Saturday, June 6, 2020

सेवानिवृत्ती

सेवानिवृत्ती


आयुष्यातली पहिली इंनिग संपल्यानंतरच सेकंड इंनिग सुरु होते.त्यामध्ये सेवानिवृती असते.सेवेतून निवृती.अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. सेवानिवृत्ती आयुष्यातील असा काळ असतो ज्या दिवशी आनंद आणि दु:ख अशा संमिश्र भावना उमटत असतात.तसे दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी कर्मचा-यांची सेवानिवृत्ती होत असते.त्याच दिवशी  सेवानिवृत्त सहकाऱ्यासाठी त्याचे मित्र निरोप देण्याचा कार्यक्रम कार्यालयातच, दिवसाचे काम संपल्यावर आयोजित करतात. त्याचा मानपत्र, शाल, स्मृतिचिन्हे देऊन गौरव करतात व त्याच्या आजपर्यंतच्या अमोल सहकार्याबद्दल कृतज्ञताभाव व्यक्त करतात. हे खरं म्हणजे, आपल्या संस्कृतीला जपणारे, उजाळा देणारे कार्य आहे.त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो.

यावर्षी मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यत जी मंडळी सेवानिवृत्त झाली त्यांचा निरोप समारंभ करता आला नसल्याने सर्वजण नाराज आहेत.काही जणांनी जशी परिस्थिती निवळत जाईल त्याप्रमाणे निरोप समारंभ करण्याचा विचार केला आहे.या मित्रांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता आल्या नाहीत.फोन व सोशल मिडियावर शुभेच्छा दिल्या गेल्या.काही जणांचे सेवानिवृत्तीचे कार्यक्रम ऑनलाईन साजरे झाले.     


 
कुणीही सेवानिवृत्तीबाबतचा प्राथमिक विचार व्यक्त करताना साध्यासोप्या शब्दांत सांगतात, की निवृत्ती म्हणजे आपल्याला जे काही करावंसं वाटतंय ते करण्याची वेळ, जेव्हा करावंसं वाटतंय तेव्हा करण्याची वेळ, जिथे करावंसं वाटतं, तिथे करायची वेळ आणि जसं करावंसं वाटतं तसं करायची वेळ! कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झालेली असते. पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो. पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते. आपल्या जवळची व्यक्ती सेवानिवृत्त होणार असेल तर तुमच्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना मांडण्याची ही योग्य वेळ असते. आपण त्यांना सेवा निवृत्ती शुभेच्छापत्रे पाठवून किंवा सेवानिवृत्ती कविता पाठवून मनातील भावना व्यक्त करु शकतो. 

सुखरुप निवृत झालो याचा आनंद होत असतो. तर उद्यापासुन काय हा प्रश्न समोर असल्याने तो काळजीत असतो.पण ज्यांनी अगोदरच पुढचा दिनचर्य ठरवलेला असतो तो तर सेवानिवृत्तीची वाट पाहत असतो.सेवानिवृतीनंतर मिळालेल्या वेळेचे योग्य नियोजन
केल्यास आपला सेवानिवृतीनंतर काळ आंनदात जातो. 

अलीकडे निवृत्तीनंतरच्या काळाचे आर्थिक नियोजन बर्‍याच आधीपासून करून ठेवताना दिसतात. यामुळे निवृत्तीनंतर त्यांच्यासमोर मोठी आर्थिक अडचण सहसा उभी रहात नाही. आधी केलेल्या गुंतवणूकीमुळे त्यांना स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळत राहते व त्यामुळे निवृत्तीच्या आधी असलेली त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता त्यांना पुढेही राखता येणे शक्य होते.

प्रत्येकाला या सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागते. प्रत्येकाच्या नशीबात हा दिवस येतोच.पण हल्ली जी तरुण मडंळी ज्या वेगात नोक-या बदलतात.त्यांना या सेवानिवृत्तीचे महत्व काय कळणार.जास्त पगारासाठी नोकऱ्या बदलण्याची प्रवृत्ती तरुण वयात जास्त असल्याने त्यांचे सेन्डऑफ नेहमीच होत राहतात.
  
सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच 'स्व'चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. एकदा का आनंदाचा ठेवा सापडला, की निवृत्तीचा अर्थ उमजायला लागतो.निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून निवृत्ती. जीवनातून नव्हे.

नोकरीनंतरचे आयुष्य म्हणजे स्वल्पविराम फक्त. निवृत्ती हा आयुष्याचा पूर्णविराम नसून, 'यंग सीनिअर्स' म्हणून धमाल करण्याची वर्षे आहेत, अशा दृष्टिकोनातून त्याकडे पाहणे आवश्यक आहे.स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व... सारे अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे.


 

No comments: