Saturday, May 10, 2014

जगावेगळीच माय



 माई... सिंधुताई,....अनाथांची माय


आईच्या मायेला मोल नसते. प्रत्येकासाठी आईची माया हीच एक श्रेष्ठ अनुभूती असते. पण जगात अशीही काही अभागी मुले आहेत ज्यांना आईची माया मिळू शकत नाही. ज्यांच्या पाठीवर आईचा प्रेमळ हात आणि सणसणीत चपराक कधी बसत नाही. चिऊ-माऊचा घास कोणी भरवत नाही आणि ढगांमागे लपलेल्या चांदोमामाबद्दलची गोष्टही कोणी सांगत नाही. आज एक किंवा दोन मुलांना सांभाळताना पालकांच्या नाकीनऊ येतात. मात्र, सिंधुताई सपकाळांनी एक हजारपेक्षा जास्त अनाथ मुलांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवत त्यांना आईची माया दिली आहे.



माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून सिंधुताईची धडपड सुरू असते.


माईचा आश्रम हे अनाथांचे हक्काचे घर आहे..अनेक लहान मुले येथे आहेत  मुलांपेक्षा मुलीच  जास्त अनाथ म्हणून आश्रमात येतात..कुणी आपण हून येते …कुणाला आणून सोडतात , कुणी रस्त्यात.. रेल्वे रुळावर सापडते.. आणि असा माईचा परिवार हळू हळू वाढत आहे.  माई म्हणतात… “मला काळजातल घर द्यायचे आहे” ..आणि खरोखर तिथे गेल्यावर  …काळजातले घर पाहिल्याचे समाधान मिळते.. अनेक कोवळ्या सुंदर निरागस कळ्या आहेत माईंच्या या मळ्यात .. आणि माई त्या सर्वांना पोटाशी धरतात. विशेष म्हणजे माई मुलांना दत्तक देत नाहीत मोठे होईपर्यंत त्यांचे पालन पोषण करतात.. योग्य शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करतात.. मुली योग्य वयात आल्या की त्यांचे योग्य स्थळ पाहून लग्न करून दिले जाते .. आणि मुलानाही योग्य ते शिक्षण देऊन त्यांचे ही संसार थाटून दिले जातात आशा माझ्या माई …हजारोच्या आई ..



 इतक्या कठीण परिस्थितीवर मात करून एखादी स्त्री जगू शकते …आणि नुसतेच जगत नाही तर आपल्यासारख्या असंख्य अनाथ, बेवारशी अगतिक जीवांचा  आधार होते… तर आपण का हरायचे परिस्थितीला कोसत का बसायचे ..का करायच्या आत्महत्या… दुःख दु:ख चघळत बसण्यापेक्षा एका जरी डोळ्यातले आसू पुसण्यात आणि एका जरी ओठावर हसू आणण्यास आपण कारणीभूत झालो तर जीवन सफल झाले असे समजावे.


अनाथांची माय  म्हणून लौकिक असणा-या,आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आईच्या नात्याचा कळसाध्याय रचणा-या, अनाथांच्या उध्दाराचे काम करणा-या व निराधारांची "माई" सिंधुताई सपकाळ.

ज्याला कोणीच नाय अशा लहानग्या लेकरायला जगवणारी आणि त्यायची माय होणारी अशी ही जगावेगळीच माय.




माईच्या कार्याला मातृदिना निमित्त सलाम .....

No comments: