Monday, August 10, 2020

पावसाचे दिवस

                                                             पावसाचे दिवस


पाऊस म्हणजे अख्या सृष्टीला वेड लावणारा अद‍्भूत सोहळा. आपण पावसाच्या आगमनाची वाट पाहत असतो. पावसाचा अंदाज वर्तवला जातो.पाऊस आला की सर्वांना आंनद होतो.पाऊस आपल्यासोबत काहीतरी नविन घेऊन येतो. सुरुवातील येताना पाऊस मोठ्याने गडगडाट करत येतो तर कधी वादळाच्या रुपात गरजतो. आकाश भरून येत आणि मेघ आनंदाने गरजतात आणि आपल्यावर पावसाच्या  जलधारा कोसळू  लागतात.पाऊस पडायला लागल्यावर सामान्य माणसंही आपपाल्या पध्दतीने त्यांचं स्वागत करतात व आस्वाद घेतात. पावसात मनमुराद भिजायला माणसं बाहेर पडतात. तरूण बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातात. चहा आणि गरमागरम कांदा भजी खातात. रोमँटिक कविता सुचतात.लिंबू मारके कणीस खातात.जुन्या आठवणीत रमतात.पावसाची गंमत ही वेगळीच असते.पाऊस कधी रिमझिम, कधी मुसळधार तर कधी अचानक धुंद करणार असतो.झिमझिमणारा पाऊस,टिपटिपणारा पाऊस,धो धो कोसळणारा पाऊस व टप टप पडणारा पाऊस.मना-मनात नवा उत्साह, नवा तजेला फुलवितो.


वेगवेगळ्या वयात पावसाची मजा घेण्याचे प्रकार वेगळे असतात.प्रत्येक वयात पावसाबद्दलची ओढ तशीच कायम टिकून राहते.शालेय जीवनात 'ये रे ये रे ..पावसा’ म्हणत पाण्यात कागदाच्या होड्या सोडायच्या तर कॉलेजच्या काळात विंडशिटर घालून किंवा भिजत मोटर सायकलवर प्रेयसीसह भिजायचे. लग्नानंतर एका छत्रीत पत्नीसह हिंदी चित्रपटातील गाणी गात बगीच्यात भिजायचे. उतार वयात एखादा पेग किंवा औषधाच्या गोळ्या खात आठवणीत जगायचे.  

सृष्टीवर सर्वत्र सृजनाचा चमत्कार घडत असतो.धरती तर किती विविधतेनं नटते. आटलेल्या नद्या, विहिरी, ओढे पाण्याने तुडुंब भरतात. प्रत्येकाच्याच चेहर्‍यावरचा आनंद द्विगुणित करत पाऊस बरसत असतो. निसर्ग बहरलेला दिसतो. निसर्गाचा अस्सल अनुभव घेण्यासाठी मात्र पावसाळ्यासारखा मोसम नाही. निसर्ग अगदी जर्द हिरवा शालू नेसून नटलेला दिसतो. दर्‍या-खोर्‍यातून नितळ पाण्याचे झरे वाहत असतात.विविध रानफुलं निसर्गात विविध रंगांची उधळण करतात.धुक्यात हरवलेल्या वाटा शोधव्या लागतात. तर कधी झुडपांवरचे दवबिंदू न्याहाळावे लागतात.कडेकपारीतून लहान मोठे ओहोळ आणि धबधबे कोळसतात.हिरव्या छटांची जणू चढाओढ असते.श्रावणातला पावसाचा रंग काही निराळाच असतो. कधी आकाशात क्षणात काळे-निळे ढग, क्षणात श्रावणसरींची मुलायम रिमझिम, सोनेरी उबदार उन्हं यांचा लपाछपीचा खेळ मस्त रंगतो 


शेतकरी डोळ्यात तेल घालून वरुण देवाची आतुरतेने वाट पाहताना दिसतात. शेतकर्‍यांना तर पावसाचाच आधार असतो. भरपूर पीक यावे यासाठी नाही पण निदान एक वेळचे पोट भरता यावे यासाठी तरी पावसाने पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत असतो.पाऊस अत्यंत लहरी आहे. तो कधी रिमझिम तर कधी उग्र रूप धारण करतो. शेतक-यांच्या मनात उद्याचे पीक फुलवणारा.त्याच्या कष्टावर

समाधानाचं शिंपण करणारा हा पाऊस. 


मुंबईत पाऊस पडून पणी साचून रेल्वे व बस सेवा बंद पडली.वाहतुक कोंडी व रस्त्यावर खड्डे पडले की पाऊस सुरु झाल्याचे लोकानुमते जाहीर होते.कार्यालये व शाळा,कॉलेज बंद झाल्यावर घरात बसून पावसाचा आंनद घेता येतो.मुंबईकरांचे पावसावर आणि पावसाचे मुंबईकरांवर किती प्रेम आहे हे शब्दात व्यक्त करणे कठीण असले तरी दोघांचा लहरीपणा मात्र सारखाच आहे.मुंबईतील पाऊस हा देशातील इतर भागातील पावसापेक्षा निश्चितच वेगळा असतो कारण मुंबईतील पाऊस सर्वांनाच हवा असतो.      


कित्येकांच्या नव्या आयुष्याची साक्ष म्हणजे हा पाऊस तर काहींच्या दुःखावर पांघरूण ओढणारा हा पाऊस. नव्या जिवाला पालवी देऊन, अंकुर आणणारा हा पाऊस, सहवासाची ओढ वाढवाणारा पाऊस, सर्वाना हवाहवासा वाटणारा हा पाऊस.


No comments: