Saturday, May 23, 2020

मातृदिन कायम आठवणीत राहील.

                                              मातृदिन कायम आठवणीत राहील.

परवाच मातृदिन झाला.आपल्या आईबद्दल आदर प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो.मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.पण बरोबर त्याच दिवशी माझ्या आईची तब्तेत ठिक नसल्याने तिला मी व माझा लहान भाऊ इस्पितलात दाखल करण्यास घेऊन आलो होतो.इस्पितळात डॉक्टरने आईला तपासून  झाल्यावर इस्पितळात दाखल करण्याच्या प्रक्रिया सुरु झाल्या. डॉक्टरने आम्हाला सर्व माहीती दिली.आईला व्हिलचेअर मध्ये बसवून आमच्या समोरून नेले.तिने आमच्याकडे पाहिले व हात दाखवला.त्याक्षणी आईला पाहून मला खूप वाईट वाटले.रडू येत होते.लॉकडाऊनच्या काळात इस्पितळाने केलेल्या नविन नियमानुसार आईला दाखल केल्यानंतर आम्हाला तिला भेटताही येणार नव्हते.त्यामुळे आईबद्दलची काळजी आणखी वाढली.कशी काय राहते? डॉक्टर आईवर जे उपचार करणार त्याची माहीती आम्हाला घरी फोनवर कळवणार होते.इस्पितळातली सर्व कामे पूर्ण करुन निघायच्या वेळी आईला फोनकरुन सर्व माहीती दिली.रुग्णालयातील सोयी विषयी माहीती घेतली.तिला धीर दिला.घरातील कोणीच तुला भेटणार नाही,याची कल्पना दिल्यावर तिचा आवाज गंभीर झाला.मी पण शांत झालो.मी स्वत:ला सावरत, तु लवकर बरी होऊन घरी येशील अशी शाश्वती दिल्यावर तिला आधार वाटला.मी व भाऊ घरी येण्यास निघालो.भावाला म्हणालो आज मातृदिन आहे.आपल्याला आईला इस्पितळात ठेवावे लागले.तोही थोडा वेळ शांत झाला.आईच्या काळजीत मातृदिन कधी गेला ते कळलेच नाही.चार दिवस इस्पितळात होती.त्या दिवसात आम्ही तिला भेटलो नाही.फक्त तिच्याकडे मोबाईल असल्याने मोबाईलवर तिची खुशाली घेत होतो.आता आईला घरी आणले आहे. तब्तेत सुधारत आहे. 
  

त्यादिवशी घरी आल्यावर सोशल मिडियावर मित्रांचे आईबरोबरचे फोटो पाहून आईची सारखी आठवण येत होती.सगळे आपल्या आईसोबत आहेत.मी मात्र आज आईला इस्पितलात ठेवून घरी आलो होतो. घरी असती तर आम्ही भावडांनी ऑनलाईन  मातृदिन साजरा केला असता.मी पण आईबरोबरचा फोटो अपलोड केला असता. सारखी तिची आठवण येत होती. काय करत असेल एकटीच इस्पितलात? कशी असेल? योग्य उपचार मिळत असतील का? काय खाल्ले असेल? झोप लागत असेल ना? असे बरेच प्रश्न सवावत होते. आईवरील प्रेम,तिच्या मायेची जाणीव सारखी होत होती.माझी आई माझ्यापासून लांब इस्पितळात उपचार घेत असल्याने मी तिला मातृदिन आठवण करुन दिली नाही.मी माझ्यामुलांसोबत नसल्याने तिला दु:ख झाले असते. 

अदल्याच दिवसापासून तिची तबतेत ठिक नव्हती.फॅमिली डॉक्टरने इस्पितलात दाखल करुन पुढचे उपचार करावे लागतील, असे सांगितले.लॉकडाऊनच्या व विषाणुच्या संसर्गाच्या दिवसात इस्पितळात दाखल न करता उपचार करु शकतो का? याची चौकशी दुस-या डॉक्टरांकडे केली.तिला इस्पितळात दाखल करावेच लागेल असे सगळ्यांचे मत होते.मग कोणत्या इस्पितळात उपचार घ्यायचे यावर चर्चा केली व तयारी करुन झोपलो.पण उद्याचा काळजीने आईला व मला रात्रभर झोप लागली नाही.

लॉकडाऊनमध्ये घरातून बाहेर पडण्याची भिती असताना आमच्यावर आईला इस्पितळात ठेवण्याची वेळ आली होती.ते दिवस कसे काढले ते आम्हालाच माहीत.आईची खूप काळजी वाटत होती. कसे काय होणार? पण देवाची कृपेने सर्वकाही व्यवस्थित झाले व ती सुखरुप घरी आली.ती चांगली ठणठणीत झाली व लॉकडाऊन उठले की आम्ही मातृदिन साजरा करणार आहोत.      

No comments: