Monday, May 18, 2020

निसर्ग मोकळा श्वास घेताना दिसतोय

निसर्ग मोकळा श्वास घेताना दिसतोय


’निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर देणगी आहे.निसर्ग आणि मानव यांचा संबंध अतुट आहे.निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे पण हल्ली मानवाने मैत्री कमी केली असल्याचे जाणवत आहे.हा संबंध बदलत्या काळाप्रमाणे बदलत आहे.मागच्या पन्नास दिवसात मनुष्य प्राण्याची निसर्गातली घुसखोरी कमी झाल्याने निसर्गात मोठा बदल झाला आहे.मनुष्य घरात बंदिस्त असल्याने शहरातील ऐंशी टक्के प्रदुषण घटल्याने सर्वत्र शांतता व आल्हाददायी वातावरण झाले आहे.हवा शुध्द व धुळमुक्त झाली आहे.नद्याचे पाणी स्वच्छ व निर्मळ झाले आहे.गुणवत्ता सुधारली आहे.प्राणी व पक्षी मुक्तपणे आंनदाने संचार करीत आहेत.प्राणी शहरात शिरले आहे.तर पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळत आहे.वातावरण स्वच्छ व प्रसन्न झाले आहे.झाडे व वेली जोमाने वाढत आहेत.शेतातल्या पिकांनी जोर धरला आहे.पक्षी, मानव आदी सर्व घटकांचा समावेश निसर्ग या संकल्पनेत होतो. निसर्गाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. त्याचबरोबर मानवी जीवनाचादेखील निसर्गावर परिणाम होत असतो. निसर्गात मानव बदल घडवून आणतो. तसेच मानवी जीवनातदेखील निसर्गामुळे बदल घडत राहतो.निसर्ग निर्मळ झाल्याने मनुष्य प्राण्याचे आजारपण दूर झाले आहेत.पृथ्वीवरील पर्यावरणाचा, निसर्गाचा मानवाकडून सुरू असलेला र्‍हास थांबवण्यासाठी निसर्गानेच कोरोनारूपी अस्त्र मानवाच्या दिशेने भिरकावले असावे, असा मत व्यक्त होत आहे.


लॉकडाऊनमुळे सगळीकडेच वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे हवेतील प्रदूषण स्वाभाविकपणे खाली आलेच, पण त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणातही लगेचच जाणवेल इतकी घट झाली.देशात सध्या निव्वळ अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन सुरू असल्याने कित्येक कारखाने बंद आहेत. स्वाभाविकपणे कारखान्यांकडून होणारे वायू आणि नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटले आहे. लॉकडाऊननंतरच्या दुसर्‍या आठवड्यातच देशाच्या किनारपट्टीनजीकच्या भागात समुद्री जीवांचा वावर ठळकपणाने वाढलेला दिसू लागला. अनेक ठिकाणी डॉल्फिनसारखे मासे किनारपट्टीच्या आणखी समीप आले. मुंबईजवळ अरबी समुद्रातही हा बदल दिसला. ओझोन चा थर पुन्हा पूर्ववत झाला आहे.


 वाढत चाललेले ग्लोबल वॉर्मिंग यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे.प्रदुषणाने निसर्गाची मोठी हानी होत आहे.विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्याने हवामान बदल, जागतिक तापमान वाढ अशा मोठय़ा समस्यांनी डोके वर काढले आहे.यात जैवविविधतेचा ऱ्हास हा महत्त्वाचा मुद्दा आहे.निसर्गाचे वेळापत्रक बदलत आहे.औद्योगिकरणाच्या प्रवाहात आणि आधुनिकीकरणाच्या नादात क्षणिक लाभाकरिता मानवाकडून करण्यात येणारी अतोनात वृक्षतोड, त्यामुळे गतीने नष्ट होणारी वनसंपदा आपल्या सभोवतीचा पर्यावरणसमतोल बिघडण्यास कारणीभूत ठरत आहे.कारखाने तसेच रासायनिक कारखान्यांतून निघणारा धूर तसेच विषारी द्रव्ये पाण्यात सोडल्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे निसर्गाची मोठी हानी होत आहे.रस्ते बांधताना तोडलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे लावली जात नाहीत.निसर्गाचा समतोल बिघडवण्यात आणि जमिनीच्या पोटातील पाण्याचा साठा संपवण्यात मानवाची मोठी भूमिका आहे.निसर्गाच्या नियमात मानवी हस्तक्षेप वाढला आणि जंगलातील प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले.  

आजच्या प्रगत वैज्ञानिक युगात मानवी समाजास निसर्गाच्या सान्निध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल व इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य माणसाला करावेच लागेल.

निसर्गातील या बदलांना तात्पुरतेच ठरवून इतिहासजमा करायचे की ते कायमस्वरूपी टिकावेत म्हणून पुढाकार घेऊन काही पावले टाकायची, याचा विचार अवश्य करावा लागेल.निसर्गाप्रतिची जागृकता वाढणे अधिक गरजेचे आहे.निसर्गाने आपल्याला जी संपत्ती दिली आहे ती आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची आहे.

समृद्ध निसर्ग वाचवा.


No comments: