Thursday, May 28, 2020

वाढदिवसाचा बदलता अंदाज....

                                  वाढदिवसाचा बदलता अंदाज....

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक विशेष उत्साहाचा दिवस.मागच्या पन्नास पेक्षा जास्त दिवसात ब-याच मित्रांचे व त्यांच्या मुलांचे व त्यांच्या लग्नाचे वाढदिवस साजरे झाले.प्रत्येकजण त्याच्या वाढदिवसासाठी उत्सुक असतो. आपला वाढदिवस इतरांपेक्षा काहीतरी हटके असावा यासाठी आपण सगळेच प्रयत्न करीत असतो. परंतु लॉकडाऊनमुळे वाढदिवस साजरा करण्याची अनेकांची पद्धत बदलली आहे.लॉकडाऊनमुळे प्रत्यक्ष भेट होऊ शकली नसली तरी झूम अँपद्वारे देशातील आणि परदेशातील मित्र व नातेवाईकांसोबत वाढदिवसाचा साजरा करण्याचा नवीन फंडा लोकांनी शोधून काढला आहे.घरात बनवलेला केक कापायचा व सर्व  मित्र-मैत्रीणी व नातेवाईकांच्या शुभेच्छा स्विकारायच्या.सोशल मिडियावर तर शुभेच्छांचा वर्षाव होतो.


वाढदिवसासारख्या महत्त्वाच्या दिवशी आपल्या माणसांची साथ आणि आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे असते. मात्र लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच घरात राहणे बंधनकारक झाल्याने वाढदिवस साजरा करताना प्रत्येकालाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आपली माणसं, नातेवाईक प्रत्यक्षात जरी भेटू शकत नसली तरी व्हर्च्युअली भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.वाढदिवसानिमित्त त्या व्यक्तीच्या घरात डिजिटल माध्यमामुळे शिरून त्यांचा आनंद द्विगुणित करणे शक्य आहे. त्यामुळे व्हिडिओ चॅट आणि ऑनलाइन माध्यमांच्याद्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊन वाढदिवसाला तुम्ही प्रत्यक्षात जरी उपस्थित नसलात तरी अप्रत्यक्षरित्या उपस्थित राहू शकता.


लहान मुलं आपल्या वाढदिवसाची वाट पाहत असतात.त्यांना नवीन कपडे व नवीन खेळणी मिळतात.मित्रांकडून गिफ्ट मिळतात.पण या घरातील बंदिस्त काळात आपल्या कुटुंबातच मुलांचे वाढदिवस साजरे करावे लागल्याने लहान मुलं नाराज आहेत.तसेच ज्येष्ठ मंडळीचीही ऐशी व पंच्च्याहत्तरी अशी ऑनलाईन साजरे झाली.शुभेच्छा व आशिवार्द सर्व काही अप्रत्यक्षरीत्या झाले.इतरवेळी कामानिमित्त बाहेर असलेलं कुटुंब यावेळी आपल्यासोबत आहेत हेच आपले वाढदिवसाचे मोठे गिफ्ट असे समजून वाढदिवस उत्साहात साजरा केला गेला.आपला हा आनंदाचा क्षण घरातच एकमेकांच्या साथीने आपल्या हक्काच्या माणसांसोबत आनंदात साजरा  केला.खेळाडू,सिनेकलाकार व राजकारणी नेते मंडळीनी वाढदिवस न साजरा केले नाहीत.

करोनामुळे जगभर मोठं संकट पसरलेलं असताना अनेकांनी या काळात आपला वाढदिवस हा समाजहितासाठी साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे करोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना वाढदिवसाच्या दिवशी गरजूंना मदत करणे हा तुमच्यासमोरील उत्तम पर्याय शोधला.म्हणजेच गरजूंना खायला अन्न देण्यापासून ते त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यापर्यंत मदत इतरांना करू शकले. तसेच वाढदिवसाला कोणतीही आकर्षक वस्तू न घेता गिफ्ट म्हणून गोरगरिबांना मदत करु शकले.काहींना रक्तदान करून  स्वतःबरोबरीने इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद पसरवता येऊ शकला. १० वर्षीय शाळकरी मुलीने तिचा वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीला पाच हजार रुपयांची मदत केली आहे.

वाढदिवस दरवर्षी येतो, कौतुकाच्या वर्षावानं मन आनंदून जातं. पण कौतुक जसं आनंद देते, तशी जबाबदारीची जाणीवही करून देते. कौतुक आणि स्तुती जवाबदारी वाढवते.दिवसभर शुभेच्छांचे फोन, मेसेजेस सतत चालू होते. आपल्यावर लोक एवढे प्रेम करतात ही भावना ही खरोखरच सुख देणारी आहे. वाढदिवस वर्षातून फक्त एकदा येणारा असला तरीही तो प्रत्येकाला वर्षभर वाट पाहायला लावतो.याची जाणीव सतत होत असते.


वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.


No comments: