Tuesday, June 24, 2014

महान माणसं


भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी पेन्शन, तर माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी वेतन घेण्यास नकार दिला होता.गृहमंत्रालयात  वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या फायलींतून काही महत्वाची माहीती भारतीयांना कळली.असामान्यांचे देशप्रेम दिसून आले.

 ही माणसे केवळ देशसेवेसाठी जन्माला आली होती आणि देशसेवेतच  त्यांचा शेवट झाला होता.असे नेते आता होणे नाही.थोर नेते होते.यांना पैशाची हाव नव्हती देशसेवेची नशा होती.यांनी देशासाठीच कामे केली. अवघं आयुष्य त्यांनी स्वातंत्र्यासाठी लावले.आपल्या राष्ट्राचे हे आदर्श नेते होते.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या दिग्गज नेत्यांचा मोलाचा सहभाग होता. ते कधीच श्रीमंत झाले नाहीत.पण देशभक्तीत ते श्रीमंत होते.
  
 आता देशभक्ती बाजूला सरली आहे. भाषा - भक्ती , प्रांत - भक्ती , पुढारी - भक्ती आणि सत्तेसाठीची भक्ती वाढली आहे.हल्लीच्या नेत्यानी देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या संज्ञा कालबाह्य ठरवल्या आहेत. फ़क्त स्वातंत्र्यदिनी  देशावरची गाणी लावून देशभक्ती व्यक्त केली जाते.

या महान माणसांनी वेतन व पेन्शन घेतली नाही.पण आजचे खासदार, आमदार व विरोधी नेते  संसदेत आपल्या भत्ते व वेतनाचे ठराव एकमताने पटकन मंजूर करुन घेतात. भ्रष्टाचार बोकाळला आहे.नेते स्वार्थी झालेले आहेत.पैशासाठी समाजसेवा केली जात आहे. समाजसेवा हे पैसा कमवण्याचे साधन यांनी केले आहे.कोणत्याही मार्गाने धनसंपत्ती जमविणे ही नेत्यांची प्रवृत्ती झाली आहे.सत्तेची हाव वाढली आहे.

 कुठे चालला आहे आपला देश? त्या थोर नेत्यांनी कोणती स्वप्ने पाहिली असतील? आता देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम कोठे दिसत नाही.असे नेते परत जन्माला आले तर त्यांना ही म‍डंळी जगू देतील का? की त्यांना मुर्ख ठरवतील?  

No comments: