Saturday, July 31, 2010

शोधिसी मानवा..

   आज मोहम्मद रफी यांचा स्मृतीदिन आहे. समाजमनावर ठसा सोडून जाणा-या कलाकाराची आठवण निघाली, की चर्चा होते ती त्यांच्या कामाची आणि कलेची. त्या-त्या क्षेत्रात त्यांने दिलेल्या योगदानाची. दिवंगत लोकप्रिय गायक महम्मद रफी यांच्या आवाजाची जादू आजही रसिकांच्या मनात कायम आहे.शोधिसी मानवा राऊळी मंदिरी,हा छंद जिवाला लावी पिसे,रे मना आज तुला ही अजरामर मराठी गीते महम्मद रफी यानी गायली आहेत. आपल्या जादुई आवाजाने संगीतप्रेमींच्या हृदयात कायमचे मानाचे स्थान पटकावणारे मोहम्मद रफी.एक काळ होता जेव्हा मोहम्मद रफी (हा रुसवा सोड सखे, शोधिसी मानवा), हेमंत कुमार (गोमू संगतीनं, मी डोलकर), महेंद कपूर (हा खेळ सावल्यांचा, ढगाला लागली कळ, काशी गं काशी), किशोर कुमार (अश्विनी ये ना, अगं हेमा), मन्ना डे (घन घन माला नभी दाटल्या, अ आ आई म म मका), येशूदास (यशवंत देव यांनी गाऊन घेतलेले 'शब्द माळा पुरेशा न होती'), तलत मेहमूद (हसले आधी कुणी, सोबत आशा भोसले), नितीन मुकेश आणि अमितकुमार (ले लो भाई चिवडा लेलो) यांच्याही जादुई गळ्याने मराठी गाण्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेलं होतं. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी मोहम्मद रफींकडून खूप गाणी गाऊन घेतली आणि ती सर्व आजही मराठीजनांच्या स्मरणात आहेत.

म्हातारपण पाहावंच लागलं नसल्यामुळे असेल कदाचित, पण रफींचा आवाज सदा चिरतरुण राहिला. 'खुली पलक में...', 'एप्रिल फूल बनाया...', 'दिल ले गयी, ले गयी...', 'ओ दिलबर जानिए...', 'दिल के झरोखे में...', 'चौदहवी का चांद हो...', 'तेरी प्यारी प्यारी...'सारखी प्रेयसीची लाडिक आर्जवं असोत, 'क्या हुुआ तेरा वादा...', 'तेरी गलियों में...', 'परदेसीयोंसे ना आखिया...'सारखी शिकवणी घेणारी गाणी असोत, 'आदमी मुसाफीर है...', 'ऐ दिल है मुश्किल...', 'क्या मिलिए ऐसे लोगों से...' अशी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारी गाणी असोत की 'याहू चाहे कोई मुझे जंगली कहे..., रमया वस्तावय्या...', 'तय्यब अली प्यार का दुश्मन...'सारखी हुल्लडबाज गाणी असोत, प्रत्येकावर स्टॅम्प राहिला तो मोहम्मद रफींचा.


हिंदी सिनेसंगीत किंवा सुगम संगीताची चर्चा निघाली आणि मोहम्मद रफींचा नामोल्लेख झाला नाही, असं होणंच नाही. त्यांच्या गाण्यांचं आकर्षण आज तसूभरही कमी झालेलं नाही. उलट दिवसागणिक ते अधिकच आपलंसं वाटू लागलंय. रफीच्या पश्चात शेकडो पार्श्वगायक आले, गेले. म्युझिकल बूमच्या आजच्या जमान्यात शेकडो गायक गातही आहेत. पण रफीचा स्वर कानावर पडला की, आजही लाखो संगीतरसिक नॉस्टॅल्जिक होतात.

१९४९ ते १९६९ या काळात रफीने आपल्या आवाजाच्या बळावर चित्रपटसृष्टीवर एक प्रकारे वर्चस्वच गाजवलं म्हणा ना! श्यामसुंदरनी मोहम्मद रफीना हुडकून काढले होते. परंतु त्याला घडवण्यात नौशादचा सिंहाचा वाटा होता. 'मेला', 'दुलारी' 'दीदार' आणि 'बैजू बावरा' अशी नौशाद-रफी जोडीची यशाची चढती कमान होती. रफीच्या अष्टपैलू गुणांचा वापर पुढे शंकर-जयकिशन, सचिनदेव बर्मन आणि ओ. पी. नय्यरनी विपुल प्रमाणात केला.

हे दर्दभरे गीत असो किंवा अमिताभ-शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं 'एक रस्ता दो राही'सारखं एण्टरटेनिंग साँग असो मोहम्मद रफी यांच्या आवाजाने प्रत्येक गाण्याचं सोनं केलं. 'अब तुम्हारे हवाले वतन साथियो', 'ए वतन ए वतन', 'सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मै हे' यासारखी रफींची देशभक्तीपर गीतं ऐकली की आजही अंगावर रोमांच उभे राहतात.
मोहम्मद रफीच्या आवाजाला ' स्वगीर्य ' हे एकमेव विशेषण लागू पडावं. गळ्याला अवघड हा शब्दच मान्य नाही. प्रणयगीत असो , शास्त्रीय गाणं असो किंवा दर्दभरं गीत ; गाण्यातील भावना श्रोत्यांपर्यंत अचूक पोहोचवण्यात रफी कधी इंचभरही कमी पडला नाही. दिलीपकुमारसारख्या सुपरस्टारपासून जॉनी वॉकरसारख्या विनोदवीरापर्यंत , एवढंच काय , अगदी रस्त्यावरच्या भिकाऱ्यासाठीही रफी जीव तोडून गायला. प्रत्येक वेळी पडद्यावरचा कलाकारच जणू ते गाणं गात आहे , असा आभास निर्माण करण्यात रफी प्रमाणाबाहेर यशस्वी होत असे. आजही रफीची गाणी विलक्षण फ्रेश वाटतात. एका अर्थी रफी भाग्यवान होता. शकील बदायुनी , साहीर लुधियानवी , मजरूह सुलतानपुरी , कमर जलालाबादी यांसारख्या गीतकारांचे अर्थपूर्ण शब्द रफीच्या वाट्याला आले.

रफी साहब नेहमीच आपल्याला आवाजात 'पुकारता चला हु मै' म्हणत साद घालत आहेत.

1 comment:

Deepak said...

I am also a great fan of Rafi thanks Vivek for remembering him on 31st.