Monday, October 19, 2009

दिवाळीत तले 'पोस्त'

एसेमेस, ईमेल, एसटीडी आणि कुरिअरच्या जमान्यातही पोष्टमन अपॉइण्टमेण्ट लेटर, मनीऑर्डर,लग्नाची आमंत्रणं,शेअरची कागदपत्रे इ. येत असतातच. पण दिवाळी आली की त्याची आठवण करून द्यायला पोष्टमन दरवाजावर हजर होतो.
दिवाळीत पोस्टमन,झाडुवाला,सोसायटीतील सिक्युरीटी गार्ड,मोलकरीण,ड्रायव्हर याना न चुकता दरवर्षी पोस्त द्यावाच लागतो.सामान्य माणुस ही माडंळी आपली सेवा करतात म्हणुन पोस्त देऊन त्याचा दिवाळी सण आनंदात साजरा होण्यास हातभार लावतात.
पण या पोस्तला दिवाळी हा शब्द जोडला जातो, तेव्हा त्याचा अर्थ आणखी बदलतो. दिवाळी हा शब्द पोस्तला गावाच्या माळावरून शेतातल्या खळ्यावर घेऊन जातो. दिवाळी जवळ यायला लागली की शेताची कापणी झालेली असायची. खळ्यावर धान्य पोत्यांत भरून तयार व्हायचं. काळ्या आईच्या प्रेमाने गावाचा पोशिंदा असणारा शेतकरी समाधानी असायचा. वर्षभर गावाची सेवा करणारे सुतार, कुंभार, चांभार, महार असे बारा बलुतेदार जमा व्हायचे. ती तेव्हाची गावातली सव्हिर्स इण्डस्ट्रीच होती. शेतकरी प्रत्येकाला धान्यातली त्याची हक्काची वाटणी द्यायचा. मग उरलेलं धान्य बैलगाडीत घालून घरी जायचं.
दिवाळी आला की नोकरदारालाही बोनस मिळतो. सरकारी नोकरांना बोनस मिळतो. प्रायव्हेटवाल्यांना मिळतो त्याला इन्सेण्टिव्ह, टागेर्ट व्हेरिएबल पे,कमिशन अशी नावं आहेत. आमच्या कष्टातून कंपनीला फायदा होतो, तर आम्हालाही त्यात वाटा हवाच, असं भांडून बोनस मिळवला जातो. आपण एकीकडे एम्प्लॉयी असतो, दुसरीकडे एम्प्लॉयर. पण एका हाताने बोनस घेताना आपण हसतो. आणि दुसऱ्या हाताने पोस्त देताना तोंड वाकडं करतो.
श्रमाला प्रतिष्ठा देण्याची परंपरा आपल्याकडे नाही.पण पोस्त देऊन श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यारी प्रथा पाडु शकतो.
आपली कामं रोज करणाऱ्या माणसांचे आभार आपण रोज मानू शकत नाही. दिवाळीत त्याना पोस्त देऊन आमच्याप्रमाणे तुम्हीही आनंदात सण साजरा करण्याची आपलेपणाची भावना व्यक्त करण्याची संधी मिळ्वु शकता.
देण्यात आनंद आहे. वाटल्याने वाढतं म्हणतात, ते खरं आहे. हसत दिलेल्या पोस्तमधून तो आनंद मिळवता येऊ शकतो. पोस्त ही एक संधी आहे आनंद मिळवण्याची. आपल्या देण्याने कुणाच्या तरी घरी माझ्या घरी दिवे उजळले आहेत, त्याचा आनंद आहेच. पण ज्यांच्या घरी अंधार आहे, त्यांचं घर कुणी प्रकाशमान करायचं? त्यांची जबाबदारीही आपलीच, नाही का?
माणुसकी म्हणून कर्तव्य आहे ते आपलं.

No comments: