Monday, July 23, 2012

भुट्टा


ढगाळ पावसाळी हवा.. मग रिमझिम पाऊस.. ओली हिरवाई.. याचा आनंद घेत कोळशावर भाजलेली गरम गरम मक्याची कणसं- मीठ-लिंबू लावलेली.किंचित पिवळसर पांढरी मोत्यासारख्या मक्याची कणसं .....
भुट्टा






तिखटमीठ लावलेला , लिंबू पिळलेला भुट्टा दोघांत मिळून खाताना त्याला जी काही चव येते याचं वर्णन केवळ अद्वितिय असंच करता येईल. मका , कणीस , भुट्टा , कॉर्न अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा प्रकार म्हणजे मान्सून प्रेमींची जान. 





समुद्रकिनाऱ्यावर भटकताना अचानक धो-धो पाऊस कोसळू लागतो. अशा वेळी आडोसा शोधत असतानाच मंद , खरपूस वास तुम्हाला आकर्षित करु लागतो आणि तुमची पावलं आपोआपच त्या दिशेने वळतात. येस्स...तोच तो भुट्टयाचा परिचित वास. लालभडक निखाऱ्यांवर भाजलं जाणारं मक्याचं कणीस , नंतर त्या दाण्यांवर लिंबू-तिखट-मीठाचा होणारा शिडकावा. आ ss हा... कुणाच्याही तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. 


मस्त पाऊस कोसळतोय...तुफानी वारा आहे...छत्री उलट-सुलट होतेय. अशा गारेगार , कुंद वातावरणात मुंबईचं यंगिस्तान धाव घेतं गेट वे ऑफ इंडिया , मरीन ड्राइव्ह , बँड स्टँड , वरळी सी फेस , जुहू , गोराई , इथे. कॉलेज बंक करून पावसाचा आनंद लुटण्यासाठी हे तरुणाईपासून सगळ्यांचचेच आवडते हॉटस्पॉटस. पावसात भिजत मरिन ड्राइव्हच्या कट्ट्यावर फिरताना , समुद्राच्या उहताना गरमागरम भुट्टा खाण्याची मजाच काही और. 

माथेरान,महाबळेश्वर व पांचगणी येथील वातावरणामुळे भुट्टा ला वेगळीच चव असते.

' भैय्या , दो भुट्टा मस्त निंबू मारके देना. ' अशी ऑर्डर, ' भैय्या , ज्यादा मत सेकना...काला-काला मत करना '  अशा आँर्डर भय्याला दिल्या जातात.मग भय्या तो भुट्टा देईपर्यत धीर धरवत नाही.पावसाळ्यात भिजत भिजत हा भुट्टा खाल्याला वेगळीच चव व मजा येते.



 एक मंद , खरपूस असा सुवास येऊ लागतो आणि तुमची पावलं आपोआपच त्या दिशेने वळतात. बाहेर धो-धो पाउस कोसळत असताना त्या कणीसवाल्या भैयाचा किंवा मावशीचा छोटासा ठेला दिसतो. कोळश्याच्या रंगासारखा काळा झालेल्या तपेल्यावर कधी लालभडक तर कधी पिवळटसर केशरी रंगाचे जळणारे निखारे दिसतात. आणि या निखाऱ्यांवर भाजले जाणारे मधुर मक्याचे दाणे. हिरव्याकंच पानांमध्ये असलेलं , कच्चे दाणे दिसणारं हे कणीस म्हणजे जणू काही पानातले मोतीच. पण रसरशीत असा मुळात पिवळाधम्मक असलेला भुट्टा आता भाजताना तांबूस होताना बघण्याची मजा ही काही भन्नाट असते. 


पण , बदलत्या जमान्याप्रमाणे मक्याचं स्वरुपदेखील बदलत चाललंय. हल्ली मका म्हणजे केवळ आपला भुट्टा राहिला नसून तो पॉपकॉर्न , मका पॅटिस , उकडलेले अमेरिकन कॉर्न , स्वीट कॉर्न सूप अशा नानाविध रुपांमध्ये तुम्हाला भेटतो. बीचवर १० ते १५ रुपयांना मिळणारा भुट्टा मल्टिप्लेक्समध्ये मसाला कॉर्न झाल्यावर त्याची किंमत ४०-५० रुपयांवर जाते. उकडून , बटर लावून , मसाला लावून एका कागदी कपमध्ये मसाला टाकून दिलेले हे मक्याचे दाणे खायला पण मजा येते. मक्याचं हे रुपडं कितीही बदललं तरी शेवटी निखा-ऱ्यांवर भाजलेला भुट्टा तो भुट्टाच. त्या खमंग भाजलेल्या लालसर कणीसाची सर मात्र मक्याच्या आणखी कोणत्याही रुपाला कधीच येणार नाही. 


अशा या चवदार कणीसासोबत प्रत्येकाच्या आयुष्यात काही सुखद आठवणी नक्कीच असतात.मस्त पावसात गरमागरम मक्याचं कणीस खात असताना तुमची आवडती व्यक्ती सोबत असेल तर काय बहारच. 


पावसाळ्यात सर्व ठिकाणी हमखास मिळणार भाजलेल मक्याच कणीस...... भर पावसात रस्त्याच्या कडेला उभ राहुन भुट्टा खाण्याची मजाच काही वेगळी असते नाही का.

No comments: