Saturday, June 2, 2012

नौदलात युध्दनौकांची निवृत्ती

  नोकरीतील वयोमानानुसार निवृत्ती ठरलेली असते.त्याप्रमाणे कर्मचारी निवृत्त होत असतात.त्याचप्रमाणे नौदलात युध्दनौकांची निवृत्ती २२ मे रोजी नौदलाने विशेष कार्यक्रमाने केली.

नौदलात युद्धनौकांचे कमिशनिंग होते,त्याचा सोहळा सूर्योदयाच्या साक्षीने रंगतो;तर निरोपाच्या सोहळ्यास सूर्यास्ताची करुण झालर असते. भारतात माणसाप्रमाणेच नौका निवृत झाली तरी तिचा आत्मा कायम राहतो,असे मानतात. त्यामुळेच कित्येकदा निवृत्त युद्धनौकांची नावे त्याच वर्गातील आधुनिक नौकांना दिली जातात.

आयएनएस रत्नागिरी

रशियन बनावटीच्या आयएनएस पाँडिचेरी या श्रेणीतील ८९० टन वजनाच्या या युध्दनौकांमध्ये पाणसुरूंग भेदण्याच्या कामगिरीसाठी बुडामध्ये विशेष रचना असते. आयएनएस रत्नागिरी ही युध्दनौका १९८८ मध्ये मुंबईतच नौदलाच्या सेवेत रुजू झाली होती.देशाच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारी नौदलाची 'आयएनएस रत्नागिरी' ही युद्धनौका मंगळवारी  मंगळवारी २२ मे रोजी भारतीय नौदलाच्या सेवेतून  निवृत्त झाली.रत्नागिरी ही युद्धनौका नौदलात दाखल झाली तेव्हाचे पहिले कमांडिंग अधिकारी तत्कालीन लेफ्टनन्ट कमांडर श्याम कौशल हे निरोप समारंभाला उपस्थित होते. तिच्या मावळतीच्या काळातील सारथी कमांडर अमित नागपालही हजर होते. निरोपापूर्वी नौकेवरील बरीचशी सामग्री काढण्यात आली होती , मात्र तिला नव्याने रंग काढण्यात आला होता. निरोपासाठी नौकेच्या लांबीचा एक पांढराशुभ्र ध्वज अर्थात ' पेईंग ऑफ पेनन्ट ' लावण्यात आला होता. ठीक सात वाजून चार मिनिटांनी नौदलाच्या वाद्यवृंदाने ' द लास्ट पोस्ट ' ही धून आळवण्यास सुरुवात केली. तिच्या चालीवर नौसैनिकांचे संचलन सुरू झाले. नौकेच्या सुकाणूकडील नौदल ध्वज ' सारे जहां ' च्या चालीवर उतरविण्यात आला. त्याची निगुतीने घडी करून महाराष्ट्र-गुजराथ विभागाच्या प्रमुखांच्या हाती काचबंद पेटीत तो सुपूर्द करण्यात आला. नौकेवर कार्यरत असलेल्या नौसैनिकांचे कुटुंबीयही या हृद्य सोहळ्याचे साक्षीदार होते. 












आयएनएस कृष्णा

आयएनएस कृष्णा. कृष्णेवर कित्येक नौसैनिकांचे प्रशिक्षण पार पडले होते.

आयएनएस विंध्यगिरी

जेएनपीटी बंदरात ३० जानेवारी २०११ रोजी नौदलाची विंध्यगिरी आणि एम.व्ही. नॉर्डलेक या मालवाहू जहाजाची टक्कर झाली होती. अपघातानंतर या युद्धनौकेवर आगही लागली होती. या युद्धनौकेवर शस्त्रसाठा तसेच दारुगोळ्याचा साठा आहे. अपघातानंतर ही युद्धनौका वर्षभर नौदलाच्या गोदीत उभी आहे. अशी युद्धनौका गोदीत उभी करणे हे गोदीच्या व राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. गोदीच्या परिसरातून मालवाहू जहाजांची वाहतूक सुरू असते. दारुगोळा असलेली नौका उभी करून ठेवणे धोक्याचे आहे. त्यामुळे ही युद्धनौका मोडीत काढण्यासाठी नौदलाच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.आयएनएस विंध्यगिरी नष्ट करायला मुंबई हायकोर्टानं परवानगी दिलीय सुमारे एक वर्षानंतर ही परवानगी देण्यात आलीय.३० जानेवारी२०११ रोजी आयएनएस विंध्यगिरीला आग लागली होती.

निवृत्तीच्या दिवशी नौसैनिक किंवा नौकेचे सारथ्य केलेल्या अधिका-यांच्या  मनात या नौकवरील मोठा कालखंड तरळत असणारच. कारण घरापासून दूर सागरसफरीवर गेल्यानंतर बेभान वारा , उसळत्या लाटा , पाऊस , वादळ यात काम करताना सारी भिस्त या नौकेवरच असते. याच कृतज्ञतेचे पांग फेडण्यासाठी युद्धनौकांच्या निवृतीच्या वेळी तिची समारंभपूर्वक पाठवणी केली जाते.

निवृत्त नौकांचा वापर क्षेपणास्त्र किंवा युद्धसरावांत लक्ष्य म्हणून केला जातो अथवा त्या भंगारात काढतात. थोड्या नौकांच्या वाट्याला म्युझिमअममध्ये चिरंतन टिकण्याचे भाग्यही येते. अर्थात निर्जीव वस्तूंवर कितीही जीव लावला , तरी काळानुसार त्यांना अलविदा करावाच लागतो.

No comments: