कल्याण-पनवेल बसच्या महिला कंडक्टरला आणि तिच्यासह बसच्या ड्रायव्हरलाही सुमारे अर्धा तास एक तरुण लाथाबुक्क्यांनी तुडवत असताना बसमधले असंख्य प्रवासी आणि रस्त्यावरून जा ये करणारे पादचारी यांपैकी कोणालाही मध्ये पडावे असे वाटू नये किंवा वाटले तरी तसा धीर होऊ नये हे जिवंतपणा संपलेल्या समाजाचेच लक्षण मानायला हवे.कोणीही विरोध दाखवलाच नाही.विरोधाची थेट कृती तर दूरच,पण विरोधाचा साधा शब्ददेखील एकाही तोंडून फुटू नये.अशा प्रसंगांमध्ये समाज किंवा समूह थंडपणे बघ्याची भूमिका घेतो. समाजाची मानसिकता स्वत:पुरती सीमित होत चालली आहे.समाज बेफिकीर व बेजाबदार बनला असून,आपल्या संवेदना हरवत चालल्याची लक्षण दिसत आहेत.का असहाय तरुणीवर ओढवलेल्या अशा प्रसंगाच्या वेळी कोणत्या पराभूत मानसिकतेमुळे प्रवाशांचे हात बांधले गेले होते? एका महिलेची विटंबना होत असल्याचे पाहून कोणाचेही रक्त उसळले नाही. हे समाजस्वास्थासाठी धोकादायक आहे.
त्या प्रकारानंतर आणि 'त्या हैवानापेक्षाही,मला बघ्यांची भीती वाटते', या त्या असहाय तरुणीच्या उद्विग्न उद्गारांनंतर तेथल्या प्रत्येकालाच शरमही वाटू लागली असेल का?भ्याड लोकांचा बघेपणा हा स्वभाव राक्तामध्येच भिनलेला असतो. ह्याचीच शरम वाटते आहे.
मुंबईसारख्या गर्दीने ओथंबलेल्या महानगरातच नव्हे, तर सर्वत्रच, याच, एकटेपणाच्या भावनेमुळे, गर्दीलादेखील सामूहिक शक्तीचा विसर पडू लागला असेल. म्हणूनच, त्याची कारणेही शोधली पाहिजेत. अशा प्रसंगी पीडिताच्या मदतीकरिता पुढे सरसावलेच, तर त्यानंतरच्या सर्व सोपस्कारांमध्ये सहभागी होण्याएवढा वेळ प्रत्येकाकडे नाही, असे एक कारण दिले जाते. एखाद्या प्रसंगात असे मदतीचे धाडस दाखविलेच, तर नंतरचे पोलीस ठाण्यांवरील हेलपाटे, कोर्टकचेऱ्या साक्षीपुराव्यांचे फेरे आणि तपास यंत्रणा आणि गुन्हेगाराचे लागेबांधे, त्यामधील व्यवहारांचे अर्थसंबंध असे पांढरपेशा मानसिकतेला अनाकलनीय असणारे सारे अडथळे पार करून गुन्हा सिद्ध होईलच याची शाश्वती नसेल, तर त्यापासून लांब राहिलेलेच बरे,असा पांढरपेशा विचार अनेकदा अलिप्तपणाला कारणीभूत ठरतो.
गर्दीच्या या अलिप्तपणाच्या भावनेला बळ देणारी आणखी एक बाब अलीकडे प्रबळ होऊ लागली आहे. याकडे अजूनही फारसे गंभीरपणे पाहिले जात नाही. काळ, काम आणि वेग यांची सांगड घालण्याची कसरत करणाऱ्या प्रत्येकालाच, आपल्यापलीकडच्या जगाकडे पाहण्यासाठी आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी पुरेसा वेळच नाही.
गोदरच बिनचेहऱ्याची, त्रयस्थपणे आसपास वावरणारी गर्दी अलीकडे अधिकच एकाकी होऊ लागली आहे. आसपास असलेली अनेक शरीरे, एकत्र असतानाही, आपल्याआपल्यापुरतीच, एकटी असतात, हे अनुभवण्यासाठी फार लांब जावे लागत नाही. गर्दीने खचाखच भरलेल्या एखाद्या प्रवासात, जो जो सहभागी होत जातो, तो आपल्यापुरती जागा मिळताच, खिशातील मोबाइल हाती घेतो, इयरफोन कानाला लावतो, आणि आपल्यापुरत्या समस्या विसरण्याच्या प्रयत्नांत, मोबाइलमध्ये साठविलेल्या सुरांच्या वा खेळांच्या दुनियेत एकटाच रंगून जातो. कुणी, आपल्यापुरती जागा मिळताच लॅपटॉप उघडून जगाची सफर करू लागतो, तर कुणी हातातल्या टॅबलेटवरून मनाला रिझविणाऱ्या करमणुकीच्या विश्वात रममाण होऊन जात आसपासच्या अस्तित्वापासून स्वत:ला अलिप्त ठेवतो.आपल्या पांढरपेशा अलिप्तपणामुळे समूहाच्या मानसिकतेलाही हतबलपणा येतो, हे आपण विसरत चाललो आहोत का?
मुंबईत सिग्नलपाशी वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकाला त्याची जाणीव करून देणाऱ्या एका धाडसी तरुणीच्या साह्याला कुणीही न आल्याची घटना अवघी सहा महिन्यांपूर्वीचीच आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी प्रवाशांदेखत रेल्वे लोकलगाडीत कोवळ्या वयाच्या गतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या अधमालाही थांबवले गेले नव्हते. दिल्लीतील निर्भयावर गुदरलेला प्रसंग असो, गावोगाव घडणाऱ्या विनयभंगाच्या, अतिप्रसंगांच्या असंख्य घटना असोत, बहुतेक ठिकाणी हाच अनुभव आला आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य देशावासीयांचे रूपांतर मोठ्या वेगाने बघ्यांच्या गर्दीत झाले आहे की काय ही भयशंका अधिक दाट होत आहे.
समाजामधे काही चांगले घडवून आणायचे असेल तर अशा गुन्ह्यांच्या विरूढ लढणार्यांना जास्तीत जास्त पुरस्कृत केले पाहिजे आणि समाजात त्यांना मानाचे स्थान दिले पाहिजे.
No comments:
Post a Comment