Thursday, May 13, 2010

पुर्वांचलचा दौरा

केंद्र सरकारने पुर्वांचल प्रदेशात निसर्गसौंदर्याची लयलूट असूनही दहशतवादामुळे दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत.त्याचा फायदा घेत आम्ही मित्रानी सिक्कीम,दार्जलिंग,मिरीक या ठिकाणी न जाता मेघालय,आसाम व अरुणाचल प्रदेशात जाण्याचा दौरा आखला. भारताच्या ईशान्येकडे असलेली आसाम , मेघालय , नागालँड , त्रिपूरा ,मणीपूर , मिझोराम , अरुणाचल प्रदेश म्हणजे समृद्ध राज्यांचा तेजस्वी पुंज . सगळेच प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेतच पण शिवाय त्यांच्यात वैविध्य देखील आहे .सात बहीणी आणि त्यांच्या गटात नुकताच सामील झालेला सिक्कीम . सगळेच प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेतच पण शिवाय त्यांच्यात वैविध्य देखील आहे . दुर्देवाने ही राज्ये दहशतवादाच्या काळ्या सावलीखाली झाकोळली गेली .


विमानाने प्रवास करीत आम्ही १६ एप्रिल रोजी १२:३० वाजंता 'गुवाहटी' येथे पोहचलो.काही मित्रांचा पहीला विमानप्रवास होता.प्रवासात मजा केली.पायलटला विनंती केल्यावर त्यानी आम्हाला काँकपिटमघ्ये प्रवेश दिला व माहीती दिली. ते सुर्वण क्षण कायमचे लक्षात राहीले व आपला दौरा स्मरणीय होणार यांची सुरुवातीलाच प्रचिती आली. गुवाहटीत कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आम्ही दौ-याची सुरुवात केली. कामाख्या मंदिर हे ईशान्य भारतात वसलेलं एक शक्तीपीठ . आणि तांत्रिकविद्या अवगत करणा - या अनेक बंगाली बाबा आणि तांत्रिकांचं ते मुख्य श्रद्धास्थान ... कबुतरं , मेंढ्या आणि रेडे यांचे बळी इथे अक्षरश : रोज दिले जातात . देवळाच्या मागे एक मोठ्ठंच्या मोठ्ठं सभागृह आहे . त्यात पाऊल टाकवत नाही इतकी दुर्गंधी भरली असते . पण बळी या प्रथेची संवेदनशीलता अख्ख्या ईशान्य भारतातच इतकी प्रखर आहे की देवापुढे नारळ वाढवण्याइतक्या सहजतेने त्या बळी जाणा - या प्राण्याकडे पाहिलं जातं . थंडगार काळोख्या गुहेतल्या देवीचं रूप खरंच खूप सुंदर आहे .ती जिथे वसलीय तो परिसरही निसर्गपूर्ण आहे .



आमचे शिलाँगच्या दिशेने प्रयाण सुरु झाले.मुबंईच्या उकाड्यातून आल्यानतंर शिलाँगचा गारवा हवाहवासा वाटत होता. गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर शिलाँगपर्यंतचा प्रवास चार तासांचा. पहिला अर्धा तास वगळता उरलेला प्रवास वळणावळणांचा. रस्त्याच्या दुतर्फा पाईन वृक्षांच्या रांगा ताठ मानेने तुमचं स्वागत करीत असतात. शिलाँगमध्ये शिरताना बडापानी लेकची नजरभेट होते. हा निर्सर्गाच्या अदाकारीचा अद्भुत करिश्मा. गर्द हिरव्या टेकड्यांनी वेढलेला. मुंबईतल्या पवई तलावाच्या दुप्पट आकाराचा. स्फटिक शुभ्र पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब पडल्यामुळे तो विरघळलेल्या नीलमण्यासारखा भासतो. स्पीड बोटीतून तलावात चक्कर टाकताना भिरभिरणारा थंड बोचरा वारा अंगावर काटा आणतो. तलावाचं पाणीही अगदी गोड चवीचं. येथे घरण असून वीज तयार केली जाते. सकाळपासूनच्या प्रवासाच्या थकव्याने व काळोख झाल्याने आम्ही जास्त वेळ येथे थांबलो नाही.'बोनी हाउस'या शिलाँग येथील हाँटेलमघ्ये उतरलो.



दुस-या दिवशी शहरात भटकताना वॉर्ड लेक, डॉन बॉस्को म्युझिअम, बाजार पाहू शकता. शहरातून थोडं बाहेर शिलाँग पीक आहे. सूर्य डोक्यावर असतानाही तुम्ही इथे स्वेटर-शालीशिवाय उभं राहू शकत नाही. इथून शिलाँग शहराचं मनोहारी दर्शन घडतं. जवळच गरमागरम चहा,भजी, मक्याची कणसं विकणारे ठेले आहे. मनगटाच्या जाडीच्या केळीचे घड आणि काही आंबटगोड रानफळंही इथे मिळतात.'खाशी' जमातीचा पेहराव करुन फोटो काढले. जवळच वायुदलाचं म्युझियमही आहे. शिलाँग पिकचं दर्शन घेऊन तुम्ही चेरापुंजीच्या दिशेने पुढे चला. वाटेत एलिफण्ट फॉलचं दर्शन घेता येईल. धुक्यात बुडालेले रस्ते, शुभ्र मेघांनी काठोकाठ भरलेल्या दऱ्या आणि उंच ताशीव कड्यांमधून स्त्रवणारे फेसाळत्या दुधासारखे धबधबे. धुक्याची चादर पांघरलेल्या वाऱ्यातला ओलसरपणा अंगावर घेत, वाटेत थांबत थांबत पुढे सरका. रस्त्याच्या दुतर्फा टोमॅटॉ, कॉलिफ्लॉवरची शेती दिसू लागते. पाऊस नसेल तर निसर्ग तुमच्यावर मेहरबान आहे असं समजा. वीजेच्या कडकडाटासह कोसळणारा पाऊस इथल्या लोकांना सवयीचा आहे. चेरापुंजीत रामकृष्ण मिशनच्या शाळेजवळच धबाधबा कोसळणारा 'नॉक्लेकाई फॉल' आहे. मेघालय सरकारने इथले काही पॉइण्ट चांगले विकसित केले आहेत. 'इको पार्क' पाहताना तुम्हाला याचा प्रत्यय येईल. जमिनीखालून वाहणारा आणि अचानक पुढे प्रकट होणारा धबधबा तुम्हाला या पार्कमध्ये पाहता येतो. इथून तुम्हाला डोंगरांच्या पलिकडे बांगलादेशातली हिरवीगार मैदानं पाहता येतात. पुढे सात धबधब्यांचा सेव्हन सिस्टर फॉल, थांगाकारांग पार्क पाहता येईल. पण खरं थ्रील आहे ते 'मौसमाई केव्ह' पाहण्यात. गुंफेतले दगड कधी दाक्षांच्या घडासारखे, मेणबत्तीच्या वितळलेल्या मेणाच्या सारखे तर कधी लांब पात्याच्या खड्गासारखे वाटतात. गुंफेचा रस्ता मध्येच इतका चिंचोळा होतो की अंग चोरून एखादाच आत शिरू शकतो. कुठून तरी झिरपणा-या पाण्यामुळे गुंफेत पाणीही साचलंय. जोवाईमध्ये ब्रिटीशांविरुद्ध कडवी झुंज देणारे थोर क्रांतीकारक किएंग नांगबा यांचं स्मारक दिसतं. संतुक सीयार नावाने ओळखलं जाणारं हे स्मारक नदी काठी आहे. या नदीवर हावडा ब्रिजची प्रतिकृती असलेला छोटा ब्रिज आहे. नदीच्या काठावर अनेक लोक तासंतास गळ टाकून बसलेले असतात. जोवाईतला यालाँग व्ह्यू पाँइण्ट एका देवराईने वेढलेला आहे. या पवित्र जंगलात धामिर्क विधी होत असल्यामुळे तिथे अस्वच्छता करण्यास मनाई असते. डोंगराच्या मधोमध असलेल्या हिरव्यागार शेतांचं इथून दर्शन होतं. भव्य शिळांची रेलचेल असलेलं मोनोलीत हे इथलं आणखी एक पवित्र स्थान. बांगलादेश सीमा जिथून जवळून पाहायला मिळते ते डावकी, किटकभक्षी घटपणीर् आढळते ती पीनर्सुला व्हॅली, नैर्सगिर्क शिवलिंग असलेली 'मौसिनराम केव्ह' अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं या राज्यात पाहायला मिळतात. इकडे विवाहपध्दतीत लग्न झाल्यावर नवरा नवरीकडे रहायला जातो.नवरा सासरी जातो.लग्नानतंर मुलगी मुलग्याला नांदवते.ती कामाला जाते व नवरा घर सांभालतो.तिला त्याचा त्रास झाला तर ती त्याला सोडुन दुस-याशी पुन्हा लग्न करु शकते.बाजारात सर्व दुकानात स्त्रिया कामे करताना दिसतात.इथले हवामान फारच छान व उत्साह भरणारे आहे.ख्रिचन घर्माचे लोक पाहण्यास मिळतो.शिलाँगमघ्ये मोठा चर्च आहे.एकाच वेळी तीनतीन ठिकाणी प्रार्थना होत असते.

नजर टाकाल तिथे हिरव्यागार टेकड्या, शुभ्र धुक्याने काठोकाठ भरलेल्या द-या, डोळे निवतील असे विशाल तलाव, नागमोडी वळणं घेत वाहणाऱ्या नद्या असा देखणा मामला म्हणजे मेघालय. स्वित्झर्लंड ऑफ इस्ट हे मेघालयचं हे नामकरण ब्रिटीशांनीच केलंय, ते अनुभवायला मिळते.








दोन दिवस शिलाँगमघ्ये काढल्यानतंर आम्ही तिस-या दिवशी आसामकडे जाण्य़ास निघालो.आजच्या प्रवासात सकाळपासुनच पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. हिरव्यागार वनश्री मघुन आल्हादायक प्रवास सुरु होता.आसाम मघ्ये नँशनल हायवे बांधण्यास सुरुवात झाली आहे. शिलाँग-गुवाहाटी-काझीरंगा-जि-हाट या मार्गावर पर्यटकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.गेल्या दोन वर्षांत केंदाकडून या राज्यांना पर्यटन विकासासाठी अर्थसाह्यही करण्यात आले.ईशान्येकडे अधिकाधिक पर्यटक वळावेत , यासाठी तेथील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचेही केंदाने ठरवले आहे.



मुंबईत मराठी माणसे अल्पसंख्य होतील की काय, अशी भीती व्यक्त होत असताना तिकडे आसाममध्ये आसामी माणसांनाही हीच शंका भेडसावत आहे. तेथे बिहारी आणि बंगाली लोकांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी' केलेली आहे. मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश ही सहा राज्ये आणि म्यानमार, बांगलादेश व भूतान हे तीन देश यांच्या बेचक्यात सापडलेले राज्य म्हणजे आसाम.







आसामचा दहशतवाद चर्चेत असतो पण हा प्रदेश एक उत्तम टुरिस्ट स्पॉट आहे. एकशिंगी गेंडा असणा-या 'काझीरंगा'प्रमाणेच 'मानस'चे व्याघ्र अभयारण्यही 'र्वल्ड हेरिटेज साईट' आहे. दोन लाख लोकवस्तीचं ब्रह्मापुत्रेच्या पोटातील 'माजुली' हे बेटही 'र्वल्ड हेरीटेज साईट' म्हणून घोषित व्हावे, असे आसामी जनतेला वाटते.ब्रह्मापुत्रेच्या लहरी प्रवाहामुळे माजुलीच्या आकार दिवसेंदिवस कमी होतोय. आता शिल्लक असलेल्या १८ सत्रांपैकी 'कमलाबारी' व 'गहमूर' तर अवश्य पाहावीत. बोडो, कारबी, डिमासा या आसामातल्या प्रमुख जनजाती.आसामचं कोकणाशी कमालीचं सार्धम्य. लाल मातीचे डोंगर, नारळी-पोफळीच्या बागा, जेवणात भाताचा वापर अशी बरीच साम्यस्थळं आहेत. आसामी व मराठी या बहिणी वाटाव्यात, इतके समान शब्द आहेत. मात्र, उच्चारातील फरक खूप. आसामीत 'सर' व 'श' चा उच्चार 'ह' असा करतात, पण 'ह' चा 'ह'च उच्चारल्यामुळे 'सुहास'चे 'हुहाइ' होते व गंमत वाटते. महाराष्ट्रातली 'आई' आसामकडे जाताना मधल्या पाच राज्यांमध्ये 'मां' असते पण आसामात ती परत 'आई' होते. आसामच्या चहाच्या मळ्यात वापरण्यात येणारी टोपी हे एक शुभ प्रतिक म्हणुन सर्व ठिकाणी पाहण्यास मिळते.
आसाम शब्द उच्चारला,की ब्रह्मपुत्रा नदी आठवते.या राज्यातुन ही वाहते.पण ह्या नदीचा उगम तिबेट मघ्ये आहे.ब्रह्मपुत्रेमघ्ये स्नान करणे अशुभ मानतात.ब्रह्मपुत्रेच्या गाळाने आसामला सुपीक बनवले आहे.पण पावसाळ्यात ही नदी उग्र स्वरुप धारण करते आणि हाहाकार माजवते.ब्रह्मपुत्रेला पूर आला की त्याचे पाणी काझीरंगा अभयारण्यही घुसते.ही नदी इतकी विशाल आहे की तिला नदी न म्हणता 'नद' म्हणतात.







आजचा आमचा प्रवास 'माजुली बेट ' पर्यत होता. काझिरंगाचे जगंल व चहाचे मळे पाहत प्रवास झाला.
दुथडी भरून वाहणा-या ब्रह्मापुत्रा नदीच्या दोन प्रवाहांमध्ये वसलेल्या ' माजुली ' बेटाची होत असलेली धूप सध्या भूशास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.ब्रह्मापुत्रा नदीमघ्ल्या ह्या बेटांवर जाण्यास बोटी प्रवास करावा लागतो.ह्या बेटांवर मनुष्यवस्ती आहे. आम्ही येण्याच्या अगोदर या ठीकाणी वादळ झाले होते.त्याची निशाणी दिसत होती.बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर. या काळात वहिवाटीसाठी बोटीचा वापर होतो. बोटीतला प्रवास आनंददायी झाला.बोटीच्या प्रवासात 'टिसीएस' या ग्रुपचे प्रतिनिधी भेटले हे या ठिकाणी पर्यटनाच्या कोणत्या सुविधा असाव्यात याचा अभ्यास करण्यास आले होते.बेटावर मोठी लोकवस्ती आहे.दोन मोठे आश्रम आहेत.प्रत्येक घरातील एक मुलगा या आश्रमात आयुष्यभरासाठी सुपुर्त केला जातो.त्याने आश्रमासाठी वाहुन घेतले जाते.माजुली या बेटाची नदीतील सर्वात मोठे बेट म्हणून जगभर ख्याती आहे. म्हणूनच या महत्त्वपूर्ण बेटाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्यात व्हायला पाहिजेत.माजुली बेटावर जाण्यासाठी करावा लागणारा जर प्रवास बोटीच्या टपावरुन केल्यास आल्हाद वाटतो.बेटाहुन परतीच्या प्रवास पाउस नसल्याने सुखद झाला.



आसाम मघला 'बिहु'नाच प्रसिध्द आहे.या भागात या नाचाच्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.



पण आम्हाला 'कालीबोर' या ब्रिटीशाने वापरलेल्या बगंल्यात वास्तव्यासाठी सोय केली होती.आता हा बगंला एकाबंगाली माणसाकडे आहे.तो त्या बंगल्यात राहुन त्याची देखभाल करतो.जसा त्या इंग्रजानी वापरा असेल तसाच त्याने ठेवला आहे.चहाच्या मळ्यात एका सुदंर बागेमघ्ये हा बगंला बसवलेला आहे.रात्रीच्या कालोखातील या बगंल्याची सुदंरता व आमचे स्वागत पाहुन आम्ही आमच्या प्रवासाचा क्षीण विसरुन गेलो. प्रत्येक गोष्ट पुरातन असल्याने त्याची जपणुक त्या गृहस्थाने व्यवस्थित केली होती व ती पहण्यासारखी होती. आमची सर्वात चांगली सोय येथे झाली.त्याने बंगल्यातील सर्व गोष्टी स्वत:हुन आमच्या बरोबर राहुन दाखविल्या. प्रशत जागा व स्वच्छता पाहुन थक्क् झालो.जेवणाची सोय तर विशेष पाहुणचार होता.त्या पाहुणचाराला आम्ही बुजलो व लाजलो असा हा पाहुणचार आम्ही अगोदर केव्हा घेतला नव्हता. दुस-या दिवशी चहाचे मळे फिरलो.त्या चहाच्या मळ्यात काम करणा-याशी गप्पा मारल्या.त्याच्यासह फोटो काढले.दुस-या दिवशी चहाचे मळे फिरलो.त्या चहाच्या मळ्यात काम करणा-याशी गप्पा मारल्या.त्याच्यासह फोटो काढले.चहाचे मळेवाले श्रींमत आहेत.पण कर्मचारी गरीब आहेत.दुपारी निघुन आम्ही काझिरंगा अभयारण्यात पोहचलो.हे अभयारण्य एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे.जुनमघ्ये पावसळ्यात ब्रह्मपुत्रेचे पाणी अभयारण्यात शिरते म्हणुन अभयारण्य बंद असते.प्राणीही वाहुन जातात.या अभयारण्यात ह्जारो गेंडे आहेत.जीपने किंवा हत्तीवरुन या अभयारण्यात फिरण्याची सोय आहे.आम्ही जीप सफारीने फिरलो.हरीणे,रानडुक्करे,हत्ती,गेंडे पाहण्यास मिळाले.काही पक्षी दिसले. स्वछंदपणे फिरणारे पाहण्यास आनंद होतो.गेंडे जवळुन पाहण्यास मिळाले.सध्याकांळी खुपसे प्राणी नदीकाठी जमलेले दिसले.हे अभयारण्य खुप मोठे आहे.सपुर्ण फिरण्यास मिळत नाही.प्राण्याना शिकारी मारतात म्हणुन पाहरेकरी ठेवलेले आहेत.



नामशेष होत असलेल्या एकशिंगी गेंड्यांना आसरा देऊन त्यांचे जतन करत असलेल्या काझीरंगा नॅशनल पार्कचा समावेश असल्याने आसामच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दीड माणूस उंचीच्या गवतातून मोकळा फिरणारा एकशिंगी गेंडा पाहण्यास काझीरंगा अभयारण्यात जगभरातून पर्यटक येतात.



दुस-या दिवशी काझीरंगा अभयारण्याला बाय बाय करुन तेजपुरमार्गे भालंगपुर येथे आलो.हे अरुणाचल या राज्याचे प्रवेशव्दार आहे.अरुणाचल प्रदेश या राज्यात (Iner Line Permit) ही परवानगी दाखविल्यानतंरच प्रवेश दिला जातो.आम्ही ही परवानगी अगोदरच मिळविली होती ती दाखवून प्रवेश मिळविला. पुढचा प्रवास पावसातुन चिखलाच्या रस्त्यातून सुरु झाला.एका बाजुने सरक्षंण खात्याच्या गाड्या जात असतात.दुस-या बाजुला नदी वाहत असते.आमची गाडी बोटीसारखी चालत होती.गाडी घाट चढत होती.ढगाळ वातावरणामुळे पुढचे काहीच दिसत नव्हते.गाडीचा चालक त्याच्या अदांजाने गाडी चालवत असतात.आम्हाला अशा परीस्थितीत गाडी चाललेली पाहुन सुरक्षित वाटत नव्हते.दाट जगंलातून जाणा-या या अरुंद रस्त्यावरुन आमचा खडतर प्रवास सुरु होता.डाव्या हातास डोंगराची कडा तर उजवीकडच्या दरीत विरळ धुकं तरंगत होतं. जसजसे आम्ही अंतर कापत होतो, तसतशी ती दरी खोल होत होती. दरीतील ती खट्याळ नदी कधी वळसे घेई तर कधी सरळ वाहे. प्रवासात एका मिलिटरी कँम्पवर दोन मराठी जवानांना भेटल्याने आम्हाला आनंद झाला.त्याना आम्ही आमच्या कडची मिठाई भेट दिल्याने तेही खुष झाले.खरच आपल्या सुरक्षेसाठी हे जवान दुर्गम भागात पहारा देतात ते पाहुन आम्ही त्याच्या कार्याला सलाम करुन पुढे निघालो. पुढचा प्रवास उताराचा होता व चक्क उन पडले होते.घाट उतरत असताना बाजुला छोटी छोटी गांवे पाठीमागे पडत होती.पर्वताच्या कडेवर याची घरे चिटकल्याप्रमाणे दिसतात. 'बोमडीला'येथे थांबुन येथील मोनेस्ट्रीला भेट दिली.या मोनेस्ट्रीतील स्वच्छता थक्क झाले.'बोमडीला'हे शहर पर्वताच्या उतारावर वसले आहे.येथील संध्याकाळ उल्हसित वाटली.




तेजपूर ते तवांग हे ३४३ किमीचे डोंगराळ रस्त्यावरचं अंतर एका दिवसात पार करणं शक्य नसल्याने आम्ही 'दिरांग' येथे मुक्कामास गाडी थांबली.दिरांगनंतर तवांगच्या दिशेने जाताना वाटेत सेलापास (१३८०० फुट) उंचीवर ही खिंड पार करावी लागते. 'सेला पास' ह्या खिडीत थांबलो .गाडीत बाहेर पडल्यानतंर थंडीने कुडकुडलो. थंड वा-याच्या झोतात तेथे उभे रहणे कठीण जात होते.समोर उंच उंच बर्फाचे पर्वत ढगात लपलेले असतात.मघ्येच ढग बाजुला सरल्याने हे पर्वत आपले दर्शन देतात ते दृश पाहण्यास सारखे व विलोभनिय दिसते. समोर एक तलाव आहे त्यामघ्ये या पर्वताच्या प्रतिमा दिसतात हे पाहुन आपण स्बर्गच पाहत असतो. बर्फाचे ढीग आपली नजर ओढुन घेत होते. येथुन दुरवर वसलेल्या 'तंवाग' शहराचे दर्शन झाले.


त्यापुढे २१ किमी दूर असलेल्या 'जसवंतगढ' हे भारतीय जवानांचं स्मारक लागतं. मूळचा रुदप्रयागचा जसवंतसिंग या जवानाने आपल्या प्राणांचे मोल देऊन चिनी सैन्याला या ठिकाणीच थोपवलं होतं. स्वत: घायाळ होऊनही त्याने ऐकट्याने चिन्यांच्या २०० सैनिकांना कंठस्नान घातले होते.. जसवंतसिंग या जवानाला त्याच्या एकट्याच्या लढाईत तेथील दोन मुलीनी मदत केली होती.त्यातील एकीचे नांव 'सेला'होते.तिचेच नांव(सेला पास) या खिंडिला दिले आहे.पण तिच्या शौर्याबद्द्ल इतिहासात कोठेच नोंद नाही.ऐकुन वाईट वाटले.


'सेला पास' नतंर घाट उतरत खाली यावे लागते.काही अतंरावर 'जाँग फाँल' ह्या सुदंर धबधब्याचे दर्शन होते.काही फुटावरुन पाण्याचा मोठा झोत खडकाहुन आदळत खाली उडी मारत होता.त्याचे दवबिंदु दुरवर पसरताना दिसतात.संध्याकाळ झाल्याने आम्हाला येथुन लवकर निघावे लागेल.आम्हा मुबंईकराना धबधबा दिसला की प्रथम त्या धबधब्यात घुसुन आनंद लुटल्या शिवाय बाहेर पडु शकत नाही. पण येथे पाण्याचा वेग व थंडावा पाहुन कोणाचीच पाण्यात घुसण्याचा विचारच केला नाही.


ईशान्येकडील भागात सर्वात उंच असलेल्या या खिंडीनंतर खरी चढण सुरू झाली. काळे ढग भरुन आले व पावसाने वीजा चमकवत घुमधडाक्यात 'तवांग'ला आमचे स्वागत झाले.थंडी वाढली व बर्फवृष्टी सुरु झाली.आम्ही तो वातवरणातला चमत्कार पहिल्यांदाच पाहण्यात आले.सभोवताली पडलेला बर्फ पाहण्यास मिळाला. तवांगला जाण्याची निम्मी मौज त्यासाठी केलेल्या प्रवासातच आहे.


'तवांग' येथुन पन्नास किलोमीटरवर शहराबाहेरील दूर असलेली लहानमोठी रमणीय तळी बघण्यासाठी निघालो. तळ्यांचा परिसर तिबेट हद्दीजवळ असल्याने वाटेत फौजेच्या छावण्या लागतात त्या भागात जाण्यापुर्वी, शहराबाहेरच्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहून आम्हास आनंद झाला. आम्ही 'जय भवानी जय शिवाजी'च्या धोषणा दिल्या.मराठा रेजीमेंट चे जवान खुष झाले.छावण्यातील जवान प्रवाशांचे परवाने तपासुनच या भागात प्रवेश देतात.हा रस्ता रमणीय आहे.पुढे गेल्यावर सगळी कडे बर्फच बर्फ दिसतो.बर्फातून रस्ता काढीत गाडी पुढे जात होती.'पँराडाईज लेक'दिसतो.येथे आपण स्वर्गच पाहत असतो.थंडी खुप होती.मघ्येच थोडेसे उन पडले आणि त्यावेळेस जे दृश पाहण्यास मिळाले तसे पुन्हा पाहण्यास मिळणार नव्ह्ते म्हणुन आम्ही कँमे-यात उतरवुन घेतले.तसेच पुढे गेल्यावर खाली उतरल्यानतंर माधुरी लेक पाहण्यास मिळते.या ठीकाणी 'कोयला'चित्रपटाचे शुटींग झाल्यापासुन हा तलाव तिच्या नावांने प्रसिध्द आहे.तो परिसर खुपच छान आहे.धुक्यात लपेटला असतो.येथीही जवान भेटले मात्र यावेळेस त्यांनी आम्हाला खाऊ दिला. येथुन मागे पाय फिरत नव्ह्ते.फारच सुदंर जागा आहे.संध्याकाळी पावसाने जोर घरला आम्हाला रुमच्या बाहेर पडणे कठीण होते.हाँटेलमघ्येच पत्ते खेळत टाईमपास करीत होतो.पाउस ओसरल्या नतंर बाहेर निघालो तर सगळीकडे बर्फ पडलेला होता.रस्त्याचा दोन्ही बाजुला सहा इंचाचा बर्फाचा थर होता. ते पाहुन आम्ही सगळे आश्चर्य चकीत झालो.








दुस-या दिवशी सकाळीच तवांग गोम्पा बघण्यासाठी आम्ही निघालो. निळ्या डोंगराच्या आपपास रेंगाळणाऱ्या शुभ्र ढगांच्या पार्श्वभूमीवरील त्या महान गोम्पाचं संकुल, हिरव्या डोंगरांच्या उतरणीवर उठून दिसत होते. संकुलात शिरल्यावर सुरुवातीला लागते ती वस्तुसंग्रहालयाची इमारत, मध्ये मोकळी जागा सोडून डाव्या हाताला प्रार्थना मंदिर लागते. भरपूर उंची असलेल्या प्रार्थना मंदिरात शिरताच दिसणारी छतावरील चित्रं बघून आपण चकित होतो. दालनातील मौल्यवान 'ठंका' आपले लक्ष वेधून घेतात. समोर दिसते ती पूर्ण दालनाला भारून टाकणारी भगवान बुद्धाची २५ फुटी, भूमीस्पर्शमुदेतील मनोहरी मूतीर्. दालनात आमच्याशिवाय कोणीच नव्हते. मूतीर्जवळ तुपाचे दिवे फडफडत होते. भडक रंगातील धातूचं भव्य प्रार्थनाचक्र स्थिर होतं. आम्हीही स्थळाचं महात्म्य लक्षात घेऊन दालनातून शांतपणे चक्कर मारली. प्रार्थनामंदिराला वळसा घालून मागे गेल्यावर लागते ती नवभिख्खूंसाठींची शाळा आणि वाचनालय. या सर्व इमारती टेकाडावर आहेत. तर टेकडीच्या उतारावर भिख्खूंची घरं, स्वयंपाकगृह, गोदामं अशासाठी बैठ्या खोल्या आहेत. लडाख, स्पिती इथल्या गोम्पासाठी मोटारप्रवासानंतरही चढण चढावी लागते. इथे मात्र मोटारीचा रस्ता वरपर्यंत जातो. या मुख्य संकुलापासून मोटारच्या रस्त्याने खालच्या अंगाला ६ किमी दूर, पण पायी डोंगरवाटेने चटकन जाऊ शकू, असं सहाव्या लामाचं जन्मस्थान उमेर्लिंग गोम्पा इथे आहे. याशिवाय आमीर्वॉर मेमोरिअलला भेट दिली.


आमचा परतीचा प्रवास तवांग,दिरांग,भांलगपूर,तेजपुर आणि गोहाटीहुन विमानाने मुबंईला दौरा यशस्वी करुन २७ एप्रिल रोजी मुबंईत परतलो.


पुर्वांचल दौ-याचे काही फोटो ब्लाँगवर आहेत.

4 comments:

Narendra prabhu said...

वा..! छान माहिती लिहिली आहे तुम्ही. चार वर्षांपुर्वी आम्ही (मी, हर्षदा आणि मुलगी ऋचा) असाच दौरा केला होता. खुप मजा आली होती. त्या आठवणी ताज्या झाल्या. ब्लॉगवर फोटो टाका.

VIVEK TAVATE said...

फोटोचा (slide Show) ब्लाँगवर ठेवला आहे.

mukul said...

shriram.......

blog /photo best

mukund mh-18

mukul said...

shriram..........

photo/blog best
thanks for info....mukul