Thursday, October 10, 2013

तेंडल्या.




   भारतातील प्रत्येकाला,आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे सचिन ! तू निवृत्ती घ्यावीस, असे आजपर्यंत वाटत होते. पण आज तू निवृत्तीची घोषणा केलीस, तेव्हा वाटलं की तू निवृत्त होऊ नकोस.

   तमाम मराठी मनाचा मानबिंदू... आपल्या तेंडल्या.... आपला सच्च्यो याने कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय आज जाहीर केला. वाईट वाटले.




  क्रिकेटमधील असा एकही विक्रम शिल्लक नाही की, ज्याच्यावर सचिनचे नाव कोरले गेलेले नाही. वयाच्या चाळिशीतही खेळण्याची ऊर्मी बाळगणाऱ्या सचिनचा कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही विक्रमी होती.क्रिकेटच्या खेळात असलेल्यांसाठी तो प्रेरणादायी होताच; परंतु क्रिकेटमध्ये येणाऱ्या भावी पिढ्यांसाठीही तो कायमस्वरूपी प्रेरणास्रोत राहणार आहे.


  सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे क्रिकेटमधील एका पर्वाचा शेवट होईल. जेव्हा त्याने पदार्पण केले, तेव्हा त्याच्या खेळात लहान मुलाचा अल्लडपणा होता. आता तो "मास्टर' म्हणून निवृत्त होतोय. त्याने केवळ भारतीयच नाही, तर अवघ्या क्रिकेट विश्‍वासाठी एक आदर्शच घालून दिला आहे.


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला पहिला कसोटी क्रिकेट सामना खेळला १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध. योगायोग म्हणजे त्याची द्विशतकी कसोटीही १४ ते १८ नोव्हेंबर २०१३ दरम्यान खेळली जात आहे.वन-डे क्रिकेटमधून नवृत्ती घेणार्‍या सचिनला कसोटीत खेळताना पाहण्याची एकमेव असलेली त्याच्या चाहत्यांची संधीही काही दिवसांनी हिरावली जाणार आहे. 









   सचिनकडून घ्यावयाचा धडा तो हाच. क्रिकेटपटूंसाठीच नव्हे तर इतर खेळातील खेळाडूंसाठीही आदर्श निर्माण करणारा. एकाग्रता, निश्‍चय आणि अपार मेहनत कशी करायची हे सचिनने दाखवून दिले. चाहत्यांचे निस्सीम प्रेम ; नव्हे भक्ती , कट्टर प्रतिस्पर्धी संघाकडूनही दिला जाणारा आदर , ड्रेसिंग रूम आणि मैदानावरील निव्वळ उपस्थितीनेच इतरांना मिळणारी प्रेरणा... एखाद्या खेळाडूला आणखी काय हवे असते ? सचिन म्हणजे क्रिकेट असे समीकरण कोणी तयार केले नाही तर ते आपसूकच तयार झाले. तेंडुलकरशिवाय क्रिकेट ही कल्पना म्हणूनच सहन होऊ शकत नाही. अलौकिक प्रतिभेला खडतर परिश्रम , संयम आणि कर्तृत्त्वाची जोड देत सचिनने अद्वितीय कारकीर्द साकारली. 


    त्याने आपल्या कारकीर्दीत जी झेप घेतली ती प्रत्येक क्रिकेटपटूसाठी आदर्शवत. एक खेळाडू म्हणून मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याने स्वतःची जी प्रतिमा तयार केली ती विलक्षण म्हणावी लागेल. खेळाप्रती असलेली श्रद्धा, प्रेम व उत्साह ही त्याच्या कारकीर्दीची त्रिसूत्री म्हणता येईल. क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच देशांकडून त्याला नेहमीच प्रेम मिळाले. जगभरातील चाहत्यांनीही त्याच्यावर अलोट प्रेम केले. केवळ क्रिकेटमध्येच नव्हे तर कला, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांतही त्याचे चाहते निर्माण झाले. सचिन हा क्रिकेटविश्वातला महान खेळाडू आहे. त्याचे विक्रम अन्य कुणी मोडू शकेल असे वाटत नाही. पण असे असतानाही त्याचे पाय जमिनीवर आहेत.



    विक्रमादित्य,मास्टर ब्लास्टर,सच्या,तेंडल्या अशा अनेक प्रेमळ टोपण नावाने ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर हा आज जगातल्या क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य वाटणारे क्रिकेटमधले अनेक विक्रम त्याने लीलया मोडीत काढले. अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आणि अजूनही वयाच्या ३९व्या वर्षी तो नवनवीन विक्रम करण्यास सक्षम आहे. कसोटी क्रिकेटमधील आणि एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक शतके हे दोन डोंगराएवढे विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्याची थक्क करून टाकणारी कामगिरी पाहिल्यावर त्याला `देव' मानणारे चाहते काही कमी नाहीत.








    सचिन खेळाडू म्हणून जितका महान आहे, तेवढाच माणूस म्हणूनही महान आहे. तो कमालीचा नम्र आणि शांत स्वभावाचा आहे. केवळ स्वत:च्या खेळाकडे लक्ष न देता तो तरुण खेळाडूंनाही सतत प्रेरणा देत असतो. त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करून देत असतो. युवराज सिंगसारख्या खेळाडूला त्याच्या बॅडपॅचमध्ये सचिनने खूप मानसिक आधार दिला. त्यामुळे सचिनचे केवळ संघात असणे हेदेखील तरुण खेळाडूंना मोठा आधार वाटतो.


  क्रिकेटच्या मैदानावर सर्वात मोठी इनिंग खेळणारा ... शतकांचा शतकवीर होण्याचा बहुमान मिळविलेला ... आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ' मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' झालेला आहे . ऑस्ट्रेलियाबाहेरील व्यक्तीला क्वचितच दिला जाणारा ऑस्ट्रेलिया सरकारचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सचिनला दिला होता.'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' मिळविणारा सचिन हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे . तसेच हा पुरस्कार मिळविणारा तो ऑस्ट्रेलियाबाहेरील चौथा क्रिकेटर आहे.मी राज्यसभेचे सदस्यत्त्व स्वीकारले म्हणजे राजकारणात प्रवेश केलेला नाही."मी खेळाडू आहे, राजकारणी नाही आणि अखेरच्या श्वासापर्यंत खेळाडूच राहणार" अशी प्रतिक्रिया मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली होती.  क्रिकेट हे माझे आयुष्य आहे. त्यामुळे मला आजवर जे काही मिळाले आहे, ते क्रिकेटची देणगी असून, मी अखेरपर्यंत क्रिकेटच्याच क्षेत्रात राहणार आहे. माझी खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यानंतरही क्रिकेटसाठी जे जे काही करता येईल, ते ते मी करत राहीन असे वचन सचिनने म्हणणे आहे.भारतासाठी विश्वचषक जिंकणे हे माझे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाले. ज्या दिवशी भारताने विश्वचषक उंचावला तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता , अशी भावनाही सचिनने यावेळी व्यक्त केलेली आहे. 


सचिनसारखा खेळाडू क्रिकेट मधून निवृत होत आहे ही कल्पना करवत नाही.आता सचिन सेकेंड इनिंग सुरु
करील.त्याच्या पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा..





सचिन तेंडुलकर एकूण कारकीर्द:


सर्वाधिक एकदिवसीय सामने - 463
सर्वाधिक कसोटी सामने - 198
सर्वाधिक कसोटी चौकार - 2044
सर्वाधिक एकदिवसीय चौकार - 2016
सर्वाधिक 150 पेक्षा अधिक धावा एकदिवसीयमध्ये - 5
सर्वाधिक 150 पेक्षा अधिक धावा कसोटीमध्ये - 20
एकदिवसीयमध्ये नव्वदीत बाद - 18
कसोटीत नव्वदीत बाद - 10
सर्वाधिक एकदिवसीय अर्धशतके - 96
सर्वाधिक कसोटी अर्धशतके 67
एकदिवसीय सामनावीर सर्वाधिक - 62
सर्वाधिक मालिकावीर एकदिवसीय - 15
एकदिवसीय खेळलेले चेंडू - 21 हजार 367
एकदिवसीयमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा - 1894 (1998 मध्ये)
कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके - 9
विश्‍वकरंडकमध्ये सर्वाधिक धावा - 2278
एकाच विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा - 673 (2003)
विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये शतके - 6
विश्‍वकरंडक स्पर्धेमधील अर्धशतके - 15
विजयामध्ये सर्वाधिक धावांचे योगदान - (234 सामने) 11 हजार 157
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचे योगदान - (127 सामने) 5 हजार 490.

No comments: