Sunday, May 31, 2020

सणवार आले व गेले.

                                                    सणवार आले व गेले. 

मागच्या काही दिवसात वेगवेगळ्या धर्मांचे सण सगळ्यांनी आपापल्या घरातच व कुटुंबातच साजरे केले.फोन  व सोशलमिडियावर फक्त शुभेच्छा देऊन सण साजरे केले.कोरोना संकटामुळे कोणतेही धार्मिक सण सार्वजनिकरित्या साजरे करता आले नाहीत. यावर्षी महाराष्ट्र दिन, कामगार दिन,गुडीपाडवा, रामनवमी, हनुमान जंयती,महावीर जंयती,आंबेडकर जयंती,रमझान ईद,पारसी नववर्ष व बुद्ध पौर्णिमा  असे बरेच सण व उत्सव आपल्या कुटूंबात साजरे करण्याची वेळ आल्याने सगळेच नाराज झाले.आपण भारतीय नेहमीच सण आंनदाने साजरे करतो.सणांची वाट पाहत असतो.सण साजरे करायला आपल्याला सुट्टी मिळते.आपण उत्सवप्रेमी आहोत.श्रीमंत व गरीब सगळेच आपापल्या ऐपतीप्रमाणे सण आंनदात साजरे करतात.यावर्षी  सण, उत्सव, पूजा,अर्चा,प्रार्थना, धार्मिक कार्यक्रम घरातच करावे लागले आहेत.महाराष्ट्रात कोणत्याही जाती-धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत, याची खबरदारी घेतली गेली. सणांची मजा घेता आली नाही.     

भारतात स्वातंत्र्यदिवस, प्रजासत्ताक दिन व गांधी जयंती हे तीन राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सणांची अगदी रेलचेल आहे. उत्तरेतील सण वेगळे, पूर्व-पश्‍चिमेकडील वेगळे आणि दक्षिणेकडील वेगळे. त्या प्रदेशातील लोकजीवनाचा ठसा त्या सणांच्या माध्यमातून उमटत असतो. देशाची स्वर्गभूमी म्हणून दक्षिणेचा उल्लेख केला जातो. 

या वेळी गुडी पाडव्याला शोभा यात्रा निघाल्या नाहीत.रामनवमी व हनुमान जयंतीला  देवळात दर्शनाला जाता आले नाहे.गुढीपाडवा, रामनवमी हे महत्वाचे सण व उत्सवही भाविकांविना साजरे झाले. मुस्लिम समाजाला पहील्यांदाच रमजान ईदमध्ये गळाभेट करता आली नाही. नमाज पठण घरीच करावे लागले. ख्रिस्ती समुदायाने ईस्टर घरातच साजरा केला.बौद्ध समाजाने आंबेडकर जयंती अगदी शिस्तबद्ध रीतीने घरीच साजरी केली.सर्व समाजांना याचे खूप वाईट वाटले.दु:ख झाले.अशी वेळ यापूर्वी कधीच आली नव्हती.

आपल्या संस्कृतीचा आणि वैभवशाली परंपरांचा आरसा म्हणजे आपले सण.भारतात संस्कृती, परंपरा, चालिरिती, आचार, विचार, उपचार, विधी यांमध्ये अनेक वैविध्य आहेत. भारतात विविध धर्मीय आनंदाने, गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. प्रत्येक धर्माच्या संस्कृती, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे.त्याचप्रमाणे आपल्याकडील चालिरिती, परंपरा, सण-उत्सव यांना केवळ धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे, असे नाही. तर निसर्ग आणि वैज्ञानिक महत्त्वही तितकेच आहे. नैसर्गिक ऋतुचक्रानुसार आपल्याकडे सण साजरे केले जातात.निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. पूर्वीपासून चालत आलेले सण-उत्सव आजच्या आधुनिक काळातही शहरी भागात,तितक्याच आनंदाने साजरे केले जातात.प्रत्येक सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. प्रत्येक धर्मातील प्रत्येक सणाच्या आनंद सोहोळ्याची परंपरा पुढे चालविण्यासाठी प्रत्येकजण आपल्या लहान मुलांची व तसेच तरूणाईची तयारी करून घेत असतो.हे सण साजरे करताना आणि त्यांची तयारी करताना अनेक गमतीजमती घडत असतात.त्या आठवणी सुखद असतात.वर्षभर शेतामघ्ये काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या सर्जा-राजाच्या प्रति श्रद्धा व प्रेम व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचा पोळा सणाला फार महत्वाचे स्थान आहे.

सण साजरा करण्यामागे मात्र घरातल्या, समाजातल्या सर्वानी एकत्र येऊन सहजीवनाचा, समाजजीवनाचा अनुभव घ्यावा हा एकमेव उद्देश असतो. आपल्याकडे तर इतके मराठी सण आहेत की एक संपत नाही तर पुढच्या सणाची तयारी सुरू होते. आम्हीसुद्धा रंगपंचमी खेळून झाल्यावर लगेच संध्याकाळी गुढीपाडव्याची साडी खरेदी करण्यासाठी जातो. सणांनी अशा भरगच्च भरलेल्या वर्षामुळे दिवस अगदी पटापट निघून जातात आणि जगणं एकसुरी, कंटाळवाणं होत नाही. अशा वेळी मला प्रश्न पडतो की फुकाचं तत्त्वज्ञान झोडत सण साजरे न करणारे लोक कसे बरं जगत असतील? प्रत्येक सणाच्या आठवणी वेगळ्या असल्या तरी पुढे कित्येक वर्ष हेच सण साजरे होत राहतात. पण लग्नानंतरच्या पहिल्या सणांच्या आठवणी कपाटाच्या कोप-यात ठेवलेल्या अत्तराच्या कुपीप्रमाणे मनाच्या कोप-यात सदैव दरवळत राहतील,यात शंका नाही.

यापुढे येणारे काही सण आपण साध्या पध्दतीने करणार आहोत.तर काही सार्वजनिक सण पुढे ढकलले आहेत.तेव्हा नाराज न होता येणारे सणवार आपण परिस्थितीनुसार आंनदात साजरे करुया.    


No comments: