Tuesday, July 15, 2014

ट्रेकिंगची नियमावली तापदायक



पाऊस सुरु झाला की तरुणांच्या डोक्यात ट्रेकिंगचे प्लॅन सुरू होतात.पावसासह ट्रेकिंगचा मौसम सुरु होतो. शिवरायांच्या किल्ल्यांचे मला नेहमीच आकर्षण असल्याने विशेषत: किल्यांवर जाण्य़ाचे बेत आखले जातात.फोटोग्राफी आणि निसर्गाची आवड असलेले भटकंती करण्यास निघतात.आता कधीपण निघता येणार नाही.सरकारी नोंद करुनच जावे लागणार आहे.किल्यांवर जाण्यासाठी प्रत्येक वेळी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने नोंदणीकृत नसलेल्या संस्थांना आळा घालण्यासाठी व गिर्यारोहकांच्या सुरक्षेसाठी नियमावली जाहीर केली आहे.तसेच शासनाकडे संस्थेची अधिकृत नोंद न करता साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.




बऱ्याचशा संस्था व व्यक्ती सुट्टयांच्या कालावधीत गिर्यारोहण व ट्रेकींगच्या मोहिमा, शिबिरे आयोजित करतात. मात्र, यातील अनेकांकडे या प्रशिक्षणाचा परवाना नसतो आणि त्यांचे स्वतःचे प्रशिक्षणही झालेले नसते. शासकीय यंत्रणेकडे त्यांची नोंदही नसते. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. अनेकदा अशा शिबिरांत अपघात होऊन प्राणास मुकावे लागण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीकडे नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. धबधब्यातून रॅपलिंग व रात्रीचे ट्रेकिंग असले साहसी प्रकार करता येणार नाही.


मान्यताप्राप्त संस्थेचा प्रमाणित प्रथमोपचार सहायक असला पाहिजे. ट्रेक अथवा शिबिर तीन हजार मीटरपेक्षा उंचीवर असल्यास संस्थेने सहभागी होणाऱ्या व्यक्तीचे फीटनेस सर्टिफिकेट घेणे आवश्यक. संयोजकाकडे आपत्कालीन प्रसंगी करावयाच्या उपाययोजनांचा लेखी तपशील हवा. तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या गिर्यारोहण मोहिमेसाठी आयोजकांनी १६ वर्षाखालील मुलांना नेण्यास बंदी. याशिवाय ट्रेकच्या प्रकारानुसार कोणकोणते सामान बरोबर न्यावे, याची यादीही शासनाने अधिसूचनेत प्रसिद्ध केली आहे.


डोंगराबरोबर झालेली मैत्री टिकवण …
निसर्गाच्या प्रत्येक रूपाचा प्रेमाने आदर करणं ....
नुसत धाडस म्हणून नाही तर सातत्याने केलेली वाटचाल …
पुढे  पडणार प्रत्येक पाऊल एकमेकांच्या साथीने टाकण्याचा ध्यास म्हणजेच ट्रेकिंग …



ट्रेकिंग म्हणजे केवळ सहल न होता अविस्मरणीय अनुभवातून अनेकविध गोष्टींची माहिती देणारा छंद 


नियमावली करणा-यांना हे कळले का केव्हा ??


कंटाळवाणे दिवस मजेचे करण्याचा धमाल पर्याय म्हणजे पाठीला सॅक लटकावून गड, किल्ले पालथे घालणे हे तरुणांचे नवे फ़ंडे आहेत.शहरात आरामदायी आयुष्य जगताना ग्रामीण भागातील संस्कृतीशी जोडण्याची संधी ट्रेकिंगमुळे मिळाली. फिटनेस राखणेही ट्रेकिंगमुळे शक्य झाले. गडांच्या संवर्धनासाठी श्रमदान आणि युवकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न मी करते. ऐतिहासीक वारशांना त्यांचे गतवैभव मिळवून देणे हा माझ्या भटकंतीचा उद्देश आहे. ट्रेकिंग ही केवळ मजा- मस्ती नाही. हा एक ध्यासच आहे. गड- किल्ले, जंगलं, डोंगरदऱ्यांतल्या वाटा धुंडाळण्यासाठी त्यांच्यातला ट्रेकर कायम उत्सुक असतो. 



तरुणाई घरातून बाहेर पडत ट्रेकिंगकडे आकर्षित होत असताना असे कडक नियमाने त्यांचे धाडसी गिर्यारोहण बंद होईल.लोकांना गडांवर जाणेच अशक्य होईल. ऐकिकडे गिर्यारोहणाला क्रिडा धोरणात समावेश करायचे आणि त्याच क्रिडा प्रकारावर बंधनेही  टाकायची.विविध हितकारक तरतुदीत बरीच विसंगती आहे तीही दूर करणे गरजेचे आहे.’वासोटा’ किल्यावर जाताना पायथ्याशी सुरक्षापोलीस चौकीत गिर्यारोहकांना नोंद करावी लागते तसेच राज्यातील प्रत्येक गडावर सुरक्षापोलीस चौकी स्थापन करुन त्या सुरक्षापोलीसांनी गडासह गिर्यारोहकांनावर नजर ठेवावी.शासनाकडे लहान संस्थेंना अधिकृत नोंद बंधनकारक करु नये. तरुणांमधले साहस खुंटले जाईल व गडांचा इतिहास पडद्या आड जाईल अशी भीती वाटते.अशाने ट्रेकिंगला नवी झळाळी मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. 


सुरक्षा जरुर असावी पण त्रासदायक नसावी..

खरेतर सध्या कुठे या विषयाला बरे दिवस येऊ लागले आहेत. समाजाला त्यातील फायदे समजून तो सहभागी होऊ लागला आहे. असे असताना त्याला योग्य दिशा देण्याऐवजी नियमांच्या आणि त्यातही चुकीच्या नियमांमध्ये अडकवून आपण काय साध्य करणार आहोत. भोवतालची अनेक राज्ये या खेळासाठी प्रोत्साहन देत असताना आपल्या शासनाकडून त्यावर बंधने आणण्याची कृती धोकादायक आहे. सोळा वर्षांखालील मुलांवरील बंदी, अमुक साहित्यसाधनेच घेण्याची सक्ती असे करण्याऐवजी या खेळाची ताकद, गुणवत्ता, त्यातील मर्यादा, त्या पुढच्या अडचणी आणि त्याला द्यावयाची दिशा आणि नियंत्रण याचा एकत्रित विचार केला असता तर खूप फायद्याचे झाले असते. 


सगळ्या   ट्रेकिंग   संस्थानी एकत्र येऊन   या विरोधात   शासनाशी लढा देऊन हे नियम शिथिल केले पाहिजेत.
सेवाभावी वृत्तीने - अभ्यासू पद्धतीने काम करणाऱ्या संस्था, त्यांचे उपक्रम यामुळे अडचणीत येतील. अत्यंत अव्यवहार्य अटी, जाचक नियम आणि निर्थक खानेसुमारीमुळे या क्रीडाप्रकाराचा गाभाच हरवणार आहे. या निर्णयाची केवळ दुरुस्ती करून चालणार नाही तर तो अभ्यासकांच्या मदतीने पुन्हा नव्याने तयार करणे आवश्यक आहे. 



No comments: