Saturday, May 31, 2014

सोशल मीडिया नावाचे नवे राजकीय अस्त्र.

         

 सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन ठरले आहे हे नाकारून चालणार नाही. नरेंद्र मोदींच्या मते भाजपला एव्हढ्या मोठ्याप्रमाणावर यश मिळण्यात सोशल मीडियाची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे.तसेच नरेंद्र मोदी यांचे ब्रँडिंग यशस्वी ठरल्याने त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना फेसबुक पेज आणि टि्वटर खाते उघडण्यास सांगितले आहे. नवीन मंत्र्यांना मायक्रोब्लॉगिंग साईट्स आणि सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा सल्ला दिला आहे.सोशल मिडियामार्फ़त लोकांच्या संपर्कात रहाण्याचा सल्ला दिला आहे.मंत्र्यांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती अशा प्रकारच्या सार्वजनिक मंचावर टाकण्यास सांगण्यात आले आहे, ज्यायोगे जनतेच्या सतत संपर्कात राहता येईल. त्याचप्रमाणे लोकांबरोबर चर्चा करता येऊन, त्यांच्या प्रतिक्रिया प्राप्त करता येतील आणि त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण सल्ल्यांचा समावेश उपक्रमात करता येईल.या प्रक्रियेत लोकांच्या प्रतिक्रियांचा विचार घेतला जाईल.हा उपक्रम जनतेच्या दृष्टीने चांगला आहे. 
   

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अद्ययावत संपर्क तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असून त्यांनी शपथग्रहण सोहळ्यानंतर आपल्या पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर (pmindia.nic.in) काही क्षणात बदल घडवून आणला. 'आपल्यातील थेट संपर्काचे महत्त्वाचे माध्यम म्हणून मी या वेबसाईटकडे पाहतो ' जनतेला असा संदेश दिला आहे.लोकांमध्ये जाऊन जनतेशी संपर्क साधणे ही पंतप्रधानांसाठी महत्वाची बाब असून,यात सोशल मीडीया हे महत्वपूर्ण साधन असणार आहे याचा त्यांना मोठा फायदा निवडणुकीत झाला.'अब की बार मोदी' सरकार अशी धुवाँधार जाहिरात करीत गुजरातच्या नरेंद्र मोदी यांनी देशभरात लाट निर्माण केली. या लाटेवर स्वार झालेल्या भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता आले.


पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नेतृत्वाचे ज्या पद्धतीने ब्रँडिंग झाले आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला ते पाहून आता राज्याराज्यात मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांचे असेच 'ब्रँडिंग' होण्याची शक्यता आहे.राज्यात नेत्यांच्या 'ब्रँडिंग'चा बॅन्ड हा सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जोरात वाजणार.पण राज्यातले विविध नेते स्वतःच्या 'ब्रँडिंग'च्या माध्यमातून मतदारांना खरेच आकर्षित करतात की नुसतेच मनोरंजन करतात, हे पाहावे लागेल.
   

देशातील भ्रष्टाचाराच्या सुरस कहाण्या ऐकून विटलेल्या तरुणाईने रेडिओ वा दूरदर्शनसोबतच इंटरनेटला जवळ केले आहे. आता याच इंटरनेटच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधातील आंदोलन केवळ दिल्लीत न राहता त्याचे देशाविदेशात पडसाद उमटले. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली लढा लढणार्या अरविंद केजरीवाल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत `आप’ सत्तेवर आली व केजरवाल यांच्यासारखा तरुण दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. भाजपशिवाय आम आदमी पक्षानही सोशल मीडियाद्वारे आपला प्रचार करण्यावर भर दिलाय. सोशल मीडियाद्वारे चटकन निरोप पोहचवता येत असल्यामुळे आप च्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडिया विशेष लोकप्रिय आहे. दिल्लीतील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या ऊरात धडकी भरविणार्या `आप’ने सोशल मीडियाचा मोठय़ा खुबीने वापर करून सत्तेच्या चाव्या आपल्या `हाती’ खेचून घेतल्या आहेत. `आप’च्या या सोशल मीडियावरील करामतीचा धसका देशभरातील सर्वच राजकीय पक्षांनी घेतला आहे. 

मानव प्रगत होत गेला तेव्हा आगीसोबतच शस्त्राचा शोध महत्त्वाचा ठरला. स्वतःच्या बचावासाठी शस्त्राचा वापर करता करता त्या आधारे माणूस शिकारही करू लागला. हत्यारे आणि शस्त्रांचा शोध लागला, तेव्हा ती माणसांना उपयुक्त ठरतील, असे वाटले होते. सुरुवातीच्या काळात झालेही तसेच. या हत्यारांनी माणसांचे जगणे सोपे केले होते. जसजसा माणूस आणखी प्रगत होत गेला तसा शस्त्रांचा गैरवापर करण्यात येऊ लागला. त्यांचा वापर एकमेकांना मारण्यासाठीही केला जाऊ लागला. त्यामुळे कायदा करून शस्त्रांवर बंदी घालावी लागली. सार्वजनिक सण-उत्सव आले किंवा कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटली, की पोलिस शस्त्रबंदीचा आदेश जारी करतात. आता अशीच स्थिती सोशल नेटवर्किंग साइट आणि मोबाइलची होऊ पाहत आहे. हे नवे तंत्रज्ञान आपण स्वीकारले खरे; पण, त्यांचा योग्य वापर करण्याचा विवेक अनेकांकडे नाही. त्यामुळेच त्यावर बंदीची भाषाही सुरू झाली आहे. एकाबाजूला माणसांच्या जगण्याला नवा आयाम देणारी, माणसाला व्यक्त होण्यासाठी संधी प्राप्त करून देणारी ही नवी माध्यमे उपयुक्त आणि आवश्यकच आहेत. मात्र, त्यांचा गैरवापर आणि त्यातून उद्ध्वस्त होणारे अनेकांचे आयुष्य पहात ही माध्यमे नकोच, असाही मतप्रवाह सुरू झाला आहे. 


मुळातच सोशल मीडिया हा प्रकार अपघातप्रवण आहे. त्याचा वापर जितका सोपा आहे, तेवढेच त्याचे परिणाम आपल्या अंदाजापेक्षा भयंकर ठरू शकतात. या माध्यमांचा वापर करून एखाद्या क्लिकवर एखादी माहिती शेअर करता येते.


सोशल मीडियाने अल्पावधीतच इंटरनेट विश्वावर आपला प्रभाव निर्माण केला असून, भारतातही याचे गारुड दिवसेंदिवस वाढते आहे. या वर्षाअखेरपर्यंत शहरी भारतातील सोशल मीडिया यूजर्सची संख्या नऊ कोटींचा टप्पा ओलांडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इंटरनेटची वाजवी किंमतीतील सहज उपलब्धता, स्मार्टफोन्स आणि आकर्षक डेटा प्लॅन्स यामुळे सोशल मीडियाच्या यूजर्समध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.


मीडिया वापरणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याने राजकीय पक्षांना त्याची दखल घ्यावीच लागणार आहे.राज्यातील आगामी निवडणुकीत नवमाध्यमांचा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरेल अन्‌ तंत्रज्ञानातील क्रांतीचा राजकीय प्रभाव जाणवेल.


सोशल मीडियाने राजकिय कार्यासाठी उपयोगी ठरले आहे.

No comments: