता पडताळून न बघता संदेश फॉरवर्ड करणे याचा अर्थ आपण अफवा पसरवणा-यांना मदत करतो.आपल्याकडे आलेला नवा संदेश मित्रांना प्रथम कळवण्याचा मान मिळण्याच्या नादात चुकीचा संदेश शेअर करतो राहतो.अफवा पसरवणे हा मोठा गुन्हा असून देखील आपण हे प्रकार करत राहतो.तुमच्या मित्राने किंवा तुमच्या नातेवाईकाने संदेश स्वतः लिहिला आहे की तो त्यांना दुसऱ्या कोणी पाठविलेला आहे हे 'फॉरवर्ड केले' या लेबल मुळे समजण्यास मदत होते. मूळ संदेश कोणी लिहिला आहे याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास तो संदेश कोणालाच शेअर करू नये. केवळ अनेक वेळा संदेश शेअर केल्याने, तो सत्य होत नाही.केवळ पाठविणाऱ्याने तुम्हाला कळकळीची विनंती केली आहे म्हणून तो संदेश फॉरवर्ड करू नका.ती अफवा होऊ शकते.आपण एखादी अफवा तर पुढे पाठवत नाही आहोत ना, याची प्रत्येकानं खातरजमा करून घेणं गरजेचं आहे. सामान्य माणूसही व्हॉटसअ‍ॅपचा अनुयायी असल्याने सत्यापेक्षा व्हॉटसअ‍ॅप फॉरवर्डेडवर त्याचा अधिक विश्वास बसतो आहे.याचा फायदा अफवा पसवरणारे उचलत आहे.  


करोनाच्या विषाणूपेक्षा अफवाचा विषाणू महाभयंकर आहे.जगभर करोना जसा पसरतोय तशा सोशल मीडियावर अफवाही वेगानं पसरताहेत.करोनामुळे लोकांच्या मनात सध्या असलेल्या भीतीचा फायदा उठवल्याने अफवा पसरवण्याचं प्रमाण वाढत आहे. अफवा पसरण्यासाठी व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर होत आहे. तुम्हाला अजूनही खात्री नसेल की आलेला संदेश खरा आहे की खोटा, तर ऑनलाईन जा आणि विश्वासार्ह वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर जाऊन याविषयी माहिती मिळते का ते पाहिले पाहिजे.


एक एप्रिलच्या पारंपरिक ‘एप्रिल फुल’च्या पार्श्वभूमीवर देशभरात सायबर अलर्ट जाहीर करण्यात आला होता, तर व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील आक्षेपार्ह संदेश, कोरोनाबाबतच्या चुकीच्या क्लीप्स, संदेश आदींबाबत अ‍ॅडमिनला जबाबदार धरण्यात येईल आणि कायदेशीर कारवाई, दंड आणि तुरुंगवासही घडेल असा इशारा एक दिवस आधीच दिला होता.व्हॉटसअ‍ॅपवर बल्क मेसेज पाठवण्यावर निर्बध आल्याने त्याचा परिणाम अफवांना पायबंद पसण्यावर झाला आहे.आता फक्त एकालाच संदेश पाठवता करता येतो.सरकारबरोबरच अनेक संस्था या अफवा थांबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


समाजात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणा-या, चुकीची माहीती देणे, मुलं किंवा माणसं हरवली आहेत व लहान मुले पळवून नेणारी टोळी आली आहे अशा अफवा असायच्या पण करोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून अफवाचं स्वरुप बदलले आहे.कोरोना कोंबड्यांचे मांस खाल्ल्याने होतो,ही अफवा पसरली होती.त्याचा परिणाम कुक्कुटपालन व्यवसायावर झाला होता.अफवांमुळे समाजमनावर घातक परिणाम होताना दिसत असतात.

एखादी अफवा पसरल्यावर तेथील गर्दीची जी मानसिकता असते ती कोणाचाही सल्ला ऐकण्याच्या परिस्थितीत नसते. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे ती काम करत असते आणि मुले पळवणाऱ्या अथवा कोणताही कथित आरोप असणाऱ्या समोरच्या माणसाला मारायचे एवढेच त्याच्या डोक्यात असते. म्हणूनच मुळात अफवा पसरल्या जाणारच नाहीत याकडेच सर्वांनी लक्ष द्यायला हवे.अफवेचे  परिणाम भयानक असल्याने प्रत्येकाने आपल्याकडून अफवा पसरवली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

करोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या यांचा व्हायरस पसरवत आहेत.फेक न्यूज, डॉक्टरेड व्हिडीओज आणि दहशतवादाचा भयानक व्हायरस पसरवत आहेत.यातून त्यांना समाज आणि देशांमध्ये तेढ निर्माण करायची आहे, ही चिंता पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

आपण विचार न करता अफवांवर विश्वास ठेवणारी मानसिकता आणि प्रश्न न विचारण्याचा संस्कार या सगळ्यामुळे समाज म्हणून आपण ’फॉरवर्ड -फॉरवर्ड’चा नवनवा खेळ चवीचवीने रंगवतो आहोत आणि त्यापोटी जन्मणा-या अफवांचे बळी ठरतो आहोत.आपल्यापर्यत आलेल्या मेसेजमधील तथ्य शोधण्याचा कुणीही त्रास घेत नाही.आता सजग राहण्याची गरज आहे.       

‘फेक मेसेज’चा प्रसार हा कोरोनापेक्षाही अधिक दहशतीचा आणि भयावह ठरतो आहे.तेव्हा अफवा पसरावयाला मदत करु नये.अफवा रोखाव्यात.

No comments: