Thursday, February 10, 2011

जनगणना - २०११

जगाच्या इतिहासात प्रथमच १.२ अब्ज लोकसंख्येची जनगणना, ही  आपल्या देशातील पंधरावी जनगणना आहे.  भारताच्या   ६४० जिल्ह्यांतील ६ लाख खेडी आणि ७   हजार ७४२  शहरांमध्ये होणा-या या जनगणनेसाठी २ हजार २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. जनगणनेच्या कामात जवळपास २.५ दशलक्ष नागरिक गुंतले आहेत.पहिल्या टप्प्यात घर यादी व घरांची गणना तर दुसर्‍या टप्प्यात लोकसंख्या गणना होणार आहे. १८७२ साली, भारतात पहिली जनगणना झाली आणि दर १० वर्षांनी ती पुन्हा केली जाते.

 
देशाच्या प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची माहिती नोंदवून बुधवारी जनगणनेच्या दुस-या टप्प्याला सुरुवात झाली. २८ फेब्रुवारीपर्यंत जनगणनेचे काम सुरू राहणार असून,जनगणनेचे संपूर्ण काम ५ मार्चपर्यंत पूर्ण होईल. जनगणनेच्या कामात प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे.  
 
धर्म, व्यवसाय, शिक्षण, अशा विविध घटकांची नोंदणी या जनगणनेच्या वेळी केली जात आहे. जनगणनेच्या इतिहासात प्रथमच अधिकारी मोबाइल फोनधारक, कम्प्युटरधारक, इंटरनेट, बँकिंग सुविधांचा वापर, पिण्याच्या पाण्याची सुविधा,भौगोलिक आणि आर्थिक व्यवहारांच्या माहिती बरोबरच साक्षरता, जन्मदर, मृत्यूदर भाषा, धर्म याची माहितीही घेतली जाणार आहे. अशा विविध घटकांची नोंद करणार आहेत.जनगणनेत नोंद होणार्‍या प्रत्येक नागरिकांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.
 
जनगणना म्हणजे एका ठराविक कालावधीत एका ठराविक प्रदेशातील लोकसंख्येची करण्यात येणारी मोजणी होय.
 
जनगणना करण्याची प्रमुख उद्दिष्टे.
----------------------------------------
भारत हा कल्याणकारी राष्ट्र आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर सामान्य माणसांच्या हितासाठी पंचवार्षिक योजना, वार्षिक योजना आणि वेगवेगळया कल्याणकारी योजना सुरु करण्यात आल्या. या योजना तळागाळांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे. या सर्वांसाठी तळागाळापर्यंतची माहिती असणे जरुरीचे आहे आणि ही माहिती जनगणनेव्दारे उपलब्ध होते.

लोकराज्य/ राज्यसभा, विधानसभा, पंचायत व इतर स्थानिक क्षेत्रातील मतदार संघाची संख्या निश्चित करण्यासाठीही या जनगणना उपयोग होतो.

घर यादी व घरांची गणना अत्यंत उपयोगी आहे. कारण यापासून आपल्याला मानवी विकासाच्या परिस्थितीची बहुव्यापक आकडेवारी मिळते. तसेच निवासी घरांची कमतरता आणि त्याची आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी, घरकुल योजना राबविण्यासाठी उपयोगी पडते.

जनगणनेतून आपल्याला कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या सोयी व मालमत्तेसंबंधी आकडेवारी मिळते. ही माहिती संघराज्य व राज्य सरकारच्या विविध विभागाला आणि इतर अशासकीय कार्यालयाला विकास कामासाठी आणि स्थानिक तसेच राज्य स्तरांवर योजना राबविण्यसाठी उपयोगी पडते. लोकसंख्येची गणना करण्यासाठी ही पायाभूत माहिती असते.

लोकसंख्या गणना एका निश्चित वेळेची देश आणि त्यातील लोकांच्या विषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरविते. तसेच लोकसंख्येचा कल आणि विविध वैशिष्ट्यांची माहिती पुरविली. जी देशासाठी योजना राबविण्यासाठी आवश्यक घटक आहे.

देश आणि त्यातील लोकांच्या कल्याणासाठी ठराविक निती आणि कार्यक्रम तयार करण्यासाठी जनगणनेच्या आकडेवारीची आवश्यकता वारंवार पडते. उपलब्ध असलेली माहिती एक प्रभावी आणि कार्यकुशल लोक प्रशासनासाठी अनिवार्य आहेत.

२०११ च्या जनगणनेमध्ये लोकसंख्येच्या घनतेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.दहा वर्षाच्या कालावधीत अनेक विकास योजनांच्या नियोजनासाठी लोकसंख्याविषयक विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे.
 ---------------------------------------------
 
मोठ्या संख्येने माध्यमिक शाळांच्या शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी लावण्यात आल्याने शाळांमधील विद्यार्जनाचे काम ठप्प पडून विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती होण्याची ओरड दरजनगणनेला होत असते.पण यावर कोणतीच उपाययोजना आखली जात नाही.
जनगणना ग्रामीण भागातील लोकांना सवलतीची नवी पर्वणी वाटली.त्यामुळे अनेकजण आपल्या कुटुंबकबिल्यासह दारिद्यरेषेखाली जाण्याची धडपड करताना दिसतात. जनगणनेतील सतरापैकी चौदा मुद्दे महत्त्वाचे आहेत. कोणत्या एखाद्या मुद्यात घरातील फ्रिज दिसला, गाडी दिसली, चांगली फरशी आणि प्रशस्त बांधकाम दिसले की हे घर दारिद्यरेषेखाली राहू शकत नाही याची धास्ती अनेकांनी घेतली आहे. त्यामुळे घरासमोर स्वत:ची गाडी असली तरी ती पाहुण्यांची आहे, फ्रिज शेजाऱ्याचा आहे असे सांगून प्रगणकांची शाही बडदास्त ठेवली जाते,असे ऐकीवात येते.सध्या जनगणनेमध्ये एका बाजूला दारिद्यरेषेखाली जाण्याचा आणि दुसऱ्या बाजूला हे दारिद्य मागे घेऊन कारवाईपासून सुटका करण्याचा आगळा प्रयोग गावोगावी पहायला मिळतो. एरवी एकमेकांत भांडणा-या महिला आणि त्यांचे पुढारी नवरोबा तिसरे अपत्य लपविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.
 
जनगणनेनतंर लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने नविन योजना ताबडतोब आखण्याची गरज आहे.


No comments: