Friday, April 18, 2014

सावली



सावली ही आपली सावली असते.ती दुस-याची होऊ शकत नाही.
प्रत्येकाची स्वत:ची असते.तुमची सावली कधीच तुम्हाला सोडून जात नाही, असे म्हटले जाते.


सावली असते प्रेमाची, 
सावली असते मायेची,
सावली असते सोबत,
फुलावर भिरभिरणार्‍या फुलपाखरासारखी,
प्रकाशात दिसणारी सावली, 
अंधारात दिसत नाही,
तरीहि ती सतत असते आपल्याबरोबर,

जीवनात राहण्यासाठी लागणार्‍या श्वासासारखी.



सावलीला काही पळताच येईना.
कारण...
सावलीचे पाय, माणसाच्या पायात.
माणसाचे पाय, सावलीच्या पायावर.
पण संध्याकाळ झाली. 
माणसापेक्षा सावली मोठी झाली.
त्या माणसाला सावली सोडून गेली.
सावली असते अंधार झाल्यावर तुझ्यात सामावणारी! 
त्या अंधारतही तू कुठेतरी प्रकाश शोधशील ह्याची खात्री असणारी. 
तुझ्यावर रणरणत्या उन्हात मायेची पाखर करणारी, 


एखादी थंड वा-याची झुळुक तुला देणारी सुद्धा कुठलीतरी सावलीच असते ना!





मी चालत होतो. माझ्या मागे मागे लगबगीने तीही चालत होती. 
जेथे जेथे जातो तेथे तेथे तू सोबत येतेस.....मी 
मी एकटा फिरू शकत नाही का?....मी
फिर ना!! हवं तसं फिर! पण मी तुझी पाठराखीन म्हणून येणारच बरोबर!! ....सावली


मी तुझी सावली आहे. तुझ्या मागे फिरण्यासाठी मला तुझ्यावर हक्क सांगण्याची गरज नाही. मी सर्वस्वी तुझीच सावली आहे.....सावली 



उन सावली,कल्पवृक्षाची सावली, मायेची सावली, पित्याच्या छत्राची सावली,  शीतल सावली,पंखाची सावली,सुखद सावली, पुसट व गडद सावली, माझी,तुझी,आपली व तुमची सावली ,दहशतीची सावली, मंदीची सावली,कृपेची सावलीलाडकी सावली.......




सावलीच ती... आपल्याला ती कमी-अधिक होताना दिसते... आपल्याबरोबर चालते, बोलते; पण आपल्या प्रश्‍नाचं ओझं ती घेऊ शकत नाही... प्रश्‍न सोडवू शकत नाही... माणसाचं अस्तित्व ती दाखवू शकते; पण अस्तित्वात ती आशय मात्र भरू शकत नाही...  


जीवन म्हणजे उन-सावल्यांचा खेळ.... प्रत्येकाच्या नशिबात थोडं उन आणि थोडी सावली लिहिलेली.... सुखं आणि दुःखं दोन्ही जीवनाचे अविभाज्य घटक... प्रत्येकाच्या पुर्वासुकृतांनुसार कमी अधिक प्रमाणात...



ती माझी सावलीच होती..
रखरखत्या उन्हात ती फक्त दिसायची
मी एकटाच असताना  मात्र ती जवळून चालायची.




एका माणसाला त्याच्या श्रीमंत मित्राच्या घरातल्या सोन्या-चांदीच्या वस्तूंचा मोह झाला. एका रात्री उशिरा तो चोरी करण्यासाठी मित्राच्या घरी निघाला. घराचा दरवाजा तर त्याने पार केला; पण आतल्या भिंतीवर त्याची सावली पडली आणि रखवालदाराने त्याला पकडले. श्रीमंत मित्राने त्याला सोडून दिले. 

हे सगळे त्या नतद्रष्ट सावलीमुळे झाले. त्या माणसाच्या मनात आले, तिला नष्टच करायला हवे. या कामासाठी त्याने गावाबाहेर राहणा-या साधूची मदत घ्यायचे ठरवले. त्याची मागणी ऐकून साधू हसला. ''तू सूर्यप्रकाश आणि चांदण्यात हिंडू नकोस, म्हणजे सावली निर्माणच होणार नाही.'' त्याने सल्ला दिला. ''महाराज, असं कसं करता येईल?'' तो माणूस काकुळतीला येऊन म्हणाला, ''माझा फिरतीचा धंदा आहे. पोटापाण्यासाठी कधीही, कुठेही जावे लागते. सावली पडणारच नाही असे काही तरी करा.'' साधू पुन्हा हसला. ''सावलीला डरणारा तू पहिला माणूस नाहीस. पण तू विसरलास, ती सावली किती इमानी आहे. ती दिवसरात्र तुझ्याबरोबर असते. त्या सावलीने तुला पकडून दिले खरे; पण तिनेच तुला अपकृत्य करण्यापासून वाचवले, हेही लक्षात घे. अरे, वाईट काळात आप्त आणि मित्र सोडून जातात; पण सावली सदैव माणसाबरोबर राहते. म्हणून तिचा राग करू नकोस आणि त्यागही करू नकोस.'' 


साधू महाराजांना सावली या शब्दातून इमान आणि सद्सद्विवेकबुद्धी या गोष्टी अभिप्रेत होत्या; कारण सावली माणसापासूनच उत्पन्न होते. त्या माणसाप्रमाणे कोणीही मनुष्यप्राणी सावलीला घाबरतो, तेव्हा तो वाईट कृत्य करायला घाबरतो. सावली माणसाला इमान आणि कर्मयोगही शिकवते. मनुष्य दिवस अथवा रात्रमानाप्रमाणे सावलीच्या परिघाबाहेर जातो, तेव्हा सावली दिसेनाशी होते. म्हणजे ती आपल्या धन्याबरोबर चालते आणि त्याच्याचबरोबर थांबते. 


' तुला सावलीसारखी सोबत देईन ', अशी आश्वासने देणारी माणसेसुद्धा साथ सोडतात, 

पण सावली कधी साथ सोडत नाही.तिची कायम सोबत असते.

No comments: