Thursday, July 18, 2013

वारी....श्रद्धेचा हा सोहळा





 पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे,वैभव आहे.पंढरीची वारी एकटयाने नव्हे,तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे.इथे वैयक्तिक नव्हे,तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे.आणि ही वारी कशी करायची? तर अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने नाचत.हातात टाळ घेऊन मृदंगाच्या तालावर नाचत, गर्जत, विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी ही पायी वाटचाल करतात. भजन गात, गर्जत, नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह.ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. सासुरवाशिणीला श्रावणात माहेरची आठवण जशी व्याकूळ करते, तसे पंढरीच्या भेटीसाठी वारकरी व्याकूळ होतात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय.गेली आठशे वर्षे ही वारी सुरू आहे.या आठशे वर्षात किती तरी उलथापालथ झाली,पंढरपुराचे स्वरूप बदलले,चंद्रभागेचे पात्र बदलले.




                                                   



                                 पायी चालतोया पंढरीची वारी
                                        मुखी बोलतोया पांडूरंग हरी
                                                 पांडूरंग हरी हरी...पांडूरंग हरी
                                                                पायी चालतोया पंढरीची वारी   !!

पंढरीची वारी हा सकल समाजाला संतांनी दाखविलेला परमार्थाचा सर्वात सोपा असा महार्माग आहे. पंढरीची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे, तसेच ती उपासना व साधना आहे. लाडक्या विठूरायाकडे अभिगमन म्हणजे पंढरीची वारी.
पंढरीस येणारे सर्वजण भाविक असतातच, पण त्यांना 'वारकरी' म्हटले जाते. वारी म्हणजे पंढरीची आणि वारकरी म्हणजे पंढरीचाच. अशा प्रकारे वारी, वारकरी आणि पंढरी या शब्दांचा भावबंध आहे.'वारी' म्हणजे फक्त पंढरीचीच!

एखादा भाविक वारकरी होण्यासाठी पंढरीत जाऊन तुळशीची माळ विधिपूर्वक गळयात घालून पंढरीच्या वारीचा संकल्प करतो आणि 'वारकरी' होतो. पंढरीमध्ये वर्षभरात चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघी अशा चार वाऱ्या भरतात. पैकी आषाढी व कार्तिकी यांना प्रमुख वाऱ्या मानल्या जातात.

आळंदी-देहू-पैठण, शेगाव, त्र्यंबकेश्वर येथून पंढरीच्या आषाढी वारीसाठी पायी जाणारे विविध संतांचे पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. ही केवळ एक धार्मिक घटना नसून जनजागृती करणारे भक्ती-आंदोलन आहे. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.


पंढरीच्या विठुरायाच्या ओढीने दरवर्षी लोक आळंदी - देहूमध्ये जमतात . परंपरेप्रमाणे या वारीमध्ये दिंड्या चालत असतात आणि या माऊलीच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांची वाटचाल होत असते . वारी सुरू होण्यापूर्वी दिंड्यांकडे वारकऱ्यांची नोंदणी होते आणि हळुहळू या दिंडीमधील कुटुंब आकाराला येते . भजन , माऊलीनामाचे एकत्रित संकीर्तन , एकत्रित जेवण , थोड्या गप्पा आणि थोडे खेळ अशा खेळीमेळीच्या वातावरणात वारी पुढे सरकत असते.
 पालखी सोहळा दरदिवशी किमान पंधरा ते वीस किलोमीटरचा पल्ला पार करत असताना , एका मुक्कामाहून पुढील मुक्कामाच्या ठिकाणी नवे गावच उभारत असते. साडेसातशे वर्षांपासून वारी बदलत गेली आणि आता वारी या ' गावा ' च्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे . 

पंढरीची वारी एकदा घेतलेल्या संकल्पानुसार मरेपर्यंत आजीवन केली जाते. एवढेच नव्हे तर वडिलांची-आजोबांची वारी त्यांच्या मृत्यूनंतर मुले-नातवंडे मोठया निष्ठेने करतात. म्हणून 'पंढरीची वारी' अनेक घराण्यांमध्ये अनेक पिढया चालत आलेली दिसते. 'पंढरीची वारी आहे माझे घरी' असे अभिमानाने सांगणारी हजारो घराणी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आहेत.

तेव्हा लाखाची वारी भरत होती . आज लोकसंख्या दीडदोन लाखांवर पोचली , तेव्हा हीच वारी बारापंधरा लाखांवर पोचली आहे . पूर्वी पायी चालत येणाऱ्या भाविकांचे प्रमाण साठ टक्क्यांवर होते.

 वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय.

No comments: