Wednesday, May 7, 2014

बैलगाडी शर्यतींवर पुन्हा बंदी


बैलगाडीच्या शर्यतींची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांहून अधिक परंपरा आहे.या शर्यती म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. बैलगाडीच्या शर्यती या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेचे मनोरंजनाचे साधन आहे.फॉर्म्युला वन मोटर रेसप्रमाणे वेगवान असलेल्या खेळाप्रमाणे महाराष्ट्रात जिगरबाज शेतकऱ्यांकडून बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येते. बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अस्मिता जोपासली जाते.

बैलगाड्यांच्या शर्यती हा महाराष्ट्राला नवा प्रकार नाही. बैलांच्या शर्यती हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातील परंपरेनुसार धार्मिक महोत्सव आहे. पुणे व नगर जिल्ह्यात ग्रामदेवतेला नवसाचे गाडे पळवण्याची जुनी प्रथा आहे.


ग्रामीण भागात फेब्रुवारी महिना सुरु झाला की यात्रांची चाहूल लागते. प्रत्येक गावांच्या यात्रेत विविध स्पर्धा ठरलेल्या असतात. यात कुस्ती , सायकल , कब्बडी , खो-खो आणि या बरोबर शेतकऱ्यांच्या आवडीच्या बैलगाडी शर्यती  झाल्या नाहीत तर यात्रा पोरक्या वाटतात.



पांढरा सफेद रंग , मजबूत वशिंड , काळे खूर , काळी नाकपुडी , शिंगाची काळी टोकं , शेपटीचा काळा गोंडा पाणीदार डोळे असा खिलार जातीचा ऐटबाज बैल काही मंडळी आपल्या घराच्यासमोर हौसेसाठी बांधतात. प्रतिष्ठा म्हणून बैल सांभाळणारे अनेक शेतकरी महाराष्ट्रात आहेत. घरात मल्ल व दारात बैल असले तर शेतकऱ्यांची गावात इभ्रत वाढते असे ग्रामीण भागात बोलले जाते.


शर्यतीच्या बैलांना दररोज हिरवा चारा , कडवळ , मका , लसूण घास , शेंगदाणा पेंड , मक्याचा भरडा , मिनरल मिक्स , गाजर , बीट , कोथिंबीर , हरभरा डाळीचे पीठ आवर्जून दिले जाते. काही शेतकरी गव्हाचे पीठ भिजवलेल्या पेंडीत मळून गोळे करून बैलांना भरवतात. शर्यतीच्या बैलांना जिवापाड जपले जाते.  शर्यती नसताना आठवड्यातून दोन-तीन वेळा बैलांना धुवून काढतात.यामुळे जनावराचे मालकाविषयी प्रेम वाढते.


राज्य सरकारने २०११ ला बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली आणि हा रांगड्या माणसांचा खेळ लोप पावण्याची भीती निर्माण झाली. यावर काही शौकीनांनी याचिका दाखल केली. सरकारने काही सशर्त अटींसह या शर्यतींना पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शर्यतीं सुरु झाल्या.बंदी उठल्याने पुन्हा आता तीच इर्षा पुन्हा पाहायला मिळली.



त्या अटी पुढील प्रमाणे होत्या.....

राज्यात ज्या ज्या ठिकाणी बैलगाडय़ांची शर्यती आयोजित करण्यात येतील. त्या त्या ठिकाणी प्रत्येक बैलगाडीसाठी धावण्याची स्वतंत्र मार्गिका ठेवणे आवश्यक आहे. बैलगाडय़ांच्या शर्यती दरम्यान बैलांना चाबकाने मारता येणार नाही. तथापि, गाडीवानाला हवेत चाबूक गरगर फिरविणे, चाबूक जमिनीवर आपटणे यास परवानगी आहे. कोणत्याही परिस्थितीत बैलांनी जोरात धावावे यासाठी त्यांना चाबकाने मारणे, दुखापत करणे, अणकुचीदार हत्यार टोचून इजा अथवा जखम करण्यास परवानगी नाही. बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेणार्या सर्व जनावरांची शर्यतीपूर्वी स्थानिक पशुवैद्यकांकडून तपासणी करणे आवश्यक असून पशुवैद्यकाने बैल शर्यतीत भाग घेण्यास शारीरिक सक्षम आहेत याची खात्री करावी. बैलांना कुठलेही उत्तेजक पदार्थ दिलेले नाहीत किंवा शर्यतीत जोरात धावावे यासाठी त्यांच्या जननेंद्रियास चिखल अथवा तिखट किंवा तत्सम पदार्थ लावले नाहीत याचीही खात्री पशुवैद्यकाने करावयाची आहे. त्याचप्रमाणे शर्यतीत बैलास अचानक काही कारणाने इजा किंवा जखम झाल्यास पशुवैद्यकाने त्वरित आवश्यक उपचार करणे गरजे आहे.ह्या अटी घातल्या गेल्या याचा अर्थ हे प्रकार शर्यतीमघ्ये होतात म्हणुनच ना.


शर्यतीत पळणा-या बैलांचे लाड पुरवले जातात.पण शर्यतीत मात्र त्यांचे हाल असतात.मात्र या मुक्या प्राण्यांवर शर्यती दरम्यान अत्याचार होणार नाही याची दक्षता घेतली जात नाही.बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे.बैलगाडीच्या शर्यती जिकंणे हा मोठा मान असल्यने त्यात मोठी इर्षा पणाला लावली जाते. शर्यत जिकंणाच्या इर्षेने बैलाकडे दुर्लक्ष होते.


बैलांच्या शर्यतीच्या नावाखाली बैलांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने पुन्हा  बैलगाडी शर्यतींवर
कायमची  बंदी घातली आहे.बैलांच्या आरोग्याच्या मुद्द्यावर शर्यतबंदी घातली गेली आहे.


बैलांचे धार्मिक महत्व,शेतकऱ्यांशी असलेले भावनिक नाते,शेतीच्या कामातील व धार्मिक महत्व लक्षात घेता बैलाचा वन्य प्राण्यात झालेला समावेश काढून घेऊन शर्यतीवरील बंदी उठवण्यात यावी अशी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांची इच्छा आहे.शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी पुन्हा प्रयत्त्न केले जातील.

चारशे वर्षांची परंपरा असलेली बैलगाडी शर्यतबंदीमुळे जवळपास पळाऊ बैल बांधून राहतील. एका बैलाची मोठी किंमत असल्याने शर्यत बंदी आल्यास अर्थ व्यवस्थेला तडा जाईल असे बोलले जात आहे.

खेडोपाडी मनोरंजनाची साधने उपलब्ध नव्हती तेव्हा लोकांनी आपापल्या सोयीनुसार आणि ऐपतीनुसार मनोरंजनाची व्यवस्था निर्माण केली होती. बैलगाडी शर्यतींचा प्रारंभ त्यातूनच झाला. हळुहळू त्यांना व्यावसायिक स्वरूप येत गेले. शर्यतीच्या बैलांसाठी शौकिन शेतकरी लाखांमध्ये रक्कम मोजू लागले आणि बैलांची तशीच काळजीही घेऊ लागले. शर्यतीच्या बैलांसाठी शेतकरी घासातला घास बाजूला काढून ठेवतो. त्याला एरव्ही ऊनसुद्धा लागू देत नाही. त्याला शेतीच्या कामालाही जुंपत नाही. एवढी काळजी घेणारा शेतकरी बैलांचा छळ करतो, असे म्हणणे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.

 प्रशासनाने जर या शर्यतीना पुन्हा संघी दिल्यास त्या शर्यतीचे चित्रण करायचे व ते चित्रण पाहुन त्या गांवातील त्या शर्यतीना बंदी घालावी.आणि जर तेथील मडंळी शर्यती दरम्यान बैलाची काळजी घेत असतील तर पुढेपण या शर्यती मान्यता देण्यात यावी.

No comments: