Thursday, September 1, 2011

गणपतीबाप्पांचे स्वागत झाले

गणरायाचे आगमन म्हणजे सळसळता उत्साह.गणपतीला मराठी माणसाच्या मनात तर खास स्थान आहे व गणपती बरोबर जवळचे नाते आहे.गणरायाचे दर्शन घेण्यासाठी,त्याच्यापुढे नतमस्तक होण्यासाठी भक्तगण आतूर असतो व गणपतीच्या दर्शनाने सुखावून जातो.गणेश चतुर्थी ह्या गणरायाच्या आगमन होण्याचा दिवस वर्षभर वाट पाहत असतो.गणेशाच्या आगमनाने सारा महाराष्ट्र अकरा दिवस  गणेशमय झालेला असतो.सगळीकडे उत्साह ओसडत असतो.



लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा धर्माच्या, धामिर्क उत्सवांच्या माध्यमातून ब्रिटिशांच्या विरोधात लोकभावना जागी करणे, हा त्यांचा मुख्य हेतू होता, हे सर्वांनाच माहीत आहे. पण भारताला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी सामाजिक-राजकीय परिस्थिती व गणेशोत्सव यांचे अन्योन्य नाते आजही कायम  आहे.लोकमान्यांनी लावलेल्या गणेशोत्सवाच्या रोपट्याचा आज जो वटवृक्ष झाला आहे, त्याचे लोकोत्तर स्वरूप हे ही त्या मागचे मोलाचे कारण आहे.

या उत्सवाचे रूप इतके लवचिक आहे की, त्यात धर्म, जनसंस्कृती, परंपरा, चालीरीती, प्रबोधन, आंदोलन, राजकारण, अनेक प्रकारच्या कला, संगीत, नेतृत्वप्रशिक्षण असे सारेच कळत-नकळत गुंफले गेले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या विलक्षण रसायनामुळेच त्याला 'सामाजिक बांधिलकी'चे धडे बाहेरून कोणी द्यावे लागत नाहीत. तो समाजाशी घट्ट बांधलेलाच असतो.

शाडूच्या मातीच्या किंवा चिकणमातीच्या गोळ्याला आकार देऊन गणपतीची सुबक मूर्ती बनवून त्या मूर्तीला उत्तम रंग देउन आकर्षक रंगांच्या वस्त्रांनी सजवून व विविध अलंकार चढवून सुदंर आरास करुन विराजमान होतात.त्या मुर्तीची अकरा दहा दिवस पुजा करुन अकराव्या दिवशी डोळ्यात अश्रु आणीत पुढच्या वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करीत विसर्जन केले जाते.

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायांचे आज दणक्यात स्वागत झाले आहे . अवघ्या महाराष्ट्राची मनोवस्था रंगलो गणरंगी अशी होऊन गेली आहे .वर्षभरातील सगळी दु : खं बाजूला ठेवून पुढचे अकरा दिवस सारे केवळ गणरायमय होणार आहेत .आपणही सामिल व्हावा जल्लोषात.


                                        
                                              !!    गणपतीबाप्पा मोरया    !!
                                                 !!   मंगलमूर्ती मोरया   !!


No comments: