Monday, August 3, 2020

मैत्री....एक अनमोल नातं




मैत्री....एक अनमोल नातं


मैत्री कधी होते ते कधीच कळत नाही. दोघांची मनं व मतं जुळली की मैत्री झालीच.मैत्रीत काय जादू आहे? मैत्री म्हणजे मुकी भावना, मनाच्या गोष्टी मनाला पोहचवणारी. मैत्रीचे  बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मनाला जोडणारी मैत्री, हे एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. प्रत्येक व्यक्तिला सर्वात जवळचा असा कुणी वाटत असेल तर तो म्हणजे मित्र. मैत्री व्हायला वेळ लागत नाही, पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो!

मैत्री म्हणजे एक रोपट असतं जे जमीनीत पुर्णपणे रुजलेल असतं.जमिनीवर दिसत त्याच्या दुप्पट जमिनीत असतं ज्याचा गाभा शोधण केवळ अशक्य असतं. “पाणी रे पाणी तेरा रंग कौसा” हे कधी कुणी सांगू शकेल का? तसचं मैत्रीच आहे. ती कशी असते, कधी होते, कुणासोबत व का होते? हे कुणालाच कधीच कळत नाही. पण जेव्हा मैत्री होते तेव्हा मात्र आपण वेगळेच कुणीतरी होऊन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात तरंगत असतो. मैत्रीमध्ये रंगीत धुंदी असते. यामध्ये वय, वेळ, समाज कशाचच बंधन रहात नाही. मैत्री एक हळुवार कोमल संवेदना आहे.याला शब्दात बांधण कठीण आहे व बांधण्याचा प्रत्यत्न करु नये. खरचं ज्या नात्याला उगम नाही ज्याचा जन्मच नाही तरीही हे नात इतक दृढ का होतं?

मैत्री अशी असावी, भरकटलेल्या पाखराला घराची वाट दाखवणारी, एकटेपणात सहवासाचा दिलासा देणारी, शब्दाविणा सर्व काही समजून घेणारी,सुख दु:खात साथ देणारी, संकटात दिलासा देणारी, न सांगताच डोळ्यातील भाव ओळखणारी,जीवाला जीव लावणारी,काळजी घेणारी,साद घातल्यावर धावत येणारी व प्रेमळ हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी.

लहानपासून वाढत्या वयाप्रमाणे आपल्याला नवे  मित्र मिळत जातात.पण सर्वांशी मैत्री कायम राहते. ती आयुष्यभर पुरते.मैत्री हि अशी सहज विसरता येत नाही. जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्याचं मोल करता येत नाही, त्यापैकी एक म्हणजे मैत्री. मैत्री हा अनमोल ठेवा आहे.अखंड विश्वाची अनुभूती म्हणजे मैत्री होय.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते. मैत्री म्हणजे माणसाने कुटुंबापलिकडे बनवलेलं पहिलं आणि एकमेव नातं. माणसाला वैयक्तिक आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची अशी ही दोनच नाती.या दोनपैकी माणसाला जास्त महत्त्वाचं नात कुठलं तर ते मैत्री. कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे मैत्री होय. जेवढं रक्ताच्या नात्याजवळ व्यक्त होता येत नाही तेवढं आपण या रेश्मी बंधात व्यक्त होतो. म्हणूनच की काय रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. 

फ्रेंडशिप, रिलेशनशिप हे इंग्रजी शब्द थोडा वेळ बरे वाटतात ऐकायला; पण थेट हृदयाला स्पर्श करतो तो शब्द म्हणजे ’मैत्री’. या शब्दांचा गोडवा कायम ठेवण्यासाठी, मित्रांशी असलेलं नातं आणि नात्यांमधली मैत्री जपण्याकरता आपण मग जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी काय फरक पडतो? मनापासूनची ओढ असेल तर सारं काही शक्य होते.

एक मैत्री कधीही न विसरता येणारी गोड आठवणीतली...... नेहमी ह्रदयाच्या कप्पात साठवलेली.

No comments: