बातम्या
टि.व्हीवरील बातम्या पाहून व ऐकून वीट आला आहे.हल्ली करोना शिवाय दुसरी कोणतीच बातमी नसते.शहरातील,राज्यातील,देशातील व जगातील करोनाचा संसर्गाच्याच बातम्या असतात. सुरुवातील दिवसभर माणसं कान देऊन बातम्या ऐकत असतं.चाळीस दिवसानंतर त्या बातम्यामध्ये काहीच रस न राहिल्याने कोणीच बातम्याचे चॅनल लावत नाहीत.काहींची तर वाढत्या करोना बाधितांचा आकडा व मृत्युदर पाहून भिती वाढत आहे.प्रथम करोनाच्या प्रसार कोणत्या भागात होत आहे ते पाहत होतो.पण नंतर सगळ्याच भागात करोनाचा प्रसार होत गेल्याने त्या बातम्यांमध्ये नाविन्य राहीले नाही.हल्ली मालिका बंद असल्याने कधीही बातम्या पाहण्यास आपल्या हातात रीमोट मिळतो.मालिका बंद झाल्याने फक्त बातम्या पाहण्यास टि.व्ही सुरु होतो. ’टीव्ही' आणि "सोशल मीडिया'वरूनही "कोरोना' विषयी सातत्याने "पॅनिक अटॅक' होताना दिसत आहे. यामुळेच एखाद्याच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार येऊ शकतात. हे टाळायचे, तर "कोरोना'च्या बातम्या बघणे बंद करा, असा सल्ला मानसोपचारतज्ञांनी दिला आहे.
एक बरं आहे,वृत्तपत्रातून हा संसर्ग पसरण्याची शक्यतेमुळे वृतपत्र घरी येत नाहीत.त्या वृतपत्रातूनही करोनासंबधीतच बातम्या वाचाव्या लागल्या असत्या. करोनाने बातम्याचे वृतपत्रच बंद केले आणि बातम्या गोळा करणा-या पत्रकारांनाही देखील सोडले नाही.
लाखो प्रेक्षक दूरदर्शनवरील बातम्या विश्वसनीय मानतात.आपल्याकडे टीव्हीवरील बातम्या सर्वांत लोकप्रिय आहेत, कारण ते सर्वांत सहज उपलब्ध असलेलं माध्यम आहे.तिथं आपल्याला बातमी वाचावी लागत नाही. आपण टीव्हीसमोर बसून घरातली इतर कामं करत करत ती ग्रहण करू शकतो.वृत्तपत्रांमध्ये विविध भाग असतात, जसे एक पान राष्ट्रीय घडामोडी. एक पान आंतरराष्ट्रीय घडामोडी, एक पान आर्थिक घडामोडी व एक पान क्रीडाविषयक घडामोडींनी व्यापले असते.ज्याला ज्या बातम्यांमध्ये रस असतो त्याप्रमाणे बातम्या वाचल्या जातात.दैनंदिन वृत्तपत्रातल्या रोजच्या बातम्या वाचकाने वाचणे म्हणजे जगाची माहिती घेणे. ती त्याची गरज असते.बातम्यांची भाषा सर्वसामान्य माणसांना समजावी अशी सुस्पष्ट असावी.
‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य रेडियोवर ऐकू येत असे.रेडियोची टी.व्हीसमोर आपले अस्तिव टिकवण्यासाठी धडपडत सुरु आहे.हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक चॅनल बातम्या देण्यास तत्पर असतात.पहिल्यांदा बातमी दिली तर त्या चॅनेलला मोठेपणा मिळतो.मान मिळतो.याकरीता चॅनेलवाले व त्यांचे पत्रकार कायम बातम्यांच्या मागे असतात.आजकाल प्रत्येक मुद्रित तसेच दूरचित्रवाणी माध्यमाचे संकेतस्थळ हमखास पाहायला मिळते. .त्या संकेतस्थळवर ताज्या बातम्या प्रसिध्द केल्या जातात.त्यातील काही बातम्या दुस-या दिवशी वृतपत्रात वाचण्यास मिळतात.
काही मर्यादित प्रमाणात वाचकांचा पत्रव्यवहार सोडल्यास मुद्रित माध्यम हे फक्त माहिती देणार्याच्या भूमिकेत दिसते. अग्रलेखासह प्रथितयश लेखकांचे स्तंभलेखन, विविध विषयांना वाहिलेल्या पुरवण्या, लेख एवढीच मर्यादा मते मांडण्याच्या बाबतीत होती. वेब माध्यमामध्ये मात्र ते वाचणारा-पाहणारा कुणीही तत्काळ आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतो. प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक मजकूर, व्हिडिओवर प्रतिक्रिया नोंदवण्याची सोय असते. मग तो विषय किंवा बातमी कितीही छोटी असली तरी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता येते.
वृत्तवाहिन्यांवरील अतिउत्साही प्रसारणापासून स्वत:ला आवरा, संवेदनशील घटनेचे वृत्त संकलन आणि प्रसारण अधिक जबाबदारीने करावे आणि कोणत्याही बातमीदारीत विश्वसनीयता असली पाहिजे.बहुतांश इलेक्ट्रॉनिक वृत्तवाहिन्यांनी तर सर्व प्रकारचे विधिनिषेध गुंडाळून ठेवले आहेत. समाजात अस्वस्थता माजवू शकतील, दुही निर्माण करू शकतील, कलहाचं वातावरण निर्माण करू शकतील असे विषय हेच फक्त बातमीच्या योग्यतेचे विषय असल्याप्रमाणे त्याचाच अहोरात्र मारा चालू असतो. आणि त्यांच्या दुर्दैवाने एखाद्या बातमीत सनसनीखेज काही नसलं, तरी तिला त्या पध्दतीने सादर करण्यात ही माध्यमं वाकबगार झाली आहेत. पार्श्वसंगीतापासून सादरीकरणापर्यंत सगळंच बटबटीत, अंगावर येईल असं, मेंदूला विचार करण्याची मुभा न देता तो बधीर होईल अशी बातम्यांची/चर्चांची गिरणी अव्याहत चालू ठेवणं म्हणजे पत्रकारितेचा धर्म निभावणं अशा समजुतीने हे सगळं चालू आहे.
लॉकडाऊन कधी संपणार या एकाच बातमीकडे सर्वजण कान लावून बसले आहेत.

No comments:
Post a Comment